तरुण भारत

आला रे आला, अजिंक्य आला!

ऑस्ट्रेलिया गाजवून येणाऱया अजिंक्यसेनेचे मुंबईत ढोल-ताशाच्या गजरात शानदार स्वागत, अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहितसह 5 जण मुंबईत दाखल

वृत्तसंस्था / मुंबई-नवी दिल्ली

Advertisements

ऑस्ट्रेलियात मागील 33 वर्षात जागतिक स्तरावर जे कोणालाच शक्य झाले नव्हते, तो पराक्रम गाजवणाऱया अजिंक्यसेनेचे गुरुवारी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर थाटात स्वागत केले गेले आणि यावेळी एकच गजर दुमदुमला, आला रे आला, अजिंक्य रहाणे आला!

पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा, मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुर, सलामीवीर पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर उतरले तर ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा हिरो ऋषभ पंत पहाटे नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला.

या दौऱयासाठी नेट बॉलर म्हणून निवडल्या गेलेल्या, पण, नंतर या एकाच दौऱयात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पणाची संधी मिळालेला टी. नटराजन बेंगळूरमध्ये उतरल्यानंतर तामिळनाडूतील सालेम या आपल्या गावी रवाना झाला. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, नवोदित वॉशिंग्टन सुंदर व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे चेन्नईनिवासी सध्या दुबईत आहेत आणि शुक्रवारी पहाटे ते भारतात दाखल होतील, अशी अपेक्षा
आहे.

मुंबईत उतरल्यानंतर रहाणे, शास्त्री, रोहित, शार्दुल, शॉ यांचे मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी स्वागत केले. एमसीए अध्यक्ष विजय पाटील, कार्यकारिणी सदस्य अजिंक्य नाईक, अमित दाणी, उमेश खानविल्का यावेळी हजर राहिले. रहाणेच्या हस्ते केक कापून संघाचा विजय साजरा केला गेला. अर्थात, रहाणे माटुंग्यातील आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाला, तेथे त्याचे आणखी जंगी स्वागत केले गेले, रहाणेचे निवासस्थान असणाऱया संकुलात सर्व रहिवाशांनी फुलांची आरास करत रहाणेचे ढोलच्या गजरात स्वागत केले. शिवाय, त्याच्यावर पुष्पवृष्टीही केली गेली. रहाणेने संकुलात दाखल झाल्यानंतर चाहत्यांसमवेत फोटोसेशन केले. शिवाय, या स्वागताप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. रहाणेची पत्नी व 2 वर्षांची कन्या यावेळी समवेत होते.

सिराज विमानतळावरुन थेट दफनभूमीत…

आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी हजर न राहू शकलेल्या मोहम्मद सिराजने बुधवारी हैदराबादमध्ये दाखल झाल्यानंतर थेट दफनभूमीचा रस्ता धरला आणि वडिलांच्या कबरीजवळ पोहोचल्यानंतर साहजिकच त्याचे अश्रू अनावर झाले.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर असताना सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. संघव्यवस्थापनाने सिराजला मायदेशी जाण्याचा पर्याय दिला होता. पण, त्याने संघहिताला प्राधान्य देत ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला. सिडनी कसोटी सामन्यावेळी राष्ट्रगीत गायले जात असताना सिराजला अश्रू थांबवता आले नव्हते.

सिराजचे 53 वर्षीय वडील रिक्षा ड्रायव्हर होते. त्यांचे दि. 20 नोव्हेंबर रोजी फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले. त्याच्या आठवडाभरापूर्वीच सिराज भारतीय संघासह ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. या मालिकेत सिराजने मेलबर्नमधील दुसऱया सामन्यात कसोटी पदार्पण केले आणि मालिकेत 13 बळींचा विक्रम नोंदवला. भारतीय संघातर्फे पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक बळींचा हा नवा विक्रम आहे. यापूर्वी जे. श्रीनाथने 10 बळींचा विक्रम केला होता.

सिराजचा गौप्यस्फोट, पंचांनी ती कसोटी सोडण्याचा पर्याय दिला होता!

सिडनी कसोटी सामन्यादरम्यान स्थानिक चाहत्यांकडून वंशवादी टिपणी झाली, त्यावेळी मैदानी पंचांनी आम्हाला ही कसोटी अर्ध्यावर सोडून देण्याचा पर्याय दिला होता, असा गौप्यस्फोट भारतीय जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने केला. सिराज व त्याचा वरिष्ठ सहकारी जसप्रित बुमराहला एससीजीवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या टिपणीला सामोरे जावे लागले होते.

सिराजला काही प्रेक्षकांनी ‘ब्राऊन मंकी’ असे संबोधले आणि सिराजने त्याची कल्पना हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेला दिली होती. यानंतर भारतीय संघव्यवस्थापनाने याबाबत सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याकडे तक्रार दाखल केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलगिरी व्यक्त केली आणि यामुळे त्यावर पडदा पडला होता. काही काळ खेळ थांबवल्यानंतर 6 प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर काढले गेले.

सिराज या घटनेबद्दल बोलताना म्हणाला, ‘मैदानी पंचांनी आम्हाला सामना निम्म्यावर सोडून देण्याचा पर्याय दिला होता. पण, अजिंक्य भाई म्हणाला की, आम्ही काहीही चूक केलेली नाही. त्यामुळे, आम्ही सामना सोडणार नाही. आम्ही पुढे खेळू. अर्थात, त्यावेळी टिपणी केली गेल्यानंतर मला आणखी स्फुरण चढले. मी आणखी त्वेषाने खेळलो. मानसिकदृष्टय़ा खंबीर झालो. एका अर्थाने याचा आम्हाला लाभच झाला’.

‘खडूस’ ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव

एरवी ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक करण्यात खडूस मानली जातात. पण, भारतीय संघाने यजमानांविरुद्ध मालिकाविजयाचा पराक्रम गाजवल्यानंतर याच माध्यमांनी संघावर स्तुतिसुमनांचा अक्षरशः वर्षाव केला. द डेली टेलिग्राफ, सिडनी, द ऑस्ट्रेलियन, द वेस्ट ऑस्ट्रेलियन, द मर्क्युरी, द हेरॉल्ड सन आदी दैनिकांचा यात प्राधान्याने समावेश आहे.

बॉलरुम डान्सरप्रमाणे सहज फुटवर्क असलेल्या युवा सलामीवीर शुभमन गिलचे आपल्या खेळाडूंनी बारीक निरीक्षण केले असेल. अर्थात, भारतीय खेळाडूंनी नवी उंची गाठली आहे आणि भविष्यातही ते याचीच पुनरावृत्ती करत राहतील, असे द डेली टेलिग्राफने म्हटले.

हेल्मेटवर, खांद्यावर, कमरेवर चेंडूचे आघात सोसूनही ठाण मांडून राहिलेल्या पुजाराचे करावे तितके कौतुक कमी आहे, असे प्रशंसोद्गार द ऑस्ट्रेलियनने काढले. भारतीय संघाने जो धाडसी खेळ साकारला, तो पुढील आणखी 90 वर्षात ब्रिस्बेनवर कितीही कसोटी सामने भरवले, तरी दिसणार नाही, असे द वेस्ट ऑस्ट्रेलियाने नमूद केले. गब्बावरील हे वादळ कोणालाच अपेक्षित नव्हते, असे द मर्क्युरीने म्हटले तर द हेराल्ड सनने यापूर्वी ऑस्ट्रेलिया जी हुकूमत गाजवायचे, ते भारताने गाजवले, असे नमूद केले.

Related Stories

पाकचे झिम्बाब्वेला 282 धावांचे आव्हान

Patil_p

केकेआर-आरसीबी मुकाबला आज

Patil_p

मार्टिन स्नेडन न्यूझीलंड क्रिकेटचे नवे अध्यक्ष

Omkar B

जलतरणपटू श्रीहरी नटराजचे दुसरे सुवर्णपदक

Patil_p

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Rohan_P

लकी मैदानावर राजस्थान दिल्ली कॅपिटल्सला रोखणार?

Patil_p
error: Content is protected !!