तरुण भारत

स्थानिकांना रेती व्यवसाय करू द्यावा : कांदोळकर

अन्यथा बाहेरील ट्रक अडविण्याचा इशारा

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

स्थानिक रेती व्यावसायिकांच्या पोटावर पाय ठेऊन महाराष्ट्रातील रेतीला गोव्यात मुक्तद्वार दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी दिला आहे. महाराष्ट्रातून रेती आणणाऱया ट्रकांच्या विरोधात जुने गोवेत आंदोलन केलेल्या स्थानिक रेती उत्पादकांच्या मागे फॉरवर्ड खंबीरपणे राहील असे त्यांनी जाहीर केले आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या शेजारील महाराष्ट्र राज्यातून मोठय़ा प्रमाणात रेती गोव्यात आयात होत असून त्यामुळे संकटात सापडलेल्या स्थानिक रेती उत्पादकांनी शुक्रवारी जुने गोवे येथे काही ट्रक अडवून त्यांना तिथल्या तेथे रेती खाली करण्यास भाग पाडले होते. हा प्रकार म्हणजे स्थानिक रेती उत्पादकांच्या उद्वेगाची ठिणगी असून, सरकारने आताच लक्ष न घातल्यास भविष्यात राज्यभरात त्याचा भडका उडू शकतो. त्यामुळे सरकारने लोकांना कायदा हाती घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा कांदोळकर यांनी दिला आहे.

सरकारी प्रकल्पांसाठी बेकायदा रेती? 

एका बाजूने सरकार बाहेरील रेती बेकायदा ठरवते तर दुसऱया बाजूने स्थानिक उत्पादकांनाही रेती उत्पादन करण्यास बंदी घालते. तरीही मागील दाराने अन्य राज्यातील रेतीलाच प्रोत्साहन देण्यात येते. एवढेच नव्हे तर हीच रेती सरकारी प्रकल्पांसाठीही वापरण्यात येते. त्यामुळे सरकारसाठी एक नियम आणि नागरिकांसाठी दुसरा नियम असतो का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे कांदोळकर म्हणाले.

सरकारतर्फे राज्यात रेती उत्खननासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र तेथे भाजप समर्थकांनाच रोजगाराची संधी देण्यात येते. इतरांवर एकतर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो किंवा त्यांना व्यावसायच करण्यास देण्यात येत नाही, अशी सध्या परिस्थिती असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले. अशाप्रकारे सरकार प्रत्येक क्षेत्रात राजकारण आणत असून त्यातून गरीबांच्या पोटावर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आता बाहेरील रेती आयातीच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलनाची ठिणगी पेटवलीच आहे तर भविष्यात त्याचा भडका उडणार हे नक्की आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात वेळीच लक्ष घालावे व रेती उत्खननास घातलेली बंदी त्वरित उठवून परंपरेने या व्यवसायात असलेल्या स्थानिकांना त्यांचा व्यवसाय करण्यास मान्यता द्यावी, अन्यथा पुढे जो काही प्रकार होईल त्यास सरकारच पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जुने गोवेत झालेल्या प्रकाराचे फॉरवर्ड समर्थन करत नाही, मात्र त्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असल्याने त्यांना पूर्ण समर्थन देत आहे, असे कांदोळकर म्हणाले.

स्वतःला बहुजन समाजाचे म्हणविणाऱया या सरकारने सध्या प्रत्येक पारंपरिक व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातून काढून घेण्याचे षडयंत्र आरंभले आहे. राहता राहिला पायलट व्यवसाय, तोही त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचे प्रयत्न चालले आहेत.

हळदोणेत कोळसा जेटी होऊ देणार नाही

दरम्यान, हळदोणे येथे कोळसा जेटी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ऐकिवात आले असून काणत्याही परिस्थितीत आम्ही त्याचे समर्थन करणार नाहीत. तरीही सरकार हट्टालाच पेटले तर मेळावलीपेक्षाही प्रखर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा श्री. कांदोळकर यांनी दिला आहे.

Related Stories

मुरगाव पोलिसांकडून चोरीचा छडा, चौघांना अटक

Omkar B

काणकोणात साडेतीन इंच पावसाची नोंद

Amit Kulkarni

कर्नाटकमुळे म्हादईचा अहवाल रेंगाळला

Patil_p

मजूर निधी घोटाळाप्रकरणी लोकायुक्तचा सरकारला दणका

Omkar B

माड्डीतळप येथे मालवाहू वाहनाला अपघात, चालक गंभीर जखमी

Omkar B

फुटबॉल खेळताना जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!