तरुण भारत

दुःखद संकट असतानाही आरोग्यमंत्र्यांचा संधीसाधूपणा

मंत्री, आमदार, पक्ष पदाधिकाऱयांची भावना, कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांवर पक्षांतर्गत दबाव

प्रतिनिधी/ पणजी

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शेळ – मेळावली येथील नियोजित आयआयटी प्रकरणी जो काही अचानक निर्णय घेऊन जाहीर केला तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याआधीच प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचविण्याच्या कृतीमुळे मुख्यमंत्री, मंत्री तसेच भाजप पदाधिकारी संतप्त झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर पक्षांतर्गत कमालीचा दबाव आलेला आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनानंतर मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

या संदर्भात भाजप गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भूमिका ही सरकारविरुद्ध असल्याची भावना भाजपमध्ये तयार झाली आहे.

भाजपवर दुःखाचे संकट असतानाही…

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक हे अपघातग्रस्त आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. भाजपवर एवढे मोठे दुःखाचे संकट कोसळलेले असताना आरोग्यमंत्र्यांनी तडकाफडकी निर्णय घेताना ना पक्षाला ना मुख्यमंत्र्यांना विचारले. वास्तविक आरोग्यमंत्री या नात्याने त्यांनी श्रीपादभाऊंच्या प्रकृतीची, उपचारांविषयी काळजी घेणे अपेक्षित होते.

आरोग्यमंत्र्यांकडून उघडपणे पक्षशिस्तीचा भंग

मेळावली येथेच आयआयटी व्हावी, असा हट्ट धरणाऱया आरोग्यमंत्र्यांचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांसाठी विश्वासघात ठरलेला आहे. शिवाय भाजपसाठी एक मोठा धक्का बसलेला आहे. भाजपमध्ये पक्षशिस्तीला महत्त्व आहे. विश्वजित राणे यांची कृती ही पूर्णतः पक्षशिस्तीचा भंग मानली जात आहे. या कारणास्तव आरोग्यमंत्र्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱयांनी मुख्य़मंत्र्यांकडे केली आहे.

आरोग्यमंत्र्यांचा दुःखाच्यावेळी संधीसाधूपणा

सध्या भाजप दुःखद संकटात आहे. श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत अद्याप मोठी सुधारणा झालेली नाही. सौ. विजयताई नाईक यांच्या निधनाच्या धक्क्यातून भाजप अद्याप बाहेर पडलेला नाही. नेमकी हिच संधी साधून आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठविले त्यात केलेली टीका तसेच फेसबूकवर एक व्हिडीयो जारी करुन त्यात मांडलेली भूमिका ही नेमकी भाजप व मुख्यमंत्र्यांना देखील अडचणीत टाकणारी आहे. आरोग्यमंत्र्यांची कृती ही पूर्णतः पक्षशिस्तीचा भंग मानली जात आहे.

गाभा समितीनेही घेतला जोरदार आक्षेप

भाजपच्या गाभा समितीने विश्वजित राणे यांच्या वागण्यावर जोरदार आक्षेप घेतलेला आहे. विश्वजित राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणे योग्य असल्याचे मत गाभा समितीच्या काही सदस्यांचे आहे. मात्र भाजप सध्या अडचणीत व दुःखात असल्याने मुख्य़मंत्री एवढय़ात घाईघाईने यावर निर्णय घेणार नाहीत. आगामी विधानसभा अधिवेशन 25 जानेवारीपासून सुरु होत आहे. अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर मुख्य़मंत्री या प्रकरणी गंभीरपणे विचार करतील, असा अंदाज आहे.

Related Stories

विरोधक आपल्या राजिनाम्याच्या अफवा पसरत आहे

Patil_p

55 रुग्णांचे अहवाल नकारात्मक

Patil_p

लोकायुक्त व माहिती आयुक्तांची नेमणूक करावी

Patil_p

ऊस शेतकऱयांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

Patil_p

ऊस उत्पादकांची संजीवनीसमोर धरणे

Patil_p

अग्रस्थानावरील मुंबई सिटीला नॉर्थईस्ट एफसीकडून पराभवाचा धक्का

Patil_p
error: Content is protected !!