तरुण भारत

पाटण तालुक्यात कोरोनाची बेकायदेशीर रक्त चाचणी?

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोविड रक्त चाचणी करण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील लॅब मालक आणि डॉक्टर या दोघांनी संगनमताने बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीची कोविड रक्त चाचण्या करून सर्वसामान्य रुग्णांना लुबाडल्याची तक्रार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली असल्याने जिह्याचा आरोग्य विभाग चांगलाच हादरला आहे.

Advertisements

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवसरी (ता. पाटण) येथील दत्तात्रय राजाराम उदुगडे यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते शेतकरी असून 14 नोव्हेंबरला थकवा व कणकणी जाणवल्याने मल्हारपेठ येथील डॉ. वनारसे हॉस्पिटलमध्ये गेले. तपासणी झाल्यानंतर डॉ. वनारसे यांनी त्यांना सलाईन लावले. सलाईन संपल्यानंतर साधारण सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी रक्ताची चाचणी व कोविड चाचणी करायची आहे, असे सांगितले. या चाचणीसाठी डॉ. वनारसे यांनी यशवंत लॅबोरेटरीजमधील मुलगा बोलवून रक्त घेतले. थकवा असल्याने आपण तेथेच हॉस्पिटलमध्येच झोपलो होतो. साधारण 11 वाजता चाचणी अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी चाचणी फी म्हणून 7,500 रुपये जमा करण्यास सांगितले. ती जमा केल्यानंतर चाचणी अहवाल मुलीकडे दिला. वडील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही कोविड सेंटर मरळी येथे दाखल व्हा, असे सांगितले. तशी चिठ्ठी लिहून दिली. त्याचदिवशी मी मरळी येथे ऍडमिट झालो. 19 नोव्हेंबरला जम्बो कोविड सेंटर सातारा येथे उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर 7 डिसेंबरला घरी पाठविण्यात आले.

  या सर्व घटनाक्रमात आमच्या नातेवाईकांना आजाराची माहिती मिळाली. त्यांनी रक्त चाचणी अहवाल बघितल्यानंतर ओळखीच्या पुणे येथील डॉक्टरांकडे चौकशी केली. त्या चाचणी अहवालामधील कोविड ऍन्टीबॉडीज व कोविड प्रोफाईल ही चाचणी कोविड आरटीपीसीआर ही चाचणी करण्यापूर्वी कशी काय केली? अशी विचारणा केली. आपण विलगीकरण्यात असल्यामुळे याबाबत 13 डिसेंबर 2020 रोजी नातेवाईकांनी सकाळी 11 वाजता डॉ. वनारसे यांना समक्ष व यशवंत लॅबोरेटरीज्चे मालक अनिल इनामदार यांना फोनवर विचारणा केली. इनामदार यांनी फोनवरुनच तुमचा काय संबंध? असा प्रश्न करत तुम्हालाच खोटय़ा गुन्हात अडकविन, अशी धमकी दिली.

  दरम्यान डॉ. वनारसे व यशवंत लॅबोरेटरीज् मालक अनिल इनामदार यांनी माझ्या संमतीविना रक्त चाचणी केली. सदरची रक्त चाचणी करण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी दोघांनी घेतली नाही. सदरच्या चाचण्या करण्याची यशवंत लॅबोरेटरीजला परवानगी नाही. तरी सध्दा माझी रक्त चाचणी करुन कोविड ऍन्टीबॉडी चाचणी निगेटेव्ह असताना त्यांना कोरोना पॉझिटिव्ह सांगितले. यामुळे कुटुंबियात भीती निर्माण झाली. मानसिक त्रास झाला. डॉ. वनारसे व यशवंत लॅबोरेटरीजचे मालक अनिल इनामदार यांच्यावर चुकीचे रक्त चाचणी करण्यास प्रवृत करणे, रक्त चाचणी करणे, चुकीचा अहवाल व सल्ला देणे, कोविड ऍन्टीबॉडीज चाचणी करण्यासाठी लागणाऱया किटचा काळाबाजार करणे याबाबत सखोल चौकशी व्हावी व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार..!

यासंदर्भात पाटण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आपण संबंधित लॅबची पाहणी करून सखोल चौकशी केली आहे. त्यासंदर्भातील अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल, असे सांगितले.

तर  गुन्हा दाखल करणार..!

 यासंदर्भात मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून संबंधित लॅब मालकाविरोधात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून फसवणुकीची फिर्याद दाखल झाल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करणार असल्याचे पाटण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजित पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले

दरम्यान, उदुगडे यांनी या तक्रारीच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा यांना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

सांगली : लॉकडाऊन नाही, पण शिस्त कडक करणार : पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

सातारच्या दानशूर इंदूआजींचा मनसेकडून सत्कार

datta jadhav

सांगली : अन्यथा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन – पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

करवीरमधून पहिला अर्ज दाखल; सांगवडे ग्रामपंचायतीचा पहिला अर्ज

Abhijeet Shinde

मुंबईत उद्यापासून मेट्रो धावणार; ग्रंथालयेही सुरू

Rohan_P

मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी कायम; लॉकडाऊन नाही!

Rohan_P
error: Content is protected !!