तरुण भारत

रोहितचा आत्मघाती फटका, भारत बॅकफूटवर

ऑस्ट्रेलियाच्या 369 धावांना प्रत्युत्तर देताना भारत दुसऱया दिवसअखेर 2 बाद 62

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

Advertisements

कोणत्याच निकषावर समर्थन करता येणार नाही, असा आत्मघाती फटका रोहित शर्माने खेळल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथील चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी भारतीय संघ काही अंशी बॅकफूटवर फेकला गेला. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 369 धावा झळकावल्यानंतर रोहितने 44 धावांची आत्मविश्वासपूर्ण खेळी साकारली. पण, याच धावसंख्येवर त्याने आततायी फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट फेकली आणि भारताला दिवसअखेर 2 बाद 62 अशा धावसंख्येवर समाधान मानावे लागले. पावसाच्या व्यत्ययामुळे चहापानानंतरच्या सत्रात बराचसा खेळ होऊ शकला नव्हता.

रोहितने 74 चेंडूत 44 धावांच्या खेळीत आपला क्लास दाखवून दिला. पण, 100 वा कसोटी सामना खेळत असलेल्या लियॉनला पुढे सरसावून उत्तूंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न अगदी सपशेल फसला आणि डीपमधील मिशेल स्टार्कने सोपा झेल टिपत रोहितची खेळी संपुष्टात आणली. स्वतः रोहितही या फटक्यावर आपली निराशा लपवू शकला नाही.

त्यापूर्वी, सहकारी सलामीवीर शुभमन गिल (7) देखील स्वस्तात बाद झाला. गिलने कमिन्सच्या गोलंदाजीवर स्मिथकडे झेल दिला. चेतेश्वर पुजारा (8) व अजिंक्य रहाणे (2) हे अनुभवी फलंदाज ब्रेकपूर्वी 6.1 षटकात केवळ 2 धावांची भरु घालू शकले.

रोहितचे 6 चौकार

रोहितच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश राहिला. मात्र, यात तो चेंडूवर तुटून पडत असल्याचे चित्र कमी दिसून आले. कमिन्स व हॅझलवूड यांनी भेदक मारा करत रोहितची कसून पारख केली. कमिन्सच्या गोलंदाजीवर रोहितचा ऑन ड्राईव्हचा फटका मात्र विशेष लक्षवेधी ठरला होता. रोहितने चेतेश्वरसमवेत दुसऱया गडय़ासाठी 49 धावा जोडल्या. अर्थात, यात चेतेश्वरचा वाटा अगदीच अल्प होता.

शनिवारी क्रीझवर उतरलेल्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित सर्वात प्रभावी ठरला. पण, त्याने केलेली हाराकिरीच सर्वाधिक खळबळ उडवणारी होती. सर्व दडपण झुगारुन टाकत उत्तूंग फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्यावरच उलटला आणि तो बाद झाल्याने भारतीय चमूला मोठा फटका सोसावा लागला. चहापानानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने बराचसा खेळ होऊ शकला नाही आणि ही बाब तुलनेने नवख्या खेळाडूंचा संघ असलेल्या भारताच्या पथ्यावरच पडणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 369 धावा

दिवसाच्या प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने 5 बाद 274 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली आणि सर्वबाद 369 पर्यंत मजल मारली. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदर (3-89), थंगसरु नटराजन (3-78), शार्दुल ठाकुर (3-94) यांनी तिहेरी यश मिळवले तर सिराजने 77 धावात 1 बळी, असे पृथक्करण नोंदवले.

यजमान संघातर्फे नॅथन लियॉन (22 चेंडूत 24) व मिशेल स्टार्क (35 चेंडूत 20) यांनी अननुभवी भारतीय गोलंदाजांसमोर 39 धावांची भागीदारी साकारली आणि यामुळे ऑस्ट्रेलियाला 350 धावांचा टप्पा सर करता आला. आजवरची सांख्यिकी पाहता, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 350 व त्याहून अधिक धावा जमवल्या असताना या मैदानावर एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

रोहित म्हणतो, मला त्या फटक्याची खंत वाटत नाही!

कोणताही फलंदाज आपली विकेट फेकत नसतो. पण, बऱयाचदा फटके अचूक बसतात तर काही चेंडूवर कोणाचाही अंदाज चुकतो. मी देखील याला अपवाद नाही. तो चेंडू टप्प्यात असता तर सीमापारही जाऊ शकला असता. पण, माझे फटके अशाच पद्धतीचे असतात. त्यामुळे, ज्या पद्धतीने बाद झालो, त्याबद्दल मला खंत वाटत नाही, असे भारतीय सलामीवीर रोहित शर्मा म्हणाला. लियॉनच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर रोहितची खेळी संपुष्टात आली आणि याचे संतप्त पडसाद उमटले. त्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.

‘महत्त्वाच्या क्षणी बाद झालो, त्यामुळे निराशा होणे साहजिक होते. पण, मला हा फटका खेळल्याची खंत वाटत नाही. काही वेळा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण करणे महत्त्वाचे असते आणि लियॉनला पुढे सरसावून खेळण्यामागे तोच उद्देश होता. नॅथन लियॉन हा कल्पक गोलंदाज आहे आणि मी पुढे सरसावत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने चेंडूचा टप्पा खुबीने मागे ठेवला. या परिस्थितीत चेंडू पूर्ण हुकमतीने फटकावणे कठीण होते. अर्थात, असे फटके मी यापूर्वी देखील सर्रास खेळले आहेत. संघातील माझी भूमिकाही आक्रमक खेळाचीच आहे. त्यामुळे, मला व्यक्तिशः याची फारशी खंत वाटत नाही’, असे रोहितने पुढे तपशीलवार बोलताना म्हणाला.

वंशद्वेषी टिपणी झाल्याची भारतीय चाहत्याची तक्रार

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या या कसोटी लढतीच्या तिसऱया दिवशी प्रेक्षकांच्या गॅलरीत आपल्यावर वंशद्वेषी टीका झाल्याची व अगदी सुरक्षाधिकाऱयाने देखील शिवीगाळ केल्याची तक्रार एका भारतीय चाहत्याने नोंदवली आणि यावर एससीजी पदाधिकाऱयांनी चौकशी सुरु केली आहे. सिडनीतील रहिवासी कृष्ण कुमार या चाहत्याने ही तक्रार नोंदवली. त्याने एनएसडब्ल्यू व्हेन्यू कायदेतज्ञांकडे याबाबत दाद मागितली. ‘रायव्हलरी इज गूड, रेसिजम इज नॉट’, ‘नो रेसिजम मेट’, ‘ब्राऊन इनक्लजन मॅटर्स’, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया मोअर डायव्हर्सिटी प्लीज’, अशा आशयाचे बॅनर यावेळी प्रेक्षकांच्या गॅलरीतून झळकले होते. कृष्ण कुमारने याबाबत सुरक्षा निरीक्षकांना भेटण्याची विनंती केली असता त्यालाच त्यावेळी गॅलरीतून बाहेर जाण्यास सांगितले गेले.

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः डेव्हिड वॉर्नर झे. शर्मा, गो. सिराज 1 (4 चेंडू), मार्कस हॅरिस झे. वॉशिंग्टन, गो. शार्दुल 5 (23 चेंडू), मार्नस लाबुशाने झे. पंत, गो. नटराजन 108 (204 चेंडूत 9 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. शर्मा, गो. वॉशिंग्टन 36 (77 चेंडूत 5 चौकार), मॅथ्यू वेड झे. शार्दुल, गो. नटराजन 45 (87 चेंडूत 6 चौकार), कॅमेरुन ग्रीन त्रि. गो. वॉशिंग्टन 47 (107 चेंडूत 6 चौकार), टीम पेन झे. शर्मा, गो. शार्दुल 50 (104 चेंडूत 6 चौकार), पॅट कमिन्स पायचीत गो. शार्दुल 2 (8 चेंडू), मिशेल स्टार्क नाबाद 20 (35 चेंडूत 1 षटकार), नॅथन लियॉन त्रि. गो. वॉशिंग्टन 24 (22 चेंडूत 4 चौकार), हॅझलवूड त्रि. गो. नटराजन 11 (27 चेंडूत 2 चौकार). अवांतर 20. एकूण 115.2 षटकात सर्वबाद 369.

गडी बाद होण्याचा क्रम ः

1-4 (वॉर्नर, 0.6), 2-17 (हॅरिस, 8.1), 3-87 (स्मिथ, 34.1), 4-200 (वेड, 63.4), 5-213 (लाबुशाने, 65.5), 6-311 (पेन, 99.2), 7-313 (ग्रीन, 100.5), 8-315 (कमिन्स, 101.4), 9-354 (लियॉन, 108.2), 10-369 (हॅझलवूड, 115.2).

गोलंदाजी ः सिराज 28-10-77-1, टी. नटराजन 24.2-3-78-3, शार्दुल ठाकुर 24-6-94-3, नवदीप सैनी 7.5-2-21-0, वॉशिंग्टन सुंदर 31-6-89-3, रोहित शर्मा 0.1-0-1-0.

भारत पहिला डाव ः

रोहित शर्मा झे. स्टार्क, गो. लियॉन 44 (74 चेंडूत 6 चौकार), शुभमन गिल झे. स्मिथ, गो. कमिन्स 7 (15 चेंडूत 1 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 8 (49 चेंडू), अजिंक्य रहाणे खेळत आहे 2 (19 चेंडू). अवांतर 1. एकूण 26 षटकात 2 बाद 62.

गडी बाद होण्याचा क्रम ः 1-11 (शुभमन, 6.2), 2-60 (रोहित, 19.5).

गोलंदाजीः मिशेल स्टार्क 3-1-8-0, जोश हॅझलवूड 8-4-11-0, पॅट कमिन्स 6-1-22-1, कॅमेरुन ग्रीन 3-0-11-0, नॅथन लियॉन 6-2-10-1.

Related Stories

ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास भारताचा नकार नाही

Patil_p

ऍस्टन व्हिलाची अर्सेनलवर मात

Patil_p

मराठमोळ्या पृथ्वीराजने जिंकले जागतिक पदक

datta jadhav

क्रिकेट मैदानाबाहेरचे स्टार ………डकवर्थ आणि लुईस!

Patil_p

तिसऱया कसोटीसाठी भारतासमोर निवडीचा पेच

Omkar B

लंका दौऱ्यासाठी द्रविडकडे प्रशिक्षकपद – बीसीसीआय

Patil_p
error: Content is protected !!