तरुण भारत

सिक्कीम सीमेवर भारत-चीन सैनिकांमध्ये मारामारी

चीनचे बरेच सैनिक जखमी, गेल्या आठवडय़ातील घटना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेल्या आठवडय़ात सिक्कीममधील डोंगराळ सीमारेषेवर भारताच्या आणि चीनच्या सैनिकांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त आहे. डोंगरमाथ्यावर झालेल्या संघर्षात चीनचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून भारताचेही काही सैनिक घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱयांमध्ये लडाख सीमेवरील तणाव हटविण्यासंबंधी चर्चा होत असताना सिक्कीम सीमेवर ही घटना घडली आहे. या मारामारीचे वृत्त देताना सेनेच्या प्रवक्त्याने हा फारसा गंभीर प्रसंग नव्हता, असा खुलासा केला. सैनिकांमध्ये मारामारी सुरू झाल्यानंतर स्थानिक कमांडर्सनी तंटा सोडविला. त्यामुळे फारशी गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. ही मारामारी सिक्कीमच्या नाकू ला या भागात घडल्याचे सांगण्यात आले.

घुसखोरी अयशस्वी

गेल्या सोमवारी चीनच्या काही सैनिकांनी भारताची सीमारेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैनिकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी प्रथम चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांशी मारामारी सुरू केली. भारताने चोख प्रत्युत्तर दिले. साधारणतः एक तास हा संघर्ष सुरू होता. अखेर चीनी सैनिक सीमेवरून मागे हटले. स्थानिक सैन्याधिकाऱयांनी मध्यस्थी करत त्यांना एकमेकांपासून दूर केले. नाकू ला येथे 9 मे 2020 मध्येही असाच संघर्ष झाला होता.

गलवानची पुनरावृत्ती टाळली

सिक्कीम येथील संघर्ष हाताबाहेर गेला असता तर 6 मे 2020 या रात्री लडाख मधील गलवान खोऱयात घडलेल्या संघर्षाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. गलवान येथील रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनच्या 50 हून अधिक सैनिकांचा खात्मा झाला होता. चीनने सीमारेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याने हा संघर्ष निर्माण झाला होता. नाकू ला मात्र संघर्ष लवकर आवरता घेतला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बॉक्स

संपूर्ण सैन्य माघार चीनला हवी

लडाख आणि इतरत्र भारत व चीनच्या सीमेवर असणाऱया प्रत्येक संघर्षबिंदूवरून दोन्ही देशांनी आपले सैनिक पूर्णतः मागे घ्यावेत असे आवाहन चीनने केले आहे. सैनिकांची माघार झाल्यास तणावही कमी होईल, असे प्रतिपादन चीनच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्याने केले. दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱयांच्या चर्चेत यावर एकमत झाल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, भारताने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. चीनने सीमेवरून याचे सैन्य पूर्ण मागे नेऊन मे 2020 पूर्वीची परिस्थिती निर्माण करावी, अशी मागणी भारताने केली आहे.

Related Stories

भारत दोन वर्षात टोलनाकामुक्त होणार

datta jadhav

DRDO ने तयार केली ड्रोनविरोधी यंत्रणा

datta jadhav

कर्नल, मेजरसह पाच जण हुतात्मा

Patil_p

आसाम : पुरामुळे 110 जणांचा मृत्यू

Patil_p

पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी साधला संवाद

triratna

शहतूत धरणासंबंधी भारत-अफगाणिस्तान यांच्यात करार

Patil_p
error: Content is protected !!