तरुण भारत

बेळगावमध्ये उभारले जातेय ‘हायटेक रेल्वेस्थानक’

प्रतिनिधी/ बेळगाव

ऐतिहासिक बेळगाव रेल्वेस्थानकाचा कायापालट केला जात आहे. जुन्या इमारतीच्या जागी ‘हायटेक रेल्वेस्थानक’ उभारले जात आहे. नव्या रेल्वेस्थानकामध्ये दोन प्रवेशद्वार असणार असून 4 सुसज्ज प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या रेल्वेस्थानकाचे 40 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना सुसज्ज असे रेल्वेस्थानक उपलब्ध होणार आहे.

बेळगाव रेल्वे स्थानकासाठी रेल विकास निगमने तब्बल 171 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून विकासकामे राबविण्यात येत आहेत. जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर 5 हजार 200 चौ. मी.चे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. एखाद्या विमानतळ टर्मिनलप्रमाणे या रेल्वेस्थानकाची रचना ठेवण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. परंतु कोरोनामुळे काही दिवस काम बंद असल्याने हे काम रखडले होते. त्या कामाला आता पुन्हा सुरुवात झाली असून काम प्रगतिपथावर आहे.

पार्किंगची सोय

प्रवाशांच्या वाढत्या संख्येसोबतच वाहनांची संख्या वाढली आहे. पुढील काळात वाहने वाढणार असल्याने पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे होते. यासाठी रेल्वे विभागाने 200 दुचाकी व 40 चार चाकी वाहने लावण्याची व्यवस्था केली आहे.

कोचिंग डेपो

रेल्वेस्थानकावर गुड्सशेड होते, त्या ठिकाणी आता कोचिंग डेपो उभारण्यात आला आहे. रेल्वेच्या स्वच्छतेसोबतच दुरुस्तीसाठी कोचिंग डेपो उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी रेल्वे दुरुस्तीसंदर्भातील इतरही काम करता येणार आहे. यापूर्वी दुरुस्तीसाठी बोगी हुबळी येथे पाठवाव्या लागत होत्या. या कोचिंग डेपोमुळे बेळगावमध्येच दुरुस्ती करता येणार आहे. एकूण 280 मीटर लांब कोचिंग डेपो उभारण्यात येणार आहे.

दक्षिण प्रवेशद्वार

बेळगाव रेल्वेस्थानक शहराच्या दक्षिण व उत्तर भागाच्या मध्ये आहे. यापूर्वी केवळ एकच प्रवेशद्वार होते. परंतु शहराच्या दक्षिण भागातून येणाऱया प्रवाशांना उड्डाणपुलावरून फिरून यावे लागत होते. यासाठी दक्षिण दिशेला प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. 260 चौ. मी. विस्ताराचे दुसरे प्रवेशद्वार असणार आहे. यासाठी इलेक्ट्रिक जिने, 2 लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. दक्षिण प्रवेशद्वारावरून चारही प्लॅटफॉर्मसाठी पादचारी पूल बनविला जाणार आहे. यामुळे टिळकवाडी, वडगाव, शहापूरच्या रहिवाशांची सोय होणार आहे.

बेळगाव रेल्वेस्थानकातून देशातील महत्त्वाच्या शहरांना लॉकडाऊनपूर्वी रेल्वेसेवा सुरू होती. दररोज 30 ते 32 रेल्वेंमधून 10 हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करीत होते. आठवडय़ाला 62 साप्ताहिक, द्विसाप्ताहिक व विशेष रेल्वे धावत होत्या. सध्या लॉकडाऊननंतर या रेल्वेंची संख्या कमी झाली आहे. परंतु पुढील काळात पुन्हा रेल्वे वाहतूक वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

Related Stories

जमखंडीत उद्यापासून दुपारनंतर सर्व व्यवहार बंद

Patil_p

रिलायन्स फौंडेशनच्यावतीने स्वच्छता कामगारांसाठी सेफ्टी किट

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबच्या सदस्यांची ज्ञान प्रबोधन विद्यालयाला भेट

Patil_p

कृषी उत्पादित मालावर निर्बंध लादू नका

Patil_p

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने निपाणीच्या युवकाचा मृत्यू

Patil_p

हरात आता धास्ती डेंग्यूची

Patil_p
error: Content is protected !!