प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेसमोर लाल-पिवळा फडकविल्यामुळे बेळगावातील वातावरण बिघडत चालले आहे. याच ठिकाणी भगवा फडकविण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते गुरूवार दि. 21 जानेवारी रोजी बेळगावात शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शिनोळीजवळ कर्नाटक पोलिसांनी नेते, कार्यकर्त्यांना अडविले होते. त्यामुळे बेळगाव तालुक्मयातील कोनेवाडीत जाऊन तेथे भगवा फडकविण्यात आला होता. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांनी स्वतः फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 153(अ) कलमान्वये विजय देवणे व इतरांविरूध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भगवा फडकावून जय महाराष्ट्राच्या घोषणा देवून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत कर्नाटक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.