भक्तिमय वातावरणात श्री खंडोबा-म्हाळसाचा विवाह सोहळा संपन्न; गावकऱ्यांच्या उपस्थिती
प्रतिनिधी / उंब्रज
लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा प्रमुख मानकरी, वऱ्हाडी मंडळी व तुरळक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदीर परिसर व वाळवंट भाविकांविना सुना पडल्याचे चित्र होते. ऐऱ्हवी पिवळ्या धमक भंडाऱ्यात नाहून निघणाऱ्या तारळीचा काठ भाविकांविना मात्र ओस पडल्याचे चित्र होते मात्र प्रशासणाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन ग्रामस्थांनी यात्रेचा मुख्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावर्षी प्रथमच देवराज पाटील यांचा मुलगा तेजराज देवराज पाटील यांना प्रमुख मानकरी म्हणून यात्रेचा मान देण्यात आला.
महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र पाल येथे तारळी नदीकाठी सोमवार दि.२५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. गोरज मुहूर्तावर मोजक्या गावातील नागरिकांसह मानकरी यांच्या उपस्थितीत श्री खंडेराया-म्हाळसाशी विवाह सोहळा यावेळी संपन्न झाला. जरवर्षी लाखो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहतात मात्र यावर्षी सर्वच यात्रा जत्रांवर कोरोना महामारीमुळे संक्रांत आली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात पाल यात्रा रद्द केल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार ठिकठिकाणी पोलिसांनी बँरिगेट लावून रस्ते अडविले आहेत. काल रात्रीपासून अनेक भाविक पालीकडे येत होते. त्यांना रस्तातून माघारी फिरण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे भाविकांनी नाराजीही व्यक्त केली.
पाल यात्रेतील हत्ती वरील मिरवणूक चार वर्षापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हत्ती ऐवजी रथ हे मुख्य मिरवणुकीचे आकर्षक असतो पंरतु यावर्षी ना हत्ती ना रथ वापरता साध्या पद्धतीने फुलांनी सजवलेल्या जीप मधून एकाच मानाच्या गाड्यासह गावातील मानकरी यांनी यावर्षी मिरवणूक काढली. आज विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत पाल नगरीत येणारे सर्व रस्ते बंद करून चोख बंदोबस्त ठेवला होता. संचारबंदी असल्याने कोणालाही मंदिर परिसरातील १० किलोमीटर अंतरावरून आत प्रवेश देण्यात आला नाही.
दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या घराजवळ गावातील मोजकेच मानकरी उपस्थित होते. त्यानंतर मानकरी देवराज पाटील यांचा मुलगा तेजराज पाटील यांनी ग्रामप्रदक्षिणा घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले. यावेळी तेजराज पाटील यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसवून अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली. अंधार दरवाजाजवळ मिरवणूक आल्यानंतर तेजराज पाटील हे पोटास बांधलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा या देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या जीप या वाहनात ४.३० वाजता विराजमान झाले.
त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी ‘येळकोट येळकोट…जय मल्हार, सदानंदाचा येळकोट..’चा गजर मोजक्याच उपस्थितांनी केला. या मिरवणुकीत गावातील सासनकाठ्या, मानाचा गाडा, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. देवालयातून निघालेली मिरवणूक तारळी नदीत उभारण्यात आलेल्या भराव पुलावरून वाळवंटातून नदीच्या पश्चिमेकडील तीरावर पोहोचली.यावेळी मोजक्याच भाविकांनी भंडारा, खोबऱ्याची उधळण करण्यास सुरूवात केली. मानकरी देवाचे मुखवटे बरोबर घेवून जीपमधून विवाह समारंभासाठी ठराविक वऱ्हाडी मंडळीसमवेत विवाह मंडपाकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास मिरवणूक विवाह मंडपात पोहोचली. मानकऱ्यांनी देवास बोहल्यावर चढविल्यानंतर पारंपारिक पध्दतीने गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाह सोहळा विधीवत पार पडला. ‘येळकोट..येळकोट’च्या जयघोषात करण्यात आला.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे तारळी नदी पात्रात दरवर्षी खचाखच भरणारी यात्रा वाळवंटात मोकळी दिसून येत होती.यात्रा शांततेत व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व उंब्रज पोलीस ठाणे आणि आरोग्य विभाग सतर्क राहिला होता. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचे सपोनि अजय गोरड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तासाठी १० पोलीस अधिकारी, ८८पोलीस कर्मचारी, ७६ होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे,यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.