तरुण भारत

अमेरिकेच्या राजवटीतील‘कमला’ अध्याय

कमला हॅरिस…20 ऑक्टोबर, 1964 या दिवशी जन्मलेल्या भारतीय वंशाच्या त्या ‘अद्वितीय’ महिलेनं मान मिळविलाय तो अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीवहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा आणि लिंगभेद, वंशभेद नि कट्टरपंथियांवर मात करण्याचा…20 जानेवारी, 2021…हॅरिसना शपथ दिली ती महासत्तेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम ‘हिस्पॅनिक’ न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी. या पार्श्वभूमीवर सर्वांना दर्शन घडलं ते महिलांच्या शक्तीचं. यापूर्वी कमला हॅरिसनी सॅन फ्रान्सिस्कोच्या ‘डिस्ट्रिक्ट ऍटर्नी’ अन् कॅलिफोर्नियाच्या ‘ऍटर्नी जनरल’ म्हणून काम पाहिलंय. त्याशिवाय त्यांना ‘सिनेटर’ बनण्याचा अभूतपूर्व मानही मिळालाय…

हॅरिसनी 49 व्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली ती दोन ‘बायबल्स’च्या साहाय्यानं. एक ‘बायबल’ उपराष्ट्राध्यक्षांच्या शेजारी राहणारी, आईची माया देणारी महिला अन् मार्गदर्शक रेजिना शेल्टन यांचं. बर्कले इथं वास्तव्य असताना त्यांना फार मोठा आधार मिळाला तो रेजिना यांचा…दुसरं ‘बायबल’ नागरी हक्कांसाठी झुंजणारे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती थरगूड मार्शल यांचं. त्यांच्या प्रेरणेमुळं कमला हॅरिस यांना कायद्याचं शिक्षण घेण्याची स्फूर्ती मिळाली…

विशेष म्हणजे हिंदूंची मंदिरं व ख्रिस्ती धर्माच्या चर्चेस यांचं दर्शन घेत त्या वाढल्या. परंतु कमला नि बहीण माया यांच्यावर असलेल्या शेल्टन कुटुंबाच्या प्रभावामुळं त्यांचा जास्तीत जास्त संबंध आला तो ‘बाप्तिस्त ट्वेंटी थर्ड ऍव्हेन्यू चर्च ऑफ गॉड’शी. शिवाय रेजिना शेल्टन यांच्या शाळेतच त्यांचं सुरुवातीचं शिक्षण पार पडलं होतं…‘जेव्हा आईला कामामुळं घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा माझी बहीण मायासह शाळा सुटल्यानंतर मुक्काम असायचा तो शेल्टन यांच्या घरात. आम्हाला तो आमच्या घराचाच विस्तारित भाग वाटायचा असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. रेजिना शेल्टन या जणू आमच्या आईच होत्या’, कमला हॅरिस यांनी लिहिलेल्या लेखातील शब्द…

मार्शल म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिलेवहिले आफ्रिकन-अमेरिकन न्यायमूर्ती. त्यांनी त्या पदावर बसण्यापूर्वी ‘ब्राऊन विरुद्ध शिक्षण मंडळ’ या गाजलेल्या खटल्यात विजय मिळविला होता. त्यामुळं सार्वजनिक शाळेत कृष्णवर्णीयांना प्रवेश मिळविणं शक्य झालं. कमला हॅरिस नेहमी त्या खटल्याचा उल्लेख करतात, कारण त्यांनाही त्या सहा वर्षांच्या असताना या अनुभवाला बर्कलेमधील शाळेत तोंड द्यावं लागलं होतं…

सोटोमेयरप्रमाणं कमलांनीसुद्धा न्यूयॉर्कमध्ये ‘प्रोसिक्युटर’ म्हणून काम केलं. पण त्यानंतर त्यांना संधी मिळाली ती वरच्या पायऱयांच्या दिशेनं झेपावण्याची. उद्या सोमवारी कमला हॅरिस अधिकृतरीत्या ‘सिनेट’चा राजीनामा देणार. त्यांना ‘सिनेटर’  म्हणून चार वर्षं काम करण्याची संधी मिळाली. आता हॅरिस अमेरिकेच्या घटनेनुसार बनणार ‘सिनेट’च्या ‘प्रिसायडिंग ऑफिसर’…जेव्हा त्यांना 2016 साली तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘सिनेटर’ म्हणून शपथ दिली तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंब वॉशिंग्टन डीसीमध्ये हजर होतं. यावेळी साऱया उत्साहावर पाणी टाकलं ते महामारीनं. कमला यांना साथ मिळाली ती अमेरिकेचे ‘सेकंड जंटलमन’ बनलेले पती डग एमहॉफ यांची…कमला हॅरिस जेव्हा 2003 साली सॅन फ्रान्सिस्कोच्या ‘डिस्ट्रिक्ट ऍटर्नी’ बनल्या तेव्हा शपथविधीच्या वेळी आई श्यामला व खुद्द रेजिना शेल्टन त्यांच्या कुटुंबाच्या ‘बायबल’सह हजर होत्या. विशेष म्हणजे त्या कुटुंबानं प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी हॅरिस यांच्यासाठी ते ‘बायबल’ आवर्जुन पाठविलंय…

कमला हॅरिस यांना अतिशय आवडतं ते लिव्हरमोअर येथील ‘शिव-विष्णू’ यांचं मंदिर. महत्त्वाच्या सणांच्या वेळी मंदिराला भेट देण्याची संधी त्या चुकवत नाहीत. त्यांनी कॅलिफोर्नियातील ‘ऍटर्नी जनरल’ पदासाठीची शर्यत चालू असताना मावशी सरला गोपालन यांना चेन्नईमधील मंदिरात यशासाठी नारळ फोडण्याची विनंती केली होती (हॅरिस यांच्या आईचं गाव म्हणजे तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम)…

कमला हॅरिस यांनी शपथविधीच्या वेळी पोशाख घातला तो ‘जांभळय़ा’ रंगाचा, तर गळय़ात मोत्यांचा हार. हॅरिस यांना सोहळय़ात साथ मिळाली ती युजिन गूडमन या कृष्णवर्णीय पोलीस अधिकाऱयाची. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘कॅपिटल हिल’वर ‘रिपब्लिकन’ समर्थकांनी केलेल्या आकस्मिक हल्ल्याच्या वेळी ‘लॉमेकर्स’चं एकहाती रक्षण करताना स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नव्हती…जांभळय़ा रंगाच्या निर्मितीसाठी वापर करतात तो निळय़ा आणि लाल रंगांच्या मिश्रणाचा. अमेरिकेत निळा ‘डेमोक्रॅटिक’ पक्षाचा, तर लाल ‘रिपब्लिकन पक्षा’चं प्रतिनिधीत्व करत असल्यामुळं त्या रंगानं तिथं मोठा मान पटकावलाय. खेरीज ‘काँग्रेस’ला धडक देणारी अन् राष्ट्राध्यक्षपदाचं स्वप्न पाहणारी पहिलीवहिली कृष्णवर्णीय महिला शिर्ले चिशोल्म यांचा तर तो अतिशय आवडता रंग. जांभळा महासत्तेच्या भूमीवरील महिलांच्या वेदनांचं प्रतिनिधीत्व देखील करतोय…हिलरी क्लिंटन व मिशेल ओबामा यांनीही पोशाखात स्थान दिलं होतं ते जांभळय़ा रंगाच्या छटांनाच. खेरीज अमेरिकेतील हजारो महिलांनी गळय़ात मोत्यांचा हार घालण्याची कमला हॅरिस यांची विनंती मान्य करून त्यांना यावेळी जोरदार साथ दिली (हा परिपाक हॅरिस यांचं यश साजरं करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अन् 4 लाख 30 हजार सदस्य असलेल्या ‘वेअर पर्ल्स ऑन जानेवारी ट्वेंटी, 2021’ या ‘फेसबुक ग्रुप’चा)…

हॅरिसच्या भारतातील नातेवाईकांना ‘कोव्हिड-19’ अन् कडक नियमांमुळं शपथविधीला हजर राहणं शक्य झालं नाही, परंतु बहीण माया, भाची मीना अन् सावत्र मुलं कोल व एला यांना मात्र सोहळय़ाचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं. त्याचदिवशी कमला यांनी ‘सिनेट’च्या अध्यक्षा या नात्यानं निवडणूक जिंकलेल्या ‘डेमोक्रॅटिक’ पक्षाच्या तीन नव्या ‘सिनेटर्स’ना शपथ दिली आणि अमेरिका बदलतेय, महासत्तेच्या राजकीय वर्तुळात स्त्री-पुरुष भेद संपतोय हे पुन्हा सिद्ध झालं…

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमला हॅरिस यांच्यावर काही कमी चिखलफेक झाली नव्हती…अपेक्षेनुसार डोनाल्ड ट्रंपनी बायडेन यांच्यापेक्षा जास्त आक्रमण केलं होतं ते कमला यांच्यावरच. त्यांनी हॅरिस यांचं वर्णन ‘दुष्ट स्त्री व सर्वांना न आवडणारी महिला’ असं केलं. त्यापूर्वी ट्रंप यांची त्यांना ‘वेडसर महिला’ नि ‘घाणेरडी’ असं म्हणण्यापर्यंत मजल गेली होती…डोनाल्ड हे त्यांचं वर्णन करताना नुसतं ‘कम्युनिस्ट’ म्हणून थांबले नव्हते, तर त्यांना ‘रेडिकल लेफ्ट’ असंसुद्धा म्हणणं त्यांनी पसंत केलं…‘कमला हॅरिस यांना अप्रत्यक्षरीत्या राष्ट्राध्यक्षपदावर ताबा मिळवायचाय. त्यांची इच्छा आहे ती आमच्या देशाचा नाश करण्याची’, डोनाल्ड ट्रंप यांनी काढलेले जहरी उद्गार…त्यानंतर हॅरिस यांनी त्या जहाल टीकेला उत्तर देणं टाळलं, मात्र त्यांच्या शब्दांचं वर्णन ‘बालिश’ असं केलं होतं…सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आता ट्रंप यांच्याविरुद्धच्या ‘महाभियोगा’ला हाताळणार त्या कमला हॅरिसच !

ज्यो बायडेन प्रशासनातील अन्य भारतीय चेहरे…

नीरा टांडेन (अर्थसंकल्पीय व्यवस्थापन प्रमुख)

डॉ. विवेक मूर्ती (अमेरिकेचे सर्जन जनरल)

वनिता गुप्ता (असोसिएट ऍटर्नी जनरल)

उस्रा झेया (नागरी सुरक्षा, लोकशाही व मानवाधिकाराच्या अंडर सेक्रेटरी)

माला अडिगा (डॉ. जिल बायडेन यांच्या भविष्यातील पोलीस प्रमुख)

गरिमा वर्मा (डॉ. बायडेन यांच्या डिजिटल डायरेक्टर)

सेब्रिना सिंग (डॉ. बायडेन यांच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी)

आयेशा शाह (व्हाइट हाउसच्या डिजिटल स्ट्रटेजीच्या व्यवस्थापिका)

समिरा फाजली व भारत राममूर्ती (व्हाइट हाउसच्या नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे उपसंचालक)

गौतम राघवन (राष्ट्राध्यक्षांच्या कर्मचाऱयांचे उपसंचालक

विनय रेड्डी (बायडेन यांची भाषणं तयार करणाऱया समूहाचे संचालक

वेदांत पटेल (राष्ट्राध्यक्षांचे साहाय्यक माध्यम सचिव)

सोनिया अगरवाल (हवामानासंबंधीच्या धोरणांच्या वरिष्ठ सल्लागार)

विदूर शर्मा (‘कोव्हिड-19’ रिस्पॉन्स टीमचे योजना सल्लागार)

तरुण छाब्रा (तंत्रज्ञान-राष्ट्रीय सुरक्षा यांचे वरिष्ठ संचालक)

सुमोना गुहा (राष्ट्रीय सुरक्षा मंडळ-दक्षिण आशिया यांच्या वरिष्ठ संचालिका)

नेहा गुप्ता (ऑफिस ऑफ व्हाइट हाउस काउन्सेलच्या असोसिएट काउन्सेल)

रिमा शाह (ऑफिस ऑफ व्हाइट हाउस काउन्सेलच्या डेप्युटी असोसिएट काउन्सेल)…

– राजू प्रभू

Related Stories

त्वरित पावले न उचलल्यास ‘कर्करोगाची त्सुनामी’

tarunbharat

लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांचा अंत; ‘या’ देशाने दिली धमकी

datta jadhav

संसर्ग धोकादायक

Patil_p

यूएईने केल्या लोकसंख्येपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

datta jadhav

आकाशगंगेच्या प्रकाशाचे ध्वनीत रुपांतरण

Patil_p

चीनला रोखण्यासाठी तैवानची अनोखी शक्कल

Patil_p
error: Content is protected !!