तरुण भारत

तीन जीवांच्या पुनर्भेटीसाठी चिपळूणकरांचे ‘ऑपरेशन ममता’!

राजेंद्र शिंदे/ चिपळूण

धामणवणेमधील विंध्यवासिनीच्या डोंगरात सापडलेल्या बिबटय़ाच्या दोन बछडय़ांची 7 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या आईशी पुनर्भेट घडवून आणण्यात यश आले आहे. चिपळुणातील प्राणीमित्र आणि वनविभाग कर्मचाऱयांनी तहानभूक हरपून राबवलेले ‘ऑपरेशन ममता’ बिबटय़ा मादीने आपल्या बछडय़ांना घेऊन नैसर्गिक अधिवास गाठल्यानंतर यशस्वी झाले. विशेष म्हणजे हे ऑपरेशन पूर्णपणे गुप्त ठेवल्याने बघ्यांची गर्दी टळली आणि हेतू सफल झाला.

  धामणवणेतील प्रा. चेतन खांडेकर यांना विंध्यवासिनी मंदिराजवळील ओढय़ामध्ये 11 जानेवारीला कोणीतरी प्राणी ओरडत असल्याचा आवाज आला. त्यांनी निसर्गप्रेमी ऍड. चिन्मय दीक्षित यांना व दीक्षित यांनी त्वरित वाईल्ड लाईफ अनलिमिटेडचे ओमकार बापट यांना कळवले. बापट तत्काळ घटनास्थळी पोचले असता दीड -दोन महिन्याचे बिबटय़ाचे पिल्लू निदर्शनास आले. त्यांनी वन-विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी सचिन निलख यांनी पाहणी केली व पिल्लाला त्याची आई घेऊन जाते का, हे पाहण्याचे ठरले आणि येथूनच पुढे पुनर्भेटीसाठीचे ‘ऑपरेशन ममता’ सुरू झाले. 

एक नव्हे दोन पिल्लांची ताटातूट

12 जानेवारीला दुपारीच हे पिल्लू ओढय़ातून जवळ असलेल्या बागेत गेल्यामुळे या पिल्लाला शोधून एस.ओ.पी.प्रमाणे त्यांच्या पुनर्भेटीचा प्रयत्न करण्याचे ठरले.  वाढलेल्या झाडीमुळे तब्बल 4 तासांच्या शोधकार्यानंतर हे पिल्लू सापडले. आईचे दूध न मिळाल्यामुळे अशक्त झालेल्या या पिल्लाला कृत्रिमरित्या दूध पाजून एका लाकडी खोक्यात ठेवत बाजूने कॅमेरा टॅप लावण्यात आले. हे करत असतानाच तेथील रोहन शेंबेकर यांनी आपल्या बागेमध्ये आणखी एक बिबटय़ाचे पिल्लू आढळल्याची माहिती वनविभागाला दिली. बापट, दीक्षित यांच्यासह वनकर्मचाऱयांनी दुसऱया दिवशी हे पिल्लूही शोधावयाचे ठरले.

..आणि दोन लहानग्यासाठी घरही सजले

13 जानेवारीलाही आईने पिल्लाला नेले नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे मादीच्या अस्तित्वाच्या खुणाही आढळून आल्या नाहीत. दरम्यान दुसऱया पिलाचा शोधही सुरुच होता. यावेळी नीलेश बापटही या प्रयत्नात सामील झाले. सायंकाळी 4.30 च्या सुमारास दुसरे पिल्लूही सापडले. तो नर जातीचा होता. पहिल्यापेक्षा तो जास्त सशक्त असल्याचे दिसले. आणि या दोन जिवांच्या सुरक्षिततेसाठी थोडा मोठा लाकडी खोका करून या पिल्लांना त्यामध्ये ठेवले गेले.

आईच्या पुन्हा पुन्हा फेऱया पण…

14 जानेवारीला रात्री दोनवेळा आणि सकाळी 7.30 च्या सुमारास आई या खोक्याजवळ येऊन गेल्याचे कॅमेरा ट्रपमधील फोटोंवरून या सर्वांच्या निदर्शनास आल्याने सर्वजण मनोमन सुखावले. लिपांना ठेवलेला खोका थोडा मोठा होत असावा म्हणून भाज्यांच्या क्रेटमध्ये पिल्लांना ठेवले केले. 15 जानेवारीला बिबटय़ा मादी क्रेटजवळ तासभर बसली. ती तीनवेळा खोक्याजवळ येऊन गेल्याचे फोटोवरून दिसले. मात्र तिने पिल्लांना आपल्यासोबत नेले नाही. त्यामुळे या दोन्ही बछडय़ांना दूध पाजून पुन्हा क्रेटमध्ये ठेवण्यात आले.

अन् बछडय़ांना त्यांची आई मिळाली

त्यानंतर 16 जानेवारीला मादी आलीच नाही. मात्र यादिवशी विटांचे स्ट्रक्चर बनवून त्यात या दोन्ही बछडय़ांना दूध पाजून ठेवण्यात आले. 17 जानेवारीला सकाळी दोन्ही पिल्ले जागेवर आढळली नाहीत. मादी आपल्या पिल्लांना घेऊन गेली होती. बछडय़ाना त्यांची आई मिळाली होती. मात्र खात्री करून घेण्यासाठी आणखी काही दिवस निरीक्षण करण्यात आले. या पाहणीतही आईने पिल्लं नेल्यावर शिक्कामोर्तब झाले.

वरिष्ठ वनाधिकाऱयांचाही सहभाग

हे ऑपरेशन कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. व्ही. क्लेमंट बेन, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व उपविभागीय वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली, वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, वनपाल राजाराम शिंदे, दत्ताराम सुर्वे, किशोर पत्की, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर व वन्यजीव अभ्यासक ओमकार बापट, ऍड. चिन्मय दीक्षित व नीलेश बापट यांनी यशस्वी केले. जागेचे मालक व निसर्गप्रेमी रोहन शेंबेकर यांनीही या कामी विशेष सहकार्य केले.

Related Stories

दोडामार्गात चमकणाऱया जंगलाचे अद्भूत आश्चर्य

Patil_p

धक्कादायक : रत्नागिरी डेपोतील चालकाची आत्महत्या

triratna

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया युवकावर गुन्हा

NIKHIL_N

गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश

triratna

बोलक्या बाहुल्यातून शिक्षण आनंददायी करणारे ‘कलाशिक्षक’

Patil_p

चटणीतील बेडकाची दखल, 6 दुकाने बंद करण्याचे आदेश

Patil_p
error: Content is protected !!