तरुण भारत

लसीकरणाची वाढती टक्केवारी आशादायी

मुंबईतील पाचव्या लसीकरणाची टक्केवारी 90 टक्क्यांवर पोहचली आहे. ही आनंदवार्ता असली तरी मध्यंतरी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविरोधात प्रसार करणारे उद्गाते कोण याचा ही शोध होणे गरजेचे आहे. यातून लसीकरणातील अडथळे ही दूर होऊन 100 टक्के लसीकरण होण्यास नक्की मदत होईल.

 8 जानेवारी रोजी मोठा गाजावाजा करून राज्यभर ड्राय रन घेण्यात आली. जिह्यांमधील ड्राय रनमध्ये हवा तसा प्रतिसाद न दिसल्याने  प्रत्यक्षातील लसीकरणचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशात कोरोनाची राजधानी ठरलेल्या मुंबईकडे तर सर्वांचेच लक्ष लागून होते. मुंबईत जसा लसीकरणाला प्रतिसाद मिळेल तसा राज्यभर दिसून येईल अशी आशा सर्वांना होती. प्रत्यक्षात मात्र मुंबईतीलच आरोग्य कर्मचाऱयांकडून लसीकरणाबाबत संशय उपस्थित करण्यात येऊ लागला. आम्हाला घाई नाही आम्ही नंतर लस घेऊ, किंवा घाईत लसीकरण नको, आम्हाला लसीकरणबाबत सांगण्यातच आले नाही, लस घेऊन कोरोना संसर्ग होणार नाही याची काय हमी, आम्हाला कोरोना झालाच नाही तर लस टोचून का घ्या असे एक नव्हे अनेक कारणे लसीकरण टाळण्यासाठी उपस्थित केली जात होती.मात्र विरोधातील हाच संशय आता मावळताना दिसत आहे. त्यामुळेच लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे. पहिल्या दिवशी काहीशे वर झालेले लसीकरण आता हजारात होत आहे. मुंबईत 1 लाख 25 हजार आरोग्य कर्मचारी आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येतील आरोग्य कर्मचाऱयांना अवघ्या 10 ते 15 दिवसात लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़ पालिकेने ठरवले होते. पहिले तीन दिवसाची लस लाभार्थ्यांची संख्या पाहून मात्र काही तरी चुकत असल्याचे सरकारी आरोग्य यंत्रणेलाही उमगले. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी वारंवार आवाहन करूनही लाभार्थी मात्र लस टाळण्याच्या प्रयत्नात दिसून येत होते. को-विन ऍपकडून मेसेज न आल्याचे कारणही पुढे करण्यात येत होते. मात्र या सर्व कारणांच्या मुळाशी लस टाळणे हाच मोठा एक कलमी कार्यक्रम स्पष्ट होत होता. केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एक कोटी दहा लाख डोस कोव्हिशिल्ड लशींचे आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस वितरित करण्यात आले. तरीही लसीकरण करून घेण्यास आरोग्य कर्मचारी धजावत नव्हते. लसीकरणाच्या अडथळ्यात सोशल मीडियाचा वरच्या थरात क्रमांक लागतो.

Advertisements

 लसीकरणाबाबत गैरविचार प्रसार होतील असे व्हीडिओ आणि खोटी वृत्तेदेखील प्रसारित करण्यात आली. कोरोना लसीमुळे नपुसंकत्व येते, नजर जाते ते थेट परत आपल्या शरीरात कोरोनाचे विषाणू जातात या स्वरूपाचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आले. आज देशातील 60 टक्के नागरिक सोशल मीडियाचा वापर करीत असून ही संख्या दर मिनिटाला वाढत आहे फेसबुक, व्हाट्सऍप, ट्विटर व इतर सोशल मीडियाचा वापर तरुण पिढीमध्ये वाढत आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणामुळे होणाऱया साईड इफेक्टच्या बातम्या घराघरात वाचल्या जातात व त्यातून एक अनामिक भीती निर्माण होत आहे व हाच एक मोठा अडथळा असल्याचे मत ज्येष्ठ डॉ. प्रदीप शेलार मांडतात.

 आजपर्यंत देशात कोरोनाची लागण झालेले एक कोटीहून अधिक आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20,09,106  झाली आहे. तर कोरोना मृत्यू संख्या 50,785 एवढी आहे. शिवाय मुंबईत रविवारपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 3,06,050 एवढी झाली आहे तर 11,304 मृत्यूची नोंद करण्यात आली. देश, राज्य आणि मुंबई पातळीवर कोरोनाने थैमान घातले असताना लसीकरणाबाबत कुप्रसिद्धी कारणे चुकीची आहे. लसीकरणाव्यतिरिक्त कोरोनावरील उपचाराचा दुसरा पर्यायही सध्या उपलब्ध नाही. सोशल मीडियावरील किंवा माऊथ पब्लिसिटीमुळे लोक महामारीला गांभीर्याने घेत नाहीत. कोणत्याही आजाराबाबत चुकीच्या माहितीतून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. या अतिसंभ्रमातूनच आजार आणि सरकारी उपाययोजनांकडे सर्वसामान्य दुर्लक्ष करतात तर दुर्लक्षातून आलेला बिनधास्तपणा घातकी ठरत असतो हेही तितकेच खरे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी हेल्थ केअर वर्कर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱयामध्ये मुंबई महानगरपालिकेचे 9 व राज्य सरकार असे एकूण 10 केंद्रांवर मिळून पहिल्या दिवशी 1,926 जणांना लस देण्यात आली होती. लसीकरणबाबत उदासीनता येण्याचे दुसरे कारण पहिल्या दिवशी काही लस केंद्रांवर उशिरा लस देण्यास सुरु झाल्याचेही समजत आहे. व्ही एन देसाईसारख्या  रुग्णालय केंद्रात सकाळी 9.30 पासून लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱयाना दुपारपर्यंत वाट बघावी लागली. लसीचा कोणताही दुष्परिणाम जाणवला नसला तरीही सकाळी लसीकरणासाठी को-विन ऍपमधून मेसेज न येता व्हाट्सअपवरून मेसेज आल्याचे कर्मचाऱयांनी  सांगितले.  तर काहींना आधी बीकेसी केंद्र व नंतर फोन करुन केंद्र बदलल्याचे कळविण्यात आले. दरम्यान, लसीकरणाला विलंब झाल्याने हेल्थ केअर वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली होती. लसीकरणासाठी 9 ची वेळ देऊनही एक वाजून गेला तरी नंबर नाही आल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे काही ठिकाणी दुपारी 2 पर्यंत फक्त 37 लोकांना लसीकरण करण्यात आले असल्याची नोंद आहे. लसीकरणाची वेळ न पाळण्याचे कृत्य लसीकरणाविरोधातील अपप्रचाराहून वाईट घटना होती. तर शनिवारी मात्र टक्केवारी वाढलेली दिसली. ही सकारात्मक बाब आहे. शनिवारी मुंबईत 4,842 आरोग्य कर्मचाऱयाना लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़ ठेवण्यात आले होते. यातील  4,374 जणांना लसीकरण करण्यात आले.

तिसऱया टप्प्यापर्यंत लसीकरणाला गंभीरपणे न घेणारे आरोग्य कर्मचारी 5 व्या टप्प्यात मात्र मोठय़ा संख्येने उपस्थित राहिले असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी झाली होती. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढविण्याचे ठरत आहे. मुंबईतील पाचव्या लसीकरणाच्या वाढत्या  टक्केवारीचा हा परिणाम आहे. हे सकारात्मक असले तरीही कोरोना संसर्गाला वैश्विक विषाणू युद्ध मानले जात असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविरोधात होणाऱया सोशल मीडियावरील प्रचाराकडे दुर्लक्ष करूनही चालणारे नाही. कदाचित हा देखील असंतुष्ट गटांना सहभागी करून सोशल मीडियावरील खेळल्या जाणाऱया युद्धनीतीचा एक भाग असू शकतो.

राम खांदारे

Related Stories

बळीराजा आक्रमक, सरकार बचावात्मक

Patil_p

इतुके दोष माझ्या ठायीं

Patil_p

लाभदायक करार

Patil_p

भाजपचा ताव, ठाकरेंचा मुळावर घाव!

Patil_p

मुक्तपुरुष गुणांच्या पलीकडे असतो

Patil_p

उद्योगस्नेही धोरणाला यश!

Patil_p
error: Content is protected !!