तरुण भारत

हॉकर्सधारकांनी मुख्याधिकाऱयांना घातला घेराव

3 रोजी आत्मदहनाचा दिला इशारा

प्रतिनिधी/ सातारा

राजवाडय़ासमोरील चौपाटीवरील हॉकर्सधारकांनी व्यवसाय करण्यासाठी मुळ जागेवरच परवानगी द्यावी या मागणीसाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना घेराव घालत दि. 3 रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, नगराध्यक्षा माधवी कदम यांना याच शिष्टमंडळाने भेट देवून युनियन क्लबमधील मंडईच्या पार्किंगमध्ये तात्पुरती जागा देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी गांधी मैदानावरील जागा देता येणार नाही, असे सांगितले. अखेर हॉकर्सधारक खासदार उदयनराजे यांनाच भेटणार असल्याचे ठरले.

सातारा पालिकेने ऐतिहासिक अशा राजवाडा चौपाटीचे आळूच्या खड्डय़ात पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यावरुन हॉकर्सधारकांनी सातारा पालिकेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना घेराव घालत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन देताना विश्वास जगताप, राजू राजपुरे, रामआधार काहार, निलम निकम, पुनम खंडागळे, विश्वास पाष्टे, श्यामराव शिंदे, राजेंद्र साळुंखे, कुलदीप पवार, शिवाजी काहार, उमेश काळे, अमोल झंवर, स्वप्नील महाडिक, सुनील महाडिक, विक्रम घोडके, आसिब शेख, विजय सराफ, पन्नालाल नलावडे, सुनील धावडे, राजेंद्र धावडे, नितीन सुपनेकर, विजय राजपुरे, हिरा इंगळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, राजवाडा चौपाटीची कोणतीही पूर्वकल्पना न देता हटवली व पर्यायी जागा म्हणून सातारा पालिकेने आम्हास पर्यायी जागा दिली आहे ती पूर्णपणे हागणदारीत आहे. त्याचप्रमाणे त्या जागेच्या शेजारी जो ओढा वाहत आहे त्यामध्ये पूर्णपणे शहरी भागातील ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. तेथे साप, विंचू यांचा वावर मोठय़ा प्रमाणावर आहे. व्यवसायिक व ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो, ती जागा पुरेशी नाही. त्यामुळे आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. कायमस्वरुपाची जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत जुन्या जागीच व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यवसायिकांनी बँकेची कर्जे काढून आपले व्यवसाय सुरु केले आहेत. जवळजवळ एक वर्ष झाले चौपाटी बंद असल्यामुळे बँकेचे हप्ते भरणार कसे त्यांना बँकेच्या वसुलीच्या जप्तीच्या नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे व्यवसायिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. व्यावसायिकांच्या मुलांच्या शिक्षणाचासुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायासाठी दि. 3 रोजी सातारा पालिकेच्यासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा दिला आहे.

नगराध्यक्षांकडे युनियन क्लबच्या जागेची मागणी

हॉकर्सचे शिष्टमंडळ हे नगराध्यक्षा माधवी कदम यांना भेटले. नगराध्यक्षांकडे त्यांनी तब्बल पाऊण तासभर चर्चा केली. त्याचवेळी नगराध्यक्षांकडे जुनाच ठिकाणी परवानगी मागताच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्यास नकार दिला. महाराज साहेबांनी तुम्हाला कुठे परवानगी दिली आहे त्याच जाग्यावर बसा, असे सांगितले. तर नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनीही महाराज साहेबांच्यासमोर चिठ्ठय़ा टाकल्या. त्यावेळी तुम्ही का नाही बोलला, असा प्रश्न केला. त्यावर हॉकर्सधारकांनी तुर्तास आम्हाला युनियन भाजी मंडईतल्या पर्किंगची तरी जागा द्या, अशी विनंती केली.

Related Stories

रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम व जागता पहारा

Patil_p

सातारा नगरपालिका निवडणूकीत मनसे सर्व जागा लढविणार

triratna

साताऱ्यात आज २० रुग्ण कोरोनामुक्त, एक पॉझिटिव्ह

Shankar_P

सातारा शहर, परिसरात पाच बाधित

triratna

बनगरवाडीत लाखो रुपयांचा गांजा जप्त

Patil_p

जिल्हा महिला कॉंग्रेसच्या फलटण, माण तालुका निवडी जाहीर

Patil_p
error: Content is protected !!