तरुण भारत

शेकोटी संमेलनाची उत्साहात सांगता

कोरोना विषयावर चौफेर चर्चा : दोघा शिक्षकांचा सन्मान

प्रतिनिधी / फोंडा

कोकण मराठी परिषद, गोवाच्या 16 व्या शेकोटी साहित्य संमेलनाची रविवारी दुपारी सांगता झाली. केरी-फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानच्या सभामंडपात हे दोन दिवशीय संमेलन भरविण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अनुवादकार रवींद्र गुर्जर यांनी समारोपाच्या भाषणात विविध सत्रांचा आढावा घेतला. कोरोना या विषयावर साहित्यिक मंचावरुन झालेली चौफर चर्चा व एकंदरीत संमेलन रंगतदार ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर, सल्लागार प्रमुख ऍड. रमाकांत खलप, कार्याध्यक्ष नारायण महाले, कार्यवाह चित्रा क्षिरसागर, देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, सत्कारमूर्ती शिक्षक पी. ए. सुर्यवंशी व अनंत भांडणकर हे उपस्थित होते.

साहित्याची पालखी तरुणाईच्या खांद्यावर द्यावी : खलप

आपल्या प्रास्ताविक भाषणात रमाकांत खलप यांनी साहित्याची ही पालखी नव्या दमाच्या तरुणाईने खांद्यावर घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे तसेच महिला वर्गाचे या साहित्यिक उपक्रमात प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. यू टय़ूब व अन्य तांत्रिक माध्यमातूनही संमेलनाचा प्रचार व प्रसार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोव्याच्या विविध भागाबरोबरच कोकण प्रातांतील लेखक व नवसाहित्यिकांशी संपर्क वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला. गोव्यात मराठीला शासकीय स्तरावर समान भाषेचा दर्जा देऊनही तिचे स्थान डावण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जनमत कौलाचा वर्धापनदिन साजरा करताना पर्वरी येथील मराठी अकादमीच्या इमारतीसमोर ढोल बडवून उत्साह साजरा करण्याची कृती निंदनीय असल्याचे सांगून, मराठी अकादमी पुन्हा साहित्यक व साहित्यप्रेमींच्या ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केली.

मराठीचा गोमंतकीय जनमानसावर प्रभाव कायम : गो. रा. ढवळीकर

आपले मनोगत व्यक्त करतना मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर म्हणाले, मुक्तीपूर्व काळात गोव्यात भाषावाद कधीच नव्हता. मुक्तीनंतर कोकणीचे वेगळे अस्थित्त्व तयार करण्यात आले. मराठी ही गोमंतकीयांवर लादलेली नसून ती परंपराग आलेली आहे. गोव्यातील जनमानसावर मराठीचा प्रभाव अजून कायम आहे. गोव्यातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ध्वनीक्षेपकावर सूचना देताना हल्लीच मराठीचा वापर सुरु झाल्याबद्दल त्यांनी रेल्वे खात्याचे अभिनंदन केले.

शिक्षक सुर्यवंशी व भांडणकर यांना पुरस्कार प्रदान

शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेले निवृत्त कला शिक्षक पी. ए. सुर्यवंशी व निवृत्त मुख्याध्यापक अनंत भांडणकर यांना शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन संमेलनाध्यक्ष गुर्जर व रमाकांत खलप यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात शिक्षण क्षेत्रातील आपले अनुभव कथन केले. सागर जावडेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाजी कुलकर्णी यांनी तर नारायण महाले यांनी आभार मानले. सकाळच्या पहिल्या सत्रात झालेल्या चाफा कवीसंमेलनात चंद्रशेखर गावस, स्वरांग धुपकर व प्रज्वलीता गाडगीळ यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकाची तीन पारितोषिके प्राप्त झाली. संमेलनाध्यक्षांकडून कविता व वसंत ऋतु असे दोन विषय देण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.

Related Stories

सरकारच्या धोरणामुळे लोकांचे जीवन धोक्यात

Omkar B

खाणबंदी, म्हादई विषयात पेंद्राने हस्तक्षेप करावा

Patil_p

पर्यटक, अन्य बिगरगोमंतकीयांनी गोव्यात येण्यावर त्वरित बंदी घाला

Omkar B

कुंडईत जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ

Omkar B

सरासरीनुसार कोरोना रुग्ण, मृतांचे प्रमाण कमीच

Omkar B

डिचोलीचा प्रसिध्द ‘नवा सोमवार’ उत्सव आज

Patil_p
error: Content is protected !!