तरुण भारत

मन पावे समाधान…..

सर्वानाच वाटते की आपले मन सदैव प्रसन्न, समाधानी असावे. पण कलियुगाच्या  प्रभावाने क्वचितच एखादी व्यक्ती समाधानी असल्याचे आपल्याला आढळते. एका सर्वेक्षणानुसार जगातील 80 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त आहेत. बहुतेक लोक अंतःकरणात दुःख त्रास असले तरी बाहेरून समाधानाचा मुखवटा धारण करून समाजात वावरतात. त्यात भरीस भर म्हणून जाहिरातीच्या आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आनंदी राहण्यासाठी अनेक जाहिराती केल्या जातात, पण तरीही मनुष्य असमाधानीच राहतो. स्वानुभवावरून समाजाला शिकवणाऱया संत तुकाराम महाराजांसारख्या निस्वार्थी श्रे÷ व्यक्ती कडून मनावर नियंत्रण कसे करावे हे आपण शिकले पाहिजे. एका अभंगात ते उपदेश करतात

मुख्य आधी विषयत्याग । विधिभाग पाळणे ।।1।। मन पावे समाधान । हेचि दान देवाचे ।। 2 ।। उदासीन वृत्ती देही । चाड नाही पाळणे ।। 3 ।। तुका म्हणे नाही भय । सम  सोय विषमाची ।।4।।

अर्थात जीवनामध्ये मुख्यत्वेकरून विषयांचा त्याग करून शास्त्रविधीप्रमाणे धर्माचे पालन करणे महत्त्वाचे आहे. असे केल्यानेच मनाचे समाधान होते, हेच देवाचे दान (कृपा) आहे. देहासंबंधी वृत्ती उदासीन असावी आणि त्याच्या पालनपोषणाची आसक्ती मनी नसावी, तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये अनुकूल प्रतिकूल भावाचा त्याग करून समचित्त राहिल्याने मन निर्भय राहते.

 जीवनामध्ये मन समाधानी ठेवायचे असेल तर आपणाला सर्वप्रथम इंद्रियावर नियंत्रण ठेवून भगवद्गीता, भागवत यासारख्या प्रामाणिक वैदिक शास्त्रामध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे विधीनिषेधांचे काळजीपूर्वक पालन करावयास शिकले पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला शारीरिक रोग झाल्यावर वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार विधी निषेधाचे पालन केल्याने त्याला झालेला रोग पूर्णपणे बरा होतो, त्याचप्रमाणे आपल्याला भवव्याधीचा अर्थात जन्म, मृत्यू, जरा, व्याधीचा रोग झाला आहे आणि विशेषकरून मनुष्यजन्मात आपण हे जाणू शकतो. हा भवरोग बरा करण्यासाठी गीता, भागवतसारख्या वैदिक शास्त्राच्या मदतीने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली विधिनिषेधाचे पालन करण्याची आपली दृढ इच्छा आणि प्रामाणिक तयारी असली पाहिजे, कारण मन हे आपल्या बंधनाला आणि मुक्तीला कारण आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी  6, 5) उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ।अर्थात मनाच्या साहाय्याने स्वतःची अधोगती न करता उन्नती करावी कारण मन हे व्यक्तीचे मित्र आणि शत्रूपण आहे. (भ गी 6.6) बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ।अर्थात ज्याने मनाला आपल्या नियंत्रणात ठेवले आहे त्याचे मन हे चांगला मित्र बनू शकते पण याविरुद्ध ज्याचे मन अनियंत्रित आहे ते मन त्याचा विनाशकारी शत्रूही बनते. म्हणून मनाला नियंत्रित ठेवण्याचे शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून या जगातील झगमगीत दिसणाऱया पण आपली भावना कलुषित करणाऱया दिखाऊ वस्तूपासून आपण दूर राहू शकू. जितके आपले मन भौतिक जगामध्ये आकर्षित होईल तितके आपण या जगातील दुःखामध्ये जास्त गुंतले जाऊ, यासाठी मनाला उच्च भावनेमध्ये गुंतविणे आवश्यक आहे, ज्यामुळे या जगातील वस्तूकडे आपले मन आकर्षित होणार नाही आणि कोणतीही वस्तू आपण योग्य दृष्टीने म्हणजे भगवंताच्या संबंधात पाहू शकू, ही दिव्य दृष्टी आपल्याकडे नसेल तर आपली इंद्रिये व मन आपल्याला भरकटत नेतात आणि आपण कायम असंतुष्टच राहतो. अशी दिव्य दृष्टी केवळ भगवत चिंतनाने प्राप्त होते.

 जी व्यक्ती भगवत चिंतन करत नाही त्या व्यक्तीला इंद्रियभोग प्राप्त करण्यासाठी विषयांचे चिंतन करण्यास इंद्रिये भाग पाडतात. पण, एवढय़ावरच हे चिंतन थांबत नाही तर अनेक परिणामाची दुःखमय साखळी निर्माण होते आणि शेवटी आपल्याला पुनः पुन्हा या जगात दुःख भोगण्यास यावे लागते. या दुःखमय साखळीचे वर्णन गीतेमध्ये केले आहे (भ गी 2.62/63) ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधो।़भिजाये ।क्रोधाद्भ‍वति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति । अर्थात इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. म्हणून जी व्यक्ती भगवतभक्त नाही ती कृत्रिम रीतीने इंद्रिय नियंत्रण करण्याचा कितीही देखावा करीत असली तरी ती शेवटी निश्चितपणे अपयशीच होते, कारण त्या व्यक्तीला भगवंताच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंदाची गोडी प्राप्त झालेली नसते. याच कारणासाठी बुद्धिमान प्रामाणिक व्यक्ती सर्व भौतिक इंद्रियभोग निश्चयाने टाळतो, परिणामतः त्याला सर्वोच्च आनंदाची निश्चित प्राप्ती होते आणि सर्व आसक्तीपासून मुक्त झाल्याने त्याला भगवंताची विशेष कृपाही प्राप्त होते. यासाठी भगवंत स्वतः सांगतात (भ गी 2.64) रागद्वेषविमुक्तैस्तु विषयनिन्दियैश्चरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति । अर्थात आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्त्वानुसार इंद्रियांना नियंत्रण करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो.

भगवंताचा भक्त केवळ त्यांच्या संतुष्टीसाठी कार्यरत असतो म्हणून तो सर्व शारीरिक कार्यापासून होणाऱया परिणामांपासून अनासक्त असतो. तो स्वतःच्या पालनपोषणाची चिंता करत नाही कारण त्याचा दृढ विश्वास असतो की चौऱयाऐंशी लक्ष योनीमधील जीवांची काळजी घेणारे भगवंत त्याचीदेखील काळजी घेतील. अशी व्यक्ती अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत इंद्रियतृप्तीबद्दल उदासीन राहून अनासक्त राहते आणि कोणत्याही परिस्थितीत भगवंताचा त्याग करत नाही. अशा समचित्त भावनेमध्ये राहिल्याने त्या व्यक्तीला जन्म, मृत्यू, जरा व व्याधी यासारख्या भयावह दुःखाचे भय राहत नाही, मग बाकी जीवनात येणाऱया इतर दुःखाचे काय?  इंद्रिय व मन पूर्णपणे मुक्त असेल तर त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर राहते आणि ज्याची बुद्धी स्थिर आहे तोच समाधानी आणि संतुष्ट राहू शकतो.

या जगात आपल्याला शिकविले जाते ‘तुझ्या मनात येईल ते कर’. पण अनियंत्रित मनाला असे स्वातंत्र देणे म्हणजे ‘माकडाच्या हाती कोलीत’ देण्यासारखे आहे. पहिला मन नियंत्रित करावयास शिकले पाहिजे मग कोणतीही वस्तू योग्यरित्या योग्य कारणासाठी वापरली जाऊ शकते. यासाठी गीता, भागवतसारखे ग्रंथ आपल्याला शिकवतात की जोपर्यंत आपली सर्व इंद्रिये भगवंताच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत मन आणि इंद्रियांना संयमित करणे अशक्मय आहे. असे अनेक विद्वान, ज्ञानी, ऋषी, तत्त्वज्ञानी, अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतात पण क्षुब्ध मन आणि भौतिक इंद्रियोपभोगाची सुप्त इच्छा यामुळे त्यांना यश प्राप्त होत नाही.

 म्हणूनच आपले मन हरण करणारा ‘हरी’ यांच्या नामस्मरणात ही शक्ती आहे की एकदा आपले मन त्यांच्याकडे आकर्षित झाले की दुसरीकडे कुठेही मनाला समाधान प्राप्त होत नाही. श्रीकृष्णाचे नाव आहे ‘मनमोहन’, ‘चित्तचोर’. म्हणूनच विनाशाकडे नेणाऱया आपल्या मनाला शरण न जाता भगवंताच्या नामाच्या आश्रय घ्यावा. मग आपलीही अवस्था होईल 

आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया ।

भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद ।।

वृंदावनदास

Related Stories

पुलंचे हस्ताक्षर

Patil_p

पालिकेत 100 टक्के मराठी कारभार कधी होणार ?

Patil_p

लस आली म्हणून निष्काळजीपणा नको

Patil_p

वन महोत्सवाला देऊ नवी दिशा

Patil_p

मुत्सद्यांची कसोटी!

Patil_p

सौर ऊर्जेच्या माध्यमातून रेल्वेने वाचवले तीन कोटी

Patil_p
error: Content is protected !!