तरुण भारत

अमेरिका-तालिबान शांतता करार गुंडाळणार

बायडेन यांच्याकडून समीक्षेचा निर्णय : पाकिस्तानकडून आक्षेप

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि तालिबना यांच्यादरम्यान अफगाणिस्तानसंबंधी झालेला शांतता करार धोक्यात आला आहे. अमेरिका-तालिबान शांतता कराराची समीक्षा केली जाणार असल्याचे अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानला बहुधा या निर्णयाचा सुगावा लागला होता. याचमुळे सुलिवान यांच्या विधानापूर्वी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अमेरिकेने या करार आणि प्रक्रियेतून मागे हटू नये असे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांनी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याकरता करार केला होता. हा करार प्रारंभापासूनच वादग्रस्त ठरला आहे. अफगाणिस्तानच्या सरकारने या कराराच्या काही मुद्दय़ांवर आक्षेप घेतला होता. तर करारानंतरही तालिबानने दहशतवादी हल्ले थांबविलेले नाहीत.

तालिबानकडून कराराचा भंग

एनएसए जेक सुलिवान यांनी तालिबानसोबतच्या शांतता कराराच्या समीक्षेचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आमचा दृष्टीकोन अत्यंत स्पष्ट आहे. तालिबानने स्वतःचे कुठलेच आश्वसन पाळलेले नाही. अफगाणिस्तानातील हिंसाचार संपविण्याच्या दिशेने तालिबानने कुठलेच पाऊल उचललेले नाही. तसेच चर्चेत अफगाणिस्तान सरकारला सामील न करण्याची कृती अजब असल्याचे उद्गार व्हाइट हाउसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली हॉर्ने यांनी काढले आहेत.

खऱया अर्थाने शांतता असावी

अफगाणिस्तानच्या नेत्यांना शांतता आणि स्थैर्यासाठी होत असलेल्या चर्चेत सामील केले जावे. आम्ही तेथील महिला, मुली आणि अल्पसंख्याक समुदायाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांनाही शांतता करारात सामील करण्यात यावे. यासंबंधी अफगाणिस्तान सरकार आणि नाटो सहकाऱयांशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे हॉर्ने म्हणाल्या.

पाकिस्तानसाठी डोकेदुखी

बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तान शांतता करार अबाधित ठेवावा. यात बदल किंवा तो रद्द करणे योग्य ठरणार नाही. अफगाणिस्तानात किती संधी आहे हे अमेरिकेला सांगू. दीर्घकाळानंतर आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत असा दावा पाकिस्तानचे विदेशमंत्री  कुरैशी यांनी केला आहे. स्वतःला मध्यस्थ म्हणून मांडू पाहणाऱया पाकिस्तानला हा करार रद्द झाल्यास मोठा झटका बसणार आहे. कुरैशी यांनी तीनवेळा तालिबानी म्होरक्यांचे स्वागत केले होते. तालिबानला पाकिस्तानकडूनच रसद पुरविली जाते असा आरोप अमेरिका असेच अफगाणिस्तानने नेहमीच केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानात आश्रय घेणाऱया दहशतवाद्यांवर शेकडो ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांना विरोध दर्शविला होता.

Related Stories

इराणमध्ये अडीच कोटी लोकांना बाधा

Patil_p

चीनकडून संशोधनाचे हॅकिंग

Patil_p

भारतीय वंशाच्या दोघांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी कौन्सिलमध्ये समावेश

datta jadhav

सौदी अरेबिया : सात महिन्यानंतर मक्का भाविकांसाठी खुली

datta jadhav

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफजाई झाली पदवीधर

datta jadhav

नव्या स्ट्रेनचा फ्रान्समध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला

datta jadhav
error: Content is protected !!