तरुण भारत

पानिपत’च्या रणसंग्रामात सांगलीतील वीरांचा पराक्रम

कळंबी आणि भिलवडीच्या योध्दयांचा सहभाग, शिदनाक आणि लक्ष्मण गुणे धारातीर्थी


प्रतिनिधी / मिरज

Advertisements

पानिपत येथे झालेल्या इतिहासप्रसिध्द लढाईचा आज स्मृतिदिन. ‘पानिपत’ च्या या जगप्रसिध्द लढाईत सांगली जिल्हयातील वीर योध्दयांनीही पराक्रम गाजविला होता. या संग्रामात कळंबी (ता. मिरज) आणि भिलवडी (ता. पलूस) येथील वीरांनी अहमदशा अब्दालीच्या फौजेशी लढताना रणांगणावर देह ठेवला. कळंबीचे शिदनाक इनामदार आणि भिलवडीचे लक्ष्मण बल्लाळ गुणे हे दोन वीर या युध्दात धारातीर्थी पडले. त्यांच्याबरोबर या भागातील अन्य सैन्यही होते. मात्र, या वीरांचा हा पराक्रम विस्मृतीत गेला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने दरवर्षी 14 जानेवारी रोजी या वीर योध्दयांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो.

सन 1761 साली मराठे आणि अहमदशा अब्दाली यांच्यात हरियाणाजवळील पानिपत येथे घनघोर रणसंग्राम झाला. हे युद्ध भारताच्या इतिहासात प्रसिध्द आहे. या युद्धात असंख्य सैनिक धारातीर्थी पडले. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असं निर्भयपणे उत्तर देणारे दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे अशी मातब्बर मंडळी अब्दालीच्या सैन्याशी झुंजताना धारातीर्थी पडली.
पानिपतच्या या युध्दात मराठय़ांना अपयश आलं तरी, या अपयशाने खचून न जाता मराठा सरदारांनी काही वर्षांतच दिल्लीची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. उत्तर हिंदूस्थानावर मराठयांचा दरारा निर्माण केला. त्यामुळे या युद्धाला महत्त्व प्राप्त झाले.

पानिपतच्या या घनघोर रणसंग्रामाचा सांगली जिल्हय़ाशीही संबंध आहे. जिल्हय़ातील काही वीर योध्दय़े या लढाईत सहभागी झाले होते. त्यांनी तेथे पराक्रम गाजवताना रणांगणावर देह ठेवला. मात्र, या शूर योध्दय़ांचं विस्मरण सांगलीकरांना झालं आहे. पानिपतच्या या युध्दात कळंबी येथील शिदनाक इनामदार आणि भिलवडी येथील लक्ष्मण बल्लाळ गुणे हे दोन योध्दे सहभागी झाल्याच्या नोंदी ऐतिहासिक कागदपत्रात आहेत.
मिरज तालुक्यातील कळंबी येथील इनामदार घराणे हे ऐतिहासिक घराणे आहे. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांनी मिरजेचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर इनामदार यांना कळंबी गाव सरंजामाच्या खर्चासाठी लावून दिले होते.

या घराण्यातील काळनाक उर्फ शिदनाक हेही पराक्रमी होते. सन 1761 साली पानिपत येथे झालेल्या युध्दात त्यांनी आपल्या सैन्यासह सहभाग घेतला. या युध्दात काळनाक उर्फ शिदनाक यांनी पराक्रम गाजवत रणांगणावर देह ठेवला. त्यांच्या या वीरमरणानंतर पेशव्यांनी 18 फेब्रुवारी 1762 रोजी गोविंद हरी पटवर्धन यांना पत्र पाठवून कळंबी हा गाव काळनाक यांचा मुलगा राजनाक याच्याकडे पूर्ववत ठेवण्याचे आदेश दिले होते. या घराण्यातील चार पिढय़ांनी स्वराज्य रक्षणाच्या कामी मोठी कामगिरी बजावली आहे. ‘पानिपत’वर काळनाक उर्फ शिदनाक हे धारातीर्थी पडल्यावर त्यांचे चिलखत आणि शस्त्रे बरोबर गेलेल्या सैनिकांनी कळंबी येथे आणली. आजही इनामदारंच्या देवघरात ही शस्त्रे पहावयास मिळतात. काळनाक यांच्या स्मृतिप्रत्यिर्थ एक मुखवटाही अडीचशे वर्षे येथे पुजला जात आहे.

कळंबी येथील शिदनाक यांच्याबरोबरच सांगली जिल्हय़ातील पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे लक्ष्मण बल्लाळ गुणे हेही या युध्दात सहभागी होते. लक्ष्मण बल्लाळ गुणे हे मुळचे कोकणातले. साताराचे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे वडील बाळाजी जनार्दन यांना देशावर आणले. त्यांना नारोराम मंत्री यांची मुतालकी बहाल केली. त्यासाठी कराड, काले, शिराळे येथील काही गावे इनाम दिली. खेराडे जवळ बाळाजींनी वाडी वसवली. भिलवडी येथे त्यांना एक चावर जमीन होती. बाळाजींना सहा पुत्र होते. त्यापैकी कृष्णाजी हे वाळवेकर दिनकरराव थोरात यांच्या पदरी होते.

धोंडोपंत हे मंत्री यांचे मुतालीक होते. रामाजी बल्लाळ हे नागपूरकर भोसल्यांकडे पेशव्यांचे वकील म्हणून काम पाहात. हरिपंत आणि बापूजी हे पानिपतच्या अगोदर उत्तर हिंदूस्थानात ज्या लढाया झाल्या त्यामध्ये थोरातांच्या सैन्याबरोबर दोन वर्षे सहभागी होते. लक्ष्मण बल्लाळ हे कायम पेशव्यांच्याकडेच असत. त्यांनी सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्याबरोबर पानिपतच्या युध्दात सहभाग घेतला. तेथे त्यांना रणांगणावर मृत्यू आला. ते निपुत्रीक वारले. त्यांच्या पश्चात त्यांच्या बंधूंचे वंशज भिलवडी येथे राहत आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळांच्यावतीने दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी सांगली जिल्हय़ातील या शूर योध्दय़ांच्या स्मृतिंना अभिवादन केले जाते.

पानिपतच्या इतिहासप्रसिध्द युध्दात सांगली जिल्हय़ातील दोघा पराक्रमी वीरांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांचा हा पराक्रम आणि त्यांनी मराठेशाहीच्या रक्षणासाठी दिलेले प्राणांचे सर्वोच्च बलिदान आजवर दुर्लक्षीतच राहिले आहे.

Related Stories

म्हैसाळ येथे अज्ञाताने एसटीवर दगडफेक करून काचा फोडल्या

Abhijeet Shinde

लग्न समारंभात गर्दी, १० हजारांचा दंड

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू , नवे 526 रूग्ण

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी

Abhijeet Shinde

कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

इस्लामपुरात गुन्हेगारी वर्चस्व वादातून एकाचा खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!