वार्ताहर/ लोटे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा फाईन केमिकल्स प्रा. लि. कंपनीत बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीनंतर कंपनीतून एकामागोमाग एक झालेल्या 15 स्फोटाच्या आवाजाने परिसर दणाणून सोडला. लोटे एमआयडीसीसह चिपळूण व खेड नगर परिषदेच्या दाखल झालेल्या अग्निशमन बंबाने अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे. शॉटसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
औद्योगिक वसाहतीतील रासायनिक उत्पादन घेणाऱया या कंपनीत बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर कामगारांनी तत्काळ प्लॅन्टमधून बाहेर पडत गेटवर धाव घेतली. यानंतर लोटे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला सपर्क साधण्यात आला. एमआयडीसीचा बंब तत्काळ घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेऊन चिपळूण तसेच खेड नगर परिषदेशी संपर्क साधून बंब मागवण्यात आले. त्यानंतर दोन्ही ठिकाणाहून बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग आटोक्यात आणत असतानाच कंपनीतून येणारे स्फोटाचे आवाज आणि धुराचे लोट पाहून ग्रामस्थानीही कंपनीजवळ धाव घेतली.
या आगीची माहिती मिळताच लोटे दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता आणि होणारे स्फोट लक्षात घेऊन घटनास्थळावरून ग्रामस्थांना हटकले. या आगीत जीवितहानी टळली. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शॉटसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान लोटे, चिपळूण आणि खेड येथून आलेल्या अग्निशमन बंबाच्या अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी आनंद परब यांनी दिली.