तरुण भारत

रामसेतूसंबंधी रहस्ये उलगडणार

भारतीय पुरातत्व विभागाकडून संशोधनाला मंजुरी- रामायणाचा कालखंड समजणार : एनआयओचा प्रकल्प

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

‘रामसेतू’च्या वयोमानाचा शोध लावण्यासाठी एक अंडरवॉटर रिसर्च प्रकल्प यंदाच सुरू होणार आहे. खडकांची साखळी ‘कशाप्रकारे’ निर्माण झाली यावर सीएसआरआर-नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ओशनोग्राफीचे (एनआयओ) वैज्ञानिक संशोधन करतील. भारतीय पुरातत्व विभागामधील केंद्रीय सल्लागार मंडळाने एनआयओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेतूचे वय आणि रामायणाच्या कालखंडाचा शोध लावण्यास मदत होणार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

एनआयओ या संशोधनासाठी सिंधू संकल्प किंवा सिंधू साधना नावाच्या जहाजांचा वापर करणार आहे. ही जहाजे पाण्याच्या पृष्ठभागाच्या 35-40 मीटर खोलीवरून नमुने प्राप्त करू शकतात. सेतूनजीक एखादी वस्ती होती की नाही, हे देखील संशोधनातून समजणार आहे. संशोधनात रेडियोमेट्रिक आणि थर्मोल्यूमिनेसेंस (टीएल) डेटिंग यासारख्या तंत्रज्ञानांचा वापर होणार आहे. कोरल्समध्ये कॅल्शियम असते, ज्याद्वारे सेतूचे वय समजणार आहे. 

रामायणात उल्लेख

‘रामायणा’नुसार लंकेचा राजा रावण याच्या कैदेतून पत्नी सीता यांना मुक्त करण्यासाठी भगवान श्रीराम निघाले असता समुद्रावर त्यांच्या वानरसेनेनेच या सेतूची निर्मिती केली होती. वानरांनी छोटछोटय़ा दगडांच्या मदतीने हा सेतू उभारला होता.

वादग्रस्त सेतूसमुद्रम प्रकल्प

संपुआ-1 दरम्यान 2005 साली सेतूसमुद्रम शिप चॅनल प्रकल्पाची घोषणा झाली. या प्रकल्पामुळे मोठा वाद निर्माण झाला, कारण याकरता सेतूतील काही खडक तोडावे लागले असते. या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाने 2007 साली स्थगितीचा आदेश दिला होता. या प्रकल्पाला हिंदुत्ववादी संघटनांसह पर्यावरणतज्ञांनीही तीव्र विरोध केला होता. काँग्रेसच्या सरकारने हा सेतू भगवान श्रीराम यांनी उभारल्याचे कुठलेच पुरावे नसल्याची वादग्रस्त भूमिका न्यायालयात मांडली होती. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकल्पाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे.

अमेरिकेच्या वाहिनीचा दावा

2017 मध्ये अमेरिकेतील ‘सायन्स चॅनल’ या वाहिनीने हा सेतू मानवनिर्मित असू शकतो असा दावा केला होता. सेतूचे खडक परिसरातील वाळूपेक्षाही जुने आहेत असे वाहिनीने स्वतःच्या अध्ययनात वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावर म्हटले होते. वैज्ञानिकांनी नासाच्या उपग्रहीय छायाचित्रांचा दाखला दिला होता.

कुठे आहे हा सेतू?

कोरल आणि सिलिकाच्या खडकांचा हा सेतू भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रात आहे. हिंदू महाकाव्य ‘रामायणा’त याचा उल्लेख आहे. सद्यकाळात हा सेतू पाण्याखाली असला तरीही काही शतकांपूर्वीपर्यंत याचा वापर व्हायचा, असे वैज्ञानिकांनीच मान्य केले आहे. सेतू सुमारे 48 किलोमीटर लांबीचा आहे. राम सेतू मन्नारची खाडी आणि पॉक सामुद्रधूनीला परस्परांपासून वेगळा करतो. अनेक ठिकाणी याची खोली केवळ 3 फूट तर काही ठिकाणी 30 फुटांपर्यंत आहे. 15 व्या शतकापर्यंत या सेतूवरून रामेश्वरम ते मन्नार बेटापर्यंत चालत जात असल्याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहे. वादळांमुळे या सेतूच्या भागातील पाण्याची खोली वाढली आहे.

Related Stories

‘तोयबा’ दहशतवाद्यासह हाफिज हमजाचा खात्मा

Patil_p

हजारो वर्षांपासून भारत-श्रीलंकेचे संबंध

Patil_p

शेअर बाजारात 2 हजार अंकांची उसळी

Patil_p

आग्रा : तानाजीनगर तीन दिवस पूर्ण बंद; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर होणार कारवाई

Rohan_P

न्यायव्यवस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळावे

Patil_p

‘स्पुतनिक व्ही’ लसीचे भारतात उत्पादन सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!