प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील परटवणे ते फिनोलेक्स कॉलनी रस्त्यावर पेन, दुचाकी व चारचाकी वाहनाच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल़ा अपघातानंतर क्रेन कलंडली असून क्रेनचालकाने पलायन केले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
प्रकाश विलास गोसावी (32, जांभूळफाटा, मजगांव रोड-रत्नागिरी) या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गोसावी हे बजाज पल्सर (एमएच 08, यू-2796) घेऊन जांभूळफाटा ते परटवणे असे येत होते. यादरम्यान परटवणेहून येणाऱया क्रेनचालकाने फिनोलेक्स कॉलनीसमोर उतारानजीक छोटय़ा पुलावर प्रथम एका चारचाकी वाहनाला व त्यानंतर समोरून येणाऱया दुचाकीला धडक दिली. या धडकेत प्रकाश गोसावी दुचाकीसह पुलाखाली वहाळात फेकले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर क्रेन रस्त्याच्या बाजूला कलंडली. या तिहेरी अपघातानंतर क्रेनचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. याची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत दुचाकीस्वाराला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.