वार्ताहर/ पाल
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवाची यात्रा प्रशासनाने रद्द केल्यामुळे खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी, देवस्थानचे सदस्य, गावातील प्रमुख मानकरी, प्रशासकीय अधिकारी व पोलीस बंदोबस्तात श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा सायंकाळी गोरज मुहूर्तावर शांततेत पार पडला.
प्रथम दुपारी दोन वाजता खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाडय़ातून मिरवणुकीला सुरुवात झाली. तीन वाजता ही मिरवणूक खंडोबा देवालयात आली. तिथे खंडोबाची विधिवत पूजाअर्चा करून खंडोबाचे मुखवटे यावर्षी प्रथमच खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे चिरंजीव तेजराज पाटील यांनी घेतले. 4 वाजता जीपमधून मिरवणुकीला सुरुवात झाली. वाघ्या मुरळी, ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक वाजत गाजत सायंकाळी 5ः30 वाजता बोहल्यावर पोहोचली. तिथे उपाध्याय, प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर श्रीखंडोबा व म्हाळसा यांचा विवाह पार पडला. यावर्षी प्रथमच यात्रेला बाहेरगावाहून येणारे मानकरी व भाविक नसल्यामुळे मुख्य मिरवणूक मार्गावरील नदीपात्रातील दोन्ही वाळवंटे मोकळी वाटत होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनी दर्शन घेतले.