तरुण भारत

सरकारी नोकऱयांच्या जाहिराती लवकरच

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युवा संमेलनात दिली माहिती : विविध सरकारी योजनांचा फायदा घेण्याचे

प्रतिनिधी / कुडचडे

Advertisements

आपण या अगोदर दहा हजार सरकारी नोकऱया देण्याचे जाहीर केले होते. पण विविध कारणांमुळे त्यावर शिक्कामोर्तब करायला मिळाले नव्हते. मात्र येणाऱया 15 ते 20 दिवसांत विविध खात्यांमधील नोकऱयांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुडचडे येथे आयोजित स्वामी विवेकानंद युवा संमेलनात बोलताना सांगितले.

भारतीय जनता पक्षातर्फे कुडचडे रवींद्र भवनात आयोजित स्वामी विवेकानंद युवा संमेलनात ते बोलत होते. या युवा संमेलनातील कुडचडे मतदारसंघातील युवावर्गाची उपस्थिती पाहून अत्यंत आनंद होत आहे व खात्री झाली आहे की, तडफदार स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांच्यासारखेच कुडचडेतील युवाही तडफदार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विवेकानंदांच्या संस्कारांची जाणीव ठेवावी

स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या संस्कारांची जाणीव ठेवून त्या संस्कारांचा सर्वांनी उपयोग करावा. हे आपले पहिले कर्तव्य आहे. कारण ज्या काळात व परिस्थितीत स्वामी विवेकानंदांनी आपले शिक्षण पूर्ण केले व भारत देशाचे भ्रमण करण्याचा निश्चय केला त्यावेळी त्यामागे कोणताच स्वार्थी हेतू नव्हता. आपल्या देशातील बांधवांची खरी स्थिती बघण्यासाठी त्यांनी भ्रमण केले, असे सावंत म्हणाले.

समाजसेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा

विवेकानंदांनी जे ज्ञान आत्मसात केले त्यातून त्यांनी युवा पिढीला स्थिर राहण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या. त्यात शरीरिक सेवा, बौद्धिक सेवा, आध्यात्मिक सेवा, समाजसेवा व त्यांच्यासोबत आवश्यक राष्ट्रसेवा आहे. आज प्रत्येकजण अशी सेवा करतात. पण आपण स्वतः पाहावे लागेल की, खरेच आपण ही सेवा व्यवस्थित करतो की नाही. त्यात समाजसेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा असून त्यामुळे आनंद मिळण्याची जास्त शक्मयता असते, असे सावंत यांनी सांगितले.

सरकारी योजनांचा लाभ घ्यावा

आज सरकार ज्या योजना लोकहितासाठी राबवत आहे त्यातील किती तरी योजना कित्येक लोकांना माहीतसुद्धा नाहीत. कारण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. त्यासाठी युवा पिढीने पुढे पाऊल टाकले पाहिजे. तर कित्येक कुटुंबांच्या घरांत आनंद येऊ शकतो व योग्य ती समाजसेवा घडू शकते. आजच्या पिढीने फक्त सरकारी नोकरीचा ध्यास घेऊन राहण्यापेक्षा सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या भविष्याला चांगले वळण द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वीजमंत्री नीलेश काब्राल, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांदेकर, कुडचडे भाजप अध्यक्ष विश्वास सावंत, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळय़ेकर, संजय सातार्डेकर, वक्ते जयंत जाधव, सुरज परब, किशन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

युवावर्गाने आपल्या अडचणी मांडाव्यात

कुडचडेतील युवक, युवती म्हणजे जणू आपल्या मुलांसारखी आहेत. त्यांचे भवितव्य चांगले होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहेच. पण युवांनी पुढे येऊन त्यांच्या अडचणी सांगितल्या, तर त्या लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. कुडचडेतील शिक्षित युवक-युवतींनी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांचा फायदा घ्यावा व विविध क्षेत्रांमध्ये आपली हुशारी दाखवावी, असे आवाहन काब्राल यांनी केले.

युवा पिढी आपल्या ध्येयावर अटळ राहिली, तर त्यांची कोणीच दिशा बदलू शकणार नाही. आज भाजप सरकार लोकांच्या हितासाठी विविध योजना पुढे आणत आहे. काही दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता युवावर्गाने सरकारची मदत घ्यावी व स्वतःच्या अडचणी मांडाव्यात. त्यावर सुरळीतपणे मार्ग सापडणार, असे उद्गार तानावडे यांनी यावेळी काढले.

जाधव यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवन व कार्य याबद्दल, सातार्डेकर यांनी सरकारी योजनांसंबंधी, तर कुंकळय़ेकर यांनी महामारीच्या काळात सरकारने जनतेस कशी सेवा दिली त्यावर माहिती दिली. मांद्रेकर यांनी स्वागत केले. यावेळी चारशेहून जास्त युवक-युवती, माजी नगरसेवक, पंच, सरपंच, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

कुडतरीच्या आमदारांनी केली होती मागणी

Omkar B

कुडचडेत आणखी 8 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी

Amit Kulkarni

बाळ्ळी पंचायतीकडून मान्सूनपूर्व कामांना वेग

Omkar B

ड्रग्स विरोधात आपली भूमिका कायम

Omkar B

म्हावळींगेत फायर रेंजमुळे घडणारे प्रकार गंभीर बंदुकीच्या गोळय़ा माणसांना लागणे दुर्दैवी.

Amit Kulkarni

उमेश तळवणेकर यांचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!