तरुण भारत

खेडमध्ये तीन महिन्यांत पाचवेळा गावठी हातभट्टय़ांचे तळ उद्ध्वस्त

पोलीस यंत्रणा जोमात, स्थानिक उत्पादन शुल्क कोमातच,

राजू चव्हाण / खेड

Advertisements

एकीकडे संसारात विघ्न आणणाऱया गावठी दारूच्या हातभट्टय़ांचे तळ उद्ध्वस्त करून जंगलमय भागात बेकायदेशीररित्या दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱयांचे कंबरडे मोडण्याचे काम येथील पोलिसांकडून सुरू आहे. मात्र असे असतानाच उत्पादन शुल्क खाते निद्रिस्तच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या तीन महिन्यात येथील पोलिसांनी 5 वेळा धाडी टाकत 15 लाखाहून अधिक रूपये किंमतीचा ऐवज जप्त करत दारू व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला आहे. तब्बल 16067 लिटर दारूचे रसायन हस्तगत केल्याची माहिती पुढे आली आहे.

 गेल्या अनेक वर्षांपासून कुळवंडी, तिसंगी, खोपी आदी गावांतील जंगलमय भागासह नदीकिनारी गावठी दारूच्या हातभट्टय़ा धगधगत होत्या. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की येथे रूजू झाल्यापासून हातभट्टय़ांवर कोणत्याही क्षणी धाडी टाकून हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली. विशेषतः पहाटेच्या सुमारास अचानक धडक कारवाईची मोहीम राबवत दारू व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचे काम येथील पोलिसांकडून सुरू आहे. या धाडसत्राने अवैधरित्या गावठी दारूचा व्यवसाय करणाऱयांचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यातच पोलिसांनी कारवाईत सातत्य राखल्याने अवैधरित्या व्यवसाय करणारे कोंडीत अडकले होते.

  कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सारेच व्यवसाय ठप्प झाल्यानंतर अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसायदेखील बंदच होता. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊन उठताच गावठी हातभट्टय़ा पुन्हा धगधगू लागल्या. तालुक्यातील खोपी, तिसंगी, कुळवंडी, घेरारसाळगड आदी गावठी हातभट्टीची दारू धगधगणारी केंद्रे आहेत. या गावातील जंगलमय भागासह नदीकिनारी राजरोसपणे धगधगणाऱया हातभट्टय़ांचा फारसा सुगावा लागत नाही.

 मात्र पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी नामी शक्कल लढवत कोणत्याही क्षणी धाड टाकताना सकाळच्या सुमारास धगधगणाऱया गावठी हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्याची मोहीम नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा हाती घेतली. 8 नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम खोपी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीच्या दारूअड्डय़ावर धाड टाकून एक लाख 4 हजार 850 रूपयांचा ऐवज जप्त केला. यानंतर 2 डिसेंबर रोजी तिसंगी-खोपकरवाडी येथील जंगलमय भागात धाड टाकून 3 लाख 30 हजार 350 रूपयांचा ऐवज जप्त केला.

 पोलिसांचे धाडसत्र सुरू असतानाही लपूनछपून दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱयांचे प्रमाण थांबता थांबेनासे झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी फौजफाटा दिमतीला घेत पुन्हा सकाळच्या सुमारास गावठी हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार 13 डिसेंबर रोजी तिसंगीतील जंगलमय भागात सकाळच्या सुमारास धाड टाकून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. 5 जानेवारी रोजी तिसंगी नदीकिनारी धगधगणाऱया दोन हातभट्टय़ांवर धाड टाकून तीन लाख 3 हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला. या कारवाईनंतर तिसऱयाच दिवशी पुन्हा कुळवंडी येथे दारूअड्डय़ावर धाड टाकून 5 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.

एकीकडे पोलिसांकडून अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱयांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे मात्र धगधगणाऱया हातभट्टय़ा स्थानिक उत्पादन शुल्क खात्याच्या निदर्शनास येत नाहीत याचेच आश्चर्य वाटते. पोलिसांनी हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्यानंतरही पुन्हा जंगलमय भागात छुप्या पद्धतीने गावठी दारूच्या हातभट्टय़ांचे तळ ठोकण्याचे धाडस दारू व्यावसायिकांचे होतेच कसे? हादेखील यक्षप्रश्नच आहे. पोलिसांच्या धडक कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र बेफिकीरपणे वागत दारू व्यावसायिकांना अभय देणाऱया उत्पादन शुल्क खात्याच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

कोरोनाने आणखी 15 जणांच्या मृत्यूची नोंद

Patil_p

पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केले ‘कोविड सेंटर’

Patil_p

मालकाच्या गीताने मंत्रमुग्ध होऊन मालकाच्या पाठी हुबेहूब जाणारी जिमी (डॉग)

Patil_p

कोल्हापुरात कोरोना रुग्ण संख्या सातशे पार

Abhijeet Shinde

कोल्हापूर नाक्यावर 460 कोटींचा सहापदरी उड्डाणपूल होणार

Patil_p

नाणार परिसर जमीन व्यवहार;

Amit Kulkarni
error: Content is protected !!