तरुण भारत

व्यवस्थापनशास्त्र मानवी व्यवहारावर आधारित

निसर्गाचे काही नियम असतात. ज्यांना आपण वैश्विक नियम असेही म्हणतो. हे नियम सगळय़ांनीच पाळायचे असतात. जर ह्या नियमांत मनुष्य प्राण्याने स्वतःच्या सोयीनुसार बदल करण्यास सुरुवात केली तर निसर्ग मनुष्य प्राण्याला उत्तर द्यायला वेळ लावत नाही. जे नैसर्गिक असते ते मर्यादित स्वरूपातील असते पण त्यात आयुष्याचा आनंद मात्र अमर्यादितपणे घेतला जातो.

निसर्गाचे नियम हे मनुष्य प्राणी सोडला तर इतर सर्व प्राणी पाळताना दिसतात. त्यामुळे नैसर्गिक रीत्या उत्तम आयुष्यही ते जगतात. मनुष्य प्राण्याला मन आणि बुद्धी दिल्याने कधी मनाने तर कधी बुद्धीने निर्णय घेतला जातो. त्यामुळे बराच वेळा माणसाचा गोंधळ उडतो. हा गोंधळ दूर सारायचा असेल तर श्री समर्थांनी सांगितलेला दासबोध आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल.

Advertisements

अनेकवेळा आपल्याला जीवनाबाबत असे का असावे असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात बराच कालावधीही आपला वाया जातो. शेवटी उत्तर मिळत नाहीच. या करिताच दासबोधाचा सातत्याने अभ्यास करावा. प्रपंच आणि परमार्थ जर उत्तम साधायचा असेल तर आपल्याला निर्माण होणाऱया असंख्य प्रश्नांची उत्तरे ही श्रीसमर्थांच्या वाङ्मयात मिळतात. ह्या पृथ्वीवरील कुठलीही व्यक्ती जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध हे कर्माचे तीन प्रकार होत. या तिन्ही प्रकारांना कर्माच्या पायऱयाही म्हणता येऊ शकतात. या तीन पायऱया मनुष्याला ईश्वरापर्यंत नेऊ शकतात. ज्याप्रमाणे साप-शिडीचा खेळ बालपणात आपण खेळतो त्याप्रमाणे जर कर्म उत्तम केले तर शिडीच्या माध्यमातून वरचे स्थान प्राप्त करता येईल पण जर कर्म वाईट केले तर मात्र सापाच्या तोंडात अडकून खाली जावे लागेल. म्हणूनच उत्तम कर्म करण्याकडे आपला कल असावा. क्रियमाण कर्म म्हणजे जे कर्म केल्यावर तात्काळ फळ मिळते. उदा. तहान लागल्यावर पाणी प्यायल्यावर लगेच तहान भागते आणि घशाला पडलेली कोरड नाहीशी होते. संचित कर्म म्हणजे जे कर्म केल्यावर काही कालावधी नंतर फळ मिळते. उदा. परीक्षा दिल्यानंतर काही दिवसांनी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा परीक्षेचा निकाल लागतो. प्रारब्ध कर्म म्हणजे जे क्रियमाण किंवा संचित कर्म बऱयाच कालावधीनंतर फळ देते. उदा. 1857 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाचे फळ आपल्या देशाला 90 वर्षांनंतर मिळाले.  मनुष्यप्राण्याच्या हातात केवळ वर्तमान काळ असतो. हाच नियम व्यवस्थापनशास्त्रालाही लागू पडतो. वर्तमान काळात मनुष्य कसा वागतो आहे त्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून आहे. ह्याबाबत श्रीसमर्थ म्हणतात की,

 पेरिले ते उगवते! बोलिल्यासारखे उत्तर येते!!

व्यवस्थापनशास्त्र हे मानवी व्यवहारावर आधारित आहे. मनुष्य मनुष्याशी कसा व्यवहार करतो आहे त्यावरच व्यवस्थापनशास्त्राचा पाया भरभक्कमपणे उभा आहे. क्रियमाण कर्म जर चुकले तर त्याचे संचितात रूपांतरण होऊन कधी, कुठे आणि केव्हा प्रारब्ध भोगावे लागेल हे सांगता येत नाही. वर्तमानस्थितीत जे चांगले किंवा वाईट भोग मनुष्यप्राणी भोगत असतो ते त्याचे संचित किंवा प्रारब्धच असते. काही वेळेला भूतकाळातील संचित किंवा प्रारब्धाविषयीचे ज्ञान होते पण सहसा हे ज्ञान प्रत्येकाला होईलच असे शक्मय नसते. म्हणूनच भावना, शब्द आणि कृती ह्यांची नीट सांगड घालूनच क्रियमाण कर्म अतिशय प्रभावी आणि उत्तम करावे तरच भविष्यातील चांगली फळे मिळतील. श्रीसमर्थांनी जाणपण निरुपण समासात सांगितले आहे की,

जनांमध्ये जो जाणता !त्यास आहे मान्यता !

कोणी येक विद्या असतां !महत्व पावे !!

प्रपंच अथवा परमार्थ !जाणता तोचि समर्थ ! नेणता जाणिजे वेर्थ !निःकारण !!

18-19/04/09

म्हणजे, समाजामध्ये जो जाणता आहे त्याला लोक मानतात. कुठलीही विद्या ज्याच्या अंगी आहे त्यालाच महत्त्व आहे. प्रपंचात किंवा परमार्थात जो जाणता आहे तोच आपला प्रभाव पाडतो. जो नेणता आहे तो स्वतःचे आयुष्य व्यर्थ घालवतो.  व्यवस्थापनशास्त्रात श्रीसमर्थांनी सांगितलेले हे तत्त्व लागू होते. कारण, जो जाणता आहे तो/ती कुठल्याही औद्योगिक समूहात उत्तम कामगार, कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापक किंवा संचालक बनू शकतो/शकते. परंतु, ज्यांना कुठल्याही विषयात गती नाही, ज्ञान नाही त्यांना मात्र स्वतःचा प्रभाव निर्माण करता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान शून्य असते. म्हणूनच विद्या, विवेक, कौशल्य आणि बुद्धिमत्ता या गुणांनी समर्थ व्हावे तरच व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने किंमत प्राप्त होईल.

 व्यवस्थापनशास्त्रात जी जाणती व्यक्ती असते तीच उत्तम गुरुपद मिळवू शकते. कारण, प्रपंचात किंवा परमार्थात विवेक आणि साक्षेप हा खूप गरजेचा असतो. अनेकवेळा अशा प्रकारचा उत्तम मार्गदर्शक मिळणे कठीण होते आणि त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होते. उत्तम जाणकार कसा ओळखावा किंवा कसा ओळखू नये याकरिता श्रीसमर्थांनी प्रचितीनिरुपण समासात असे सांगितले आहे की,

मंत्र यंत्र उपदेसिले । नेणतें प्राणी तें गोविलें ।

जैसें झाकून मारिलें । दुखणाईत  ।।

वैद्य पाहिला परी कच्चा । तरी प्राण गेला पोराचा ।

येथें उपाये दुसऱयाचा । काये चाले  ।। 10/08/17-18

म्हणजे, आजारी मनुष्याला औषधौपचार केला नाही, तर त्याचा निश्चितच मृत्यू होणार. तसेच जे साधक भक्त आहेत त्यांना जर शुद्ध ज्ञान न देता जारण मारण उच्चाटन आदि मंत्र तंत्र आणि गंडेदोरे यांच्या नादी लावणारे गुरु भेटले तर अशा साधकांची उद्धाराची शक्मयताच नाही. अर्धवट शिकलेला अननुभवी वैद्याकडे  आजारी व्यक्तीला उपचारासाठी नेले आणि त्यामुळे त्याचा प्राण गेला तर कोण काय करू शकेल?  या ओव्यांचा अर्थ व्यवस्थापनक्षेत्राच्या बाबतीत असा लावला जाऊ शकतो की, एखाद्या औद्योगिक संस्थेत, सामाजिक संस्थेत जर काही जटिल प्रश्न असतील आणि ते प्रश्न सोडवण्याची पात्रता तेथील व्यवस्थापकांकडे नसेल तर मात्र ते प्रश्न गंभीर समस्यांचे स्वरूप धारण करू शकतात. जे प्रामाणिक कामगार, कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्यांना अतिशय जाणकार व्यवस्थापकाचीच आवश्यकता आहे. प्रभावी जाणकार मिळाले नाहीत तर मात्र त्यांच्या अडचणीत अधिकाधिक प्रमाणात वाढ होऊ शकते. ज्या व्यवस्थापकांना कुठल्याही विषयाची सखोल माहिती नाही त्यांच्यामुळे संबंधित संस्थेचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान कोणीही टाळू शकत नाही.

माधव किल्लेदार

Related Stories

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p

त्यांची ससेहोलपट टाळण्यासाठी…

Amit Kulkarni

पुतिन यांची हुकूमशाही आणि रशियातील असंतोष

Patil_p

बिळामाजी आस्वलमार्ग

Patil_p

‘आशा’दायक समझोता!

Patil_p

दुसऱया लाटेच्या भीतीने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था

Patil_p
error: Content is protected !!