तरुण भारत

इफ्फी: चित्रपटामध्ये सर्व प्रकारचे संगीत समावले पाहिजे : प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन

पणजी/प्रतिनिधी

गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 51 व्या इफ्फीमध्ये अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गुरुवारी ‘इन-कन्व्हर्सेशन’ या सत्रामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन आणि ज्येष्ठ तालवादक विक्रम घोष यांनी चित्रपटातील संगीत, गाणी याविषयी आभासी माध्यमाव्दारे चर्चा केली.

लोकप्रिय पार्श्‍वगायक हरिहरन यावेळी म्हणाले, ‘‘समाजाबरोबरच समकालीन चित्रपटाचे संगीतही आता बदलले आहे. 50 च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांचे प्रमाण जास्त होते त्यावेळच्या गाण्यांवर भारतीय शास्त्रीय संगीताचा पगडा होता.’’ चित्रपट संगीतामध्ये झालेल्या उत्क्रांतीविषयी भाष्य करताना विक्रम घोष म्हणाले, ‘‘ ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी प्रदर्शित होणा-या चित्रपटांमध्ये भारतीय असले पाहिजे, यावर भर देऊन तसे भाष्य केले जात होते, त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारतीयत्वाचा मार्ग दाखवला गेला.’’

यानंतरच्या काळाविषयी बोलताना हरिहरन म्हणाले, ‘‘ 70 च्या दशकामध्ये हिंदी सिनेमासृष्टीत वास्तववाद सिनेमांची लाट आली होती. याला काहीजण कलात्मक चित्रपट असेही म्हणतात. अशा कलात्मक, वास्तववादी सिनेमांमध्ये गाण्यांची संख्या फारच कमी असायची. मात्र 90 च्या दशकामध्ये चित्रपट गाण्यांच्या परीघात अगदी नाट्यमय रितीने परिवर्तन घडून आले.’’

संगीतकार नौशाद यांनी गंगा-जमुना या चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंगीताचा वापर केला. या चित्रपटाचे संपूर्ण पार्श्‍वसंगीत ललित आणि मारवा या रागांवर आधारित होते. त्यामुळ चित्रपटातल्या दृश्यांना खोली निर्माण झाली. चित्रपट संगीताचा हा अतिशय सुरेल कालखंड होता, त्या काळामध्ये पार्श्‍वगायक आणि संगीतकार यांच्यामध्ये अतिशय सुरेख मेळ साधला जात होता, त्याचे प्रतिबिंब कर्णमधूर गाण्यातून दिसून येते.

याप्रसंगी विक्रम घोष म्हणाले की, चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान यांच्या आगमनानंतर चित्रपट संगीताने एक नवीन आणि महत्वपूर्ण वळण घेतले, असे म्हणता येईल. रहमान यांनी चित्रपटांना संगीत देताना मोठ्या संख्येने वाद्यांचा वापर सुरू केला. इलियाराजा आणि आर.डी. बर्मन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांविषयीही यावेळी चर्चा झाली. हरिहरन म्हणाले, इलियाराजा यांच्या ‘अन्नाकली’मध्ये तमिळ लोकसंगीत आणि कर्नाटक संगीत यांचा अतिशय सुरेल मेळ घालण्यात आला आहे. तर विक्रम घोष म्हणाले, ज्या काळामध्ये दक्षिणेकडच्या चित्रसृष्टीवर इलियाराजा ‘अधिराज्य गाजवत’ होते, त्याचवेळी पंचमदा मुंबई चित्रपटसृष्टीतले सर्वात लोकप्रिय संगीतकार होते. त्यांनी आपल्या संगीतामध्ये अनेक ट्रॅक आणून पाश्चत्य संगीत रूळवले. आर.डी. बर्मन यांनी अॅफ्रो-क्युबन आणि लॅटिन संगीताचे रूपांतरण करून त्याला भारतीय बाज दिला.’’

साधारण 70 च्या दशकापासून दक्षिण भारतीयांनाही बॉलिवूड संगीताची गोडी लागली, असे गायक हरिहरन यावेळी म्हणाले. प्रख्यात चित्रपट निर्माते सत्यजित रे हे उत्कृष्ट संगीतकारही होते, त्यांच्या संगीतिक कारकिर्दीविषयीही या सत्रामध्ये चर्चा करण्यात आली. त्यांनी बंगाली चित्रपटासाठी ब-याच दक्षिण भारतीय वाद्यांचा, नादांचा वापर केला आहे. सत्यजित रे यांनी आपल्या ‘गोपी गेन बाघा बेन’ या चित्रपटामध्ये दक्षिण भारतीय संगीताचा आकर्षक वापर केला आहे, असे विक्रम घोष यांनी यावेळी सांगितले.

सध्याच्या काळात चित्रपटातल्या संगीताविषयी सकारात्मक टिपणी करताना घोष म्हणाले, आता हिंदी चित्रपट देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तयार होतात, त्यामुळे त्या त्या भागातले लोकसंगीत, स्थानिक संगीत यांचा प्रभाव नक्कीच पडतो. यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळते आणि ते आता लोकप्रियही होत आहे.

हरिहरन यावेळी म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात संगीतामध्ये सूक्ष्मता पाहिली जात नाही, ती कुठेतरी हरवून गेली आहे, असे जाणवते. मात्र संगीतातल्या श्रृती, सूक्ष्मता यांची आपल्या मनाला आवश्यकता नक्कीच असते. ज्याप्रमाणे नृत्यामध्ये नर्तकीने घेतलेली एखादी गिरकी आनंद देते, त्याचप्रमाणे गाण्याच्या श्रृती काम करीत असतात, त्या अलिकडच्या काळात हरवल्या आहेत, असे मनोगत विक्रम घोष यांनी व्यक्त केले.

Advertisements

Related Stories

मडगावात शनिवारी सरकार विरोधात जाहीर सभा

Omkar B

बेपत्ता सैनिकांचे मृतदेह सापडले; शहीद जवानांची संख्या नऊवर

Abhijeet Shinde

आर्थिक सुबत्ता हेच महिलांचे खरे सशक्तीकरण

Amit Kulkarni

यूपी : मुलायम सिंह यादव यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Rohan_P

हरियाणात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 19,369

Rohan_P

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार

datta jadhav
error: Content is protected !!