तरुण भारत

स्व.यशवंतरावांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल

प्रतिनिधी / कोल्हापूर

यशवंतराव चव्हाण यांना सामान्य माणसाप्रती आस्था होती. देशाचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱया चव्हाण यांच्या पश्चात पुस्तके, ग्रंथ ही त्यांची एकमेव संपत्ती होती. त्यांनी देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवला. जिल्हा परिषद आवारातील त्यांचा पुतळा पाहून सर्वसामान्य माणसाला दिलासा आणि भरवसा मिळेल. तर सदस्य, अधिकारी यांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा खासदार शरद पवार यांनी केले.

जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे प्रदान केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, चौथा मजला बांधकामाचा शुभारंभ खासदार पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर पोलीस क्रीडांगणावर 39 रुग्ण वाहिकांचे लोकार्पण, दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वितरण, राजर्षी शाहू पुरस्कार वितरण तसेच आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, पी.एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, ऋतुराज पाटील उपस्थित होते.

Advertisements
अधिकाऱयांनी अयोग्य काम नाही म्हणायला शिकावे 

पवार म्हणाले, सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱया चव्हाण यांचे काम हिमालयाएवढे मोठे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण झाले तरच विकासाची फळे राज्यातील सामान्य लोकांना मिळतील या उद्देशाने पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. केंद्रीत सत्ता केंव्हाही भ्रष्ट होते यासाठीच अनेक लोकांच्या हातात सत्ता असावी यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करुन पंचायत राज मधील सदस्यांना अधिकार देण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांच्या काळात झाले. यातूनच राज्यातील पंचायत राज व्यवस्था बळकट झाल्या. जे काम अयोग्य आहे त्याला नाही म्हणायला शिका, जे योग्य आहे त्याला होय म्हणा ही भूमिका अधिकाऱयांनी घेतली पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

      देशात महाराष्ट्राचा ठसा उमठवला

देशात महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा ठसा यशवंतराव चव्हाण यांनी उमठविला असल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले, देशातच नाही तर देशाबाहेरही त्यांचे नाव ऐकायला मिळते. राज्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात रोवली गेली. औद्योगिक वसाहती निर्माण झाल्याने रोजगार निर्मिती होऊन महाराष्ट्राचा विकासामध्ये चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले नेतृत्वाची खाण शोधून संपूर्ण राज्यात नेतृत्वाची फळी निर्माण केल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेऊन जि.प.सदस्यांनी काम करावे

अध्यक्षीय भाषणात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, पंचायत राजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सदस्यांनी चांगले काम केले, तर पंचायत राज नेते घडविणाऱया कार्यशाळा होतील, असा उल्लेख चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला होता. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे ही त्यांची भावना होती. चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्या बँक खात्यावर अवघे 36 हजार रुपये होते. या साधेपणाचा आदर्श घेऊन जिल्हा परिषद सदस्यांनी काम करावे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यच नव्हे तर देशाच्या राजकारणाला दिशा दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझ्यावर ग्रामविकासमंत्री पदाची मोठी जबाबदारी सोपवली. ग्रामविकासचे काम कसे करावे ? हे दिवंगत नेते आर.आर.पाटील व सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून शिकलो. म्हणूनच गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत तब्बल 26 अद्यादेश काढून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पस्ट केले.

 यशवंतराव चव्हाण यांनी पंचायतराज व्यवस्थेचा पाया घातला

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 1960 साली नव्या राज्याचे नेतृत्व करताना चव्हाण पंचायतराज व्यवस्थेचा पाया घातला. विकासाची घडी बसवली. याच विचारावर राज्य पुढे जात आहे. त्याला घटनात्मक स्वरुप आले. त्याची आठवण नव्या पिढीला व्हावी आणि ती पुतळ्याच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. देशाला दिशा देणाऱया त्यांच्या जीवनाचे अनुकरण आपण सर्वांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

     आज इतिहासाचे नविन पान उलघडले

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, इतिहासाचे नवीन पान आज उलघडले आहे. पुतळ्याच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याचा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाण्याचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना थेट खात्यात अनुदान देणारी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात एकमेव असेल. कोरोनाच्या काळात रेमडिसिव्हीर मोफत देण्याचा निर्णय जिह्याने घेतला, असे सांगून कोल्हापूर ते पुणे हायवेला लागून रेल्वे मार्ग व्हावा यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा वैचारिक पाया मजबूत केला

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, स्व. चव्हाण महाराष्ट्रातील वैचारिक पाया मजबूत करण्याचे काम केले. राज्याचा सुवर्ण कलश आणणाऱया चव्हाण यांचा भविष्य काळाकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन होता. सत्ता विकेंद्रीत असावी ही भूमिका स्वीकारुन व्यापक स्वरुपात पंचायत राज सुरु केले. देशातील इतर राज्यात या पद्धतीने कार्यक्षमतेने काम दिसणार नाही. बहुजन समाजाला ताकद देण्याचे काम त्यांनी कृतीतून केले आहे.

    कोरोनाकाळात प्रशासनाचे उत्कृष्ट काम - पालकमंत्री

राजकारण आणि प्रशासन हातात हात घालून काय जनतेला उच्च सेवा देवू शकतात याचा अनुभव कोरोना महामारीत कोल्हापूरकरांना आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सीईओ अमन मित्तल यांच्यासह तत्कालिन सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी कोरोना आटोक्यात आणण्यासह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत जनतेची मने जिंकली असे गौरवोद्गार पालकमंत्री पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई, मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, नवे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्ष शैलेश बलकवडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी,पंचायत समिती सभापती उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : क्लिनिकमधील डॉक्टर ठरताहेत तारणहार!

Abhijeet Shinde

बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये अद्यावत मशिनरी

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीचा झेंडा, भाजपला धक्का

Abhijeet Shinde

जय भगवान गोयल यांच्या प्रतिमेला ‘कोल्हापुरी’चा मार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हाळोलीत हत्तीचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लॅंटच `ऑक्सिजन’वर !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!