तरुण भारत

लंकेच्या डावात मॅथ्यूजचे नाबाद शतक

वृत्तसंस्था/ गॅले

गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध यजमान लंकेने पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात 4 बाद 229 धावा जमविल्या. लंकन संघातील अँजेलो मॅथ्यूजने नाबाद शतक (107) झळकवले.

Advertisements

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने नव्या चेंडूवर लंकेला पाठोपाठ दोन धक्के दिले. डावातील पाचव्या षटकात अँडरसनने कुशल परेराला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने ओ फर्नांडोचा शून्यावर त्रिफळा उडविला. लंकेची स्थिती यावेळी 2 बाद 7 अशी केविलवाणी होती. थिरिमने आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 69 धावांची भागिदारी केली. अँडरसनने उपाहारापूर्वी थिरिमनेला झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 43 धावा जमविल्या.

अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार चंडीमल यांनी चौथ्या गडय़ासाठी 117 धावांची भागिदारी करून आपल्या संघाला सुस्थितीत नेले. वूडने चंडीमलला पायचित केले. त्याने 121 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 52 धावा जमविल्या. इंग्लंडच्या बेस आणि लिच या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता न आल्याने इंग्लंडला लंकेचे अधिक गडी बाद करता आले नाहीत. दरम्यान, मॅथ्यूजने आपले 11 वे कसोटी शतक झळकवले. दिवसअखेर मॅथ्यूज 11 चौकारांसह 107 तर डिक्वेला 1 चौकारासह 19 धावांवर खेळत आहेत. दिवसअखेर लंकेने पहिल्या डावात 87 षटकात 4 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडतर्फे अँडरसनने 24 धावांत 3 तर मार्क वूडने 47 धावांत 1 गडी बाद केला. इंग्लंडचा संघ 1913 नंतर पहिल्यांदाच विदेशात सलग पाचवी कसोटी जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लंकेबरोबरच्या या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव 87 षटकात 4 बाद 229 (अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे 107, चंडीमल 52, थिरिमने 43, डिक्वेला खेळत आहे 19, कुशल परेरा 6, अँडरसन 3/24, वूड 1/47).

Related Stories

भारताच्या 345 धावांना न्यूझीलंडचे चोख प्रत्युत्तर

Patil_p

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे ‘हे’ विशेष ‘१२७’ अतिथी लावणार उपस्थिती

Abhijeet Shinde

सचिन तेंडुलकर जगातील तिसऱया क्रमांकाचा प्रशंसनीय क्रीडापटू

Patil_p

अभिषेक नवलेने तोडला विश्वविक्रम

Omkar B

बूम बूम गोलंदाजीसाठी बुमराह सज्ज

Patil_p

६ क्रिकेटपटूंना आनंद महिंदा देणार अलिशान एसयूव्ही

Patil_p
error: Content is protected !!