तरुण भारत

शेतकऱयांच्या हितालाच सरकारचे प्राधान्य

गणतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे प्रतिपादन – सैनिक, शास्त्रज्ञांचाही गौरव 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

शेतकऱयांचा लाभ व्हावा, म्हणून सरकारने कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रयत्नात प्रारंभी काही प्रमाणात गैरसमज निर्माण झाला असला तरी, सरकार शेतकऱयांच्या हिताचीच पावले उचलत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 72 व्या गणतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रला उद्देशून केलेल्या भाषणात केले. त्यांनी भाषणात कोरोना स्थिती, भारत-चीन संबंध इत्यादी महत्वपूर्ण मुद्दय़ांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

भारतासारख्या विस्तृत आणि प्रचंड लोकसंख्येच्या देशाची अन्नसुरक्षा शेतकऱयांमुळेच सुनिश्चित झाली आहे. यासाठी सारा देश शेतकऱयांचा ऋणी आहे. शेतकऱयांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि, कोणत्याही सुधारणा करत असताना प्रारंभीच्या काळात गैरसमज निर्माण होत असतात. सरकार जे करेल ते शेतकऱयांच्या हितासाठीच करेल याची शाश्वती बाळगावी असे आवानह त्यांनी केले.

सैनिकांचाही गौरव

कष्टाळू शेतकऱयाने देशाची अन्नसुरक्षा निश्चित केली आहे, त्याचप्रमाणे आपले शूर सैनिक प्राणपणाने देशाच्या सीमांचे संरक्षण करीत आहेत. अत्यंत बिकट नैसर्गिक परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपल्या देशाला शत्रूपासून सुरक्षा दिली आहे. देश त्यांचाही आभारी आहे. असे उद्गार त्यांनी लडाख सीमेवरील तणाव आणि दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन यांच्या संदर्भात काढले.

सुधारणा सातत्यपूर्ण

आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम देशाने अनेक अडथळय़ांना ओलांडत अव्याहतपणे सुरू ठेवला आहे. कृषी क्षेत्रातही सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. यासाठी कायदे करण्यात आलेले आहेत. सरकार अत्यंत गंभीरपणे आणि सातत्यपूर्ण रितीने सुधारणांच्या मार्गावर अग्रेसर आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

शास्त्रज्ञांकरिता कृतज्ञता

सध्याच्या कोरोना काळातील आव्हानात्मक परिस्थितीत शास्त्रज्ञांनी विशेष कार्य केलेले आहे. अंतराळ ते शेती, शिक्षण संस्था ते रूग्णालये अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली प्रतिभा आणि प्रज्ञा यांच्या जोरावर देशाची मान उंचावली आहे. कोरोना विषाणूचा अंत करण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करीत आहेत. विक्रमी कालावधीत त्यांनी कोरोनाविरोधातील देशी लस शोधून काढली आहे. या संशोधनामुळे त्यांनी मानवतेच्या समाधानात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यासाठीही देश कृतज्ञ आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱयांचा उल्लेख

आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी कोरोना काळात देशाची सेवा बजावलेले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांचा विशेष आदराने उल्लेख केला. त्यांच्या अथक परिश्रमामुळे या आव्हानावर मात करण्याचा आत्मविश्वास देशाला प्राप्त झाला आहे. त्यांच्यामुळेच देशात जगाच्या तुलनेत कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात राहिला आहे, याचाही आवर्जून उल्लेख राष्ट्रपतींनी केला व त्यांचा गौरव केला.

Related Stories

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्वारंटाईन सक्तीचे

Patil_p

देशात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण पोहोचले 4 लाखांच्या पार

Patil_p

यु-टय़ूब, जी-मेलसह गुगलच्या सेवा ‘डाऊन’

Patil_p

७ महिन्यानंतर सोन्याच्या दरात घसरण

triratna

वाझेंना कोठडी, आणखी तीन अधिकारी ताब्यात

Patil_p

आसाममध्ये 1616 उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p
error: Content is protected !!