तरुण भारत

कोरोनाकाळात वृत्तपत्र विक्रेत्यांची सेवा उल्लेखनीय!

तरुण भारत वृत्तपत्र वितरकांचा बेळगाव, खानापूर कार्यालयात गौरव समारंभ : सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते झाला गौरव

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनासारख्या कठीण परिस्थितीतदेखील मनात कोणतीही भीती न बाळगता घरोघरी जाऊन वृत्तपत्र सेवा दिलेल्या तरुण भारत वृत्तपत्र वितरकांचा गुरुवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून संस्थेच्या कार्यालयात गौरव करण्यात आला. व्यासपीठावर संपादक जयवंत मंत्री, सीएमओ उदय खाडीलकर, वितरण व्यवस्थापक अभिजीत ब्रह्मदांडे, जाहिरात वसुली व्यवस्थापक मेघराज सटवाणी, गजानन वालावलकर उपस्थित होते.

यावेळी संपादक जयवंत मंत्री यांनी वृत्तपत्र वितरकांप्रती आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त करून त्यांच्या कार्याचा आणि सेवेचा गौरव केला. यावेळी वृत्तपत्र वितरक संघाचे माजी अध्यक्ष मधू देशपांडे, अध्यक्ष सुभाष गोरे, सचिव अनंत गरडे, प्रकाश कुलकर्णी, संजय घोरपडे, राजू भोसले, प्रताप भोसले, राजू आपटेकर, संजय पाटील, पिराजी गावडे, उदय कोलवालकर, सतीश नाईक, संजय कदम आदी वृत्तपत्र वितरकांचा तिळगूळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी मधू देशपांडे यांनी आपल्या वृत्तपत्र वितरण सेवेतील मागील 60 वर्षांचा आढावा घेतला. वितरकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलवरूनच अंक पोहोचविण्याचा सल्ला दिला. कोरोना महामारीच्या काळात मनात कोणतीही भीती न बाळगता वाचकांपर्यंत वृत्तपत्र सेवा पोहोचविणाऱया, शिवाय ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वृत्तपत्र वितरणाचा वसा आणि वारसा प्रामाणिकपणे जोपासणाऱया तरुण भारतच्या 75 हून अधिक वृत्तपत्र वितरकांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी दत्तकुमार पत्की, सुधीर घोडके, गजानन मोतेकर, भावेश गोजगेकर, सचिन सरोळकर, सुशील मोर्लेकर, मयूर पाटील, विनोद चौगुले, जगनू किरमठे, मच्छिंद्र धारपवार, बाबू पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर तालुक्यात कोरोनाकाळात तरुण भारतच्या वितरकांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन मकर संक्रांतीचे औचित्य साधून तरुण भारतच्यावतीने गुरुवारी खानापुरातील विभागीय कार्यालयात झालेल्या समारंभात सन्मान करण्यात आला. या सेवेबद्दल वितरकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री होते. व्यासपीठावर उपसंपादक सुनील शिंदे, खानापूर तालुका प्रतिनिधी प्रकाश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी पत्रकार आप्पाजी पाटील यांनी स्वागत करून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी खानापूरचे वृत्तपत्र विक्रेते सुरेश खडपे, सौ. सुरेखा खडपे, कु. शिवानी खडपे, अजित शिंदे, लक्ष्मण बिरसे, नंदगडचे विक्रेते किरण बिडकर, बेकवाडचे धाकलू बाळेकुंद्री, चापगावचे वृत्तपत्र विक्रेते पिराजी कुऱहाडे, ओलमणीचे हणमंत जगताप, कुप्पटगिरीचे भरमाण्णा पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.

तरुण भारतचे खानापूर प्रतिनिधी प्रकाश देशपांडे म्हणाले, गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत खानापुरात तरुण भारतचे वितरक म्हणून कै. राजाराम वाघधरे तर नंदगड येथे कै. निवृत्ती बिडकर या दोघांनी चांगली सेवा बजाविली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वाघधरे यांचे जावई सुरेश खडपे तर निवृत्ती बिडकर यांचे सुपुत्र किरण बिडकर यांनी वृत्तपत्र व्यवसायात सध्या चांगली सेवा बजावली आहे. तरुण भारतचा अंक खानापूर तालुक्याच्या गावोगावी पोहोचला असून तालुक्याच्या विविध भागात अनेक वृत्तपत्र विक्रेते काम पहात आहेत. त्यांची ही सेवा उत्तमप्रकारे सुरू आहे. कोरोनाकाळातही त्यांनी न घाबरता उत्तम सेवा दिली. त्याबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांचे अभिनंदन केले.

यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने पत्रकार पिराजी कुऱहाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वृत्तपत्र विक्रेते सुरेश खडपे, धाकलू बाळेकुंद्री, हणमंत जगताप यांनीही आपले विचार व्यक्त केले. गुरुवारच्या सोहळय़ाला अनुपस्थित विक्रेत्यांना त्यांचे मानचिन्ह व प्रमाणपत्र घरपोच पाठवून देण्यात येणार
आहे.

यावेळी तरुण भारतचे वितरण विभागाचे गजानन मोतेकर, सचिन सरोळकर, मच्छिंद्र धारपवार तसेच खानापूर कार्यालयातील कर्मचारी दत्ता जीवाई, शिवानी पाटील, शशिकांत देसाई आदी उपस्थित होते. पत्रकार हणमंत जगताप यांनी आभार मानले.

तरुण भारतची देदीप्यमान वाटचाल…

यावेळी संपादक जयवंत मंत्री म्हणाले, तरुण भारतची देदीप्यमान वाटचाल सुरू असून वाचकही मोठय़ा प्रमाणात आहेत. जगात कोरोना रोगाने थैमान घातले. त्यामुळे अनेकांचा संपर्क कमी झाला असला तरी तरुण भारतच्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावून वेळेत वाचकांपर्यंत अंक पोहोचविले. त्यांनी त्याकाळात केलेली सेवा उल्लेखनीय आहे. यापुढील काळातही प्रामाणिकपणे सेवा बजावावी, असे आवाहनही केले.

Related Stories

आमच्या घरांना जाण्यास रस्ता उपलब्ध करा

Patil_p

डिफेन्स कॉलनीतील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

हंगरगे परिसरातील शिवारात गव्यांचा धुमाकूळ

Omkar B

देसूरमध्ये निवडणूक मतपत्रिका फुटल्याने गोंधळ

Patil_p

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Rohan_P

बेळगावमधील चौपदरी रिंगरोड प्रकल्पाला गती

Amit Kulkarni
error: Content is protected !!