प्रतिनिधी/ पणजी
केंदीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना दिल्लीत नेण्याची गरज नाही. त्यांचे श्वसन, रक्तदाब योग्य व नियमित होत असल्याचा निर्वाळा दिल्ली येथील ‘एम्स’च्या डॉक्टर्स पथकाने दिला आहे. त्यामुळे नाईक कुटुंबाला तसेच समस्त गोमंतकीयांना व देशवासियांना दिलासा मिळाला आहे.
दिल्लीच्या ‘एम्स’ पथकाच्या प्रमुख डॉ. राजेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक यांच्यावर योग्य, चांगले उपचार झाले असून त्यांना ते प्रतिसादही देत आहेत. त्यामुळे त्यांना इतरत्र नेण्याची आवश्यकता नाही. त्यांचे श्वसन, रक्तदाब नियंत्रणात असून त्याविषयी आपण समाधानी असल्याचे राजेश्वरी यांनी नमूद केले. वेंटिलेटरचा वापर करायचा झाला तर तेथे उपचार कसे करावेत याबाबत त्यांनी गोमेकॉतील डॉक्टर्सना काही सूचना केल्या आहेत.
एम्स व गोमेकॉच्या तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली
श्रीपादभाऊ नाईक हे सध्या एम्स व गोमेकॉतील तज्ञ डॉक्टर्सच्या निरीक्षणाखाली असून त्यांची पुरेशी काळजी घेतली जात आहे. तसेच डॉक्टर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. दोन्ही पथकातील डॉक्टर्सनी उपचारांचा आढावा घेतला असून ते एकमेकांशी चर्चा – सल्लामसलत करुन उपचारांची सूचना संबंधित डॉक्टर्सना देत आहेत.
गोमेकॉ उपचारांबाबत एम्स डॉक्टर्स समाधानी : बांदेकर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉत भेट देऊन नाईक यांची चौकशी केली. ‘एम्स’ चे पथक काल बुधवारी संध्याकाळी दिल्लीस रवाना झाले. गोमेकॉत नाईक यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराबाबत ‘एम्स’च्या डॉक्टर्स पथकाने समाधान प्रकट केल्याचे गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.