तरुण भारत

बेछूट आणि बेलगाम

गेल्या आठवडय़ात एकदम तीन लेखक आठवले-आयर्विन शॉ, ऑर्थर मिलर आणि आयर्विन वालेस. तिघांनी रंगवलेल्या तीन खलनायकांमध्ये न मावणारा खराखुरा खलनायकदेखील आठवला.

चाळीसच्या दशकाअखेरीस अमेरिकेत जोसेफ मॅकार्थी नावाचे वादळ आले होते. हा सद्गृहस्थ सिनेटर होता आणि त्याने समाजातील अनेकांवर देशद्रोही, कम्युनिस्ट, भ्रष्ट वगैरे असल्याचे बेछूट आणि बेलगाम आरोप करायला सुरुवात केली. त्याच्या आरोपांचा धडाका पाहिला तर तो जागतिक विक्रमच होईल. त्याच्या आरोपांमुळे अनेकांची चौकशी झाली. चौकशी सुरू झाल्यावर तत्कालीन नियमांनुसार 10-12 हजार लोकांनी नोकऱया गमावल्या. चौकशीत निर्दोष ठरल्यावर मात्र त्या परत मिळाल्या नाहीत. तीनेकशे लोक तुरुंगात गेले. शेकडो कलाकारांच्या करियर्स आणि आयुष्ये बदनामीमुळे उद्ध्वस्त झाली. त्यांची कामे गेली. यामध्ये डोरोथी पार्करसारखी लेखिका, चार्ली चाप्लीन, आईनस्टाईन अशी व्यक्तिमत्त्वे होती. विशेष म्हणजे हे सारे आरोप बहुतांश वेळा बिनबुडाचे निघाले. खोटय़ा आरोपबाजीला अमेरिकेत ‘मॅकार्थीझम’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. मॅकार्थीझमवर साहित्यिक विश्वात प्रतिक्रिया उमटली नसती तर नवलच. आयर्विन शॉ या लेखकाने द ट्रबल्ड एअर नावाची कादंबरी लिहिली. त्यातला (खल)नायक किंचाळणारा रेडिओ जॉकी किंवा आजच्या भाषेत अँकर आहे. ऑर्थर मिलर या नाटककाराने याच आशयाचे द प्रुसिबल्स नावाचे नाटक लिहिले. आयर्विंग वालेस हा गेल्या शतकातला गाजलेला कादंबरीकार. त्याने लिहिलेली ‘द ऑलमायटी’ ही कादंबरी थोडी वेगळी आहे. यातला (खल)नायक एडवर्ड मोठय़ा वृत्तपत्राचा मालक-संपादक झाल्यावर त्याला नंबर वन होण्याची हाव सुटते. खळबळजनक बातम्या ऊर्फ ब्रेकिंग न्यूज आपल्याला सर्वात आधी किंवा आपल्याला एकटय़ालाच मिळाव्यात म्हणून प्रयत्न करताना तो वाहवत जातो. ब्रेकिंग न्यूज मिळत नसेल तर ती स्वतःच निर्माण करावी म्हणून उच्चपदस्थांचे अपहरण आणि खून करण्यापर्यंत त्याची मजल जाते. तिन्ही साहित्यिकांनी तीन खलनायक असे रंगवले. मॅकार्थीसारखे व्यक्तिमत्त्व तिघात मिळून पुरेसे उतरले आहे की तिघांना व्यापून उरले आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र माध्यमविश्वाची काळी बाजू त्यांनी अचूक रंगवली. हे तिघे एकविसाव्या शतकात सक्रिय हयात असते आणि त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारखी समाजमाध्यमे, ट्रोलिंग, मॅकार्थीप्रमाणे बेछूट आरोप करणारे वृत्तवाहिन्यातले भ्रष्ट अँकर्स पाहिले असते तर हे सर्व त्यांच्या कलाकृतीत समर्थपणे उमटले असते यात संशय नाही.

Advertisements

Related Stories

त्यातें देखोनि विस्मित बाण

Patil_p

विषय महात्म्य

Patil_p

निवडिजे न्यायें पय पाणी

Patil_p

श्रीमद् भागवतमधील शिवशंकर

Patil_p

लेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी

Patil_p

धोका आजही

Patil_p
error: Content is protected !!