तरुण भारत

विविध उद्योगांतून मिळणार 37247 नोकऱया

प्रतिनिधी/ पणजी

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने एकूण रु. 15,780.54 कोटी गुंतवणुकीच्या 196 प्रकल्पांना मान्यता दिली असून त्यात 37247 जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेतील अभिभाषणातून दिली. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन सक्षमतेनुसार राज्याचा विकास साधण्याचे व गोवा सुवर्ण राज्य करण्याचे ध्येय साकारुया, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, म्हादई पाणी तंटा प्रकरणी सरकार गोव्याचे हितरक्षण करण्यास कटिबद्ध आहे. म्हादई लवादाच्या निवाडय़ास न्यायालयात आव्हान देण्यात आले असून ती याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. कर्नाटकाने म्हादईचे जे पाणी वळवले आहे त्याची अवमान याचिका देखील न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

उद्योग आधार योजनेंतर्गत 18554 रोजगार

उद्योग आधार योजनेंतर्गत 2020-21 या वर्षात 1852 उद्योगांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यांची एकूण गुंतवणूक रु. 660 कोटी आहे तर 18554 जणांना त्यातून नोकऱयांचा लाभ होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

कायदा-सुव्यवस्थेचे पालन झाल्याने गुन्हेगारी नियंत्रणात

कायदा-सुव्यवस्थेचे चांगले पालन झाल्यामुळे एकंदरीत गुन्हेगारी नियंत्रणात राहिली असून गुन्हे शोधण्याचा दर 84 टक्क्यावरून 92 टक्क्यावर आल्याचे ते म्हणाले. अमलीपदार्थाविरोधात पोलीस खात्याने धडक कारवाई करून 79 प्रकरणे नोंद केली तर सुमारे रु. 3 कोटीहून अधिक किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. गोवा अमलीपदार्थापासून मुक्त करण्याची मोहीम राबवण्यात येत असून सांगे पोलीस स्थानकात देशभरातील पाचव्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्याची माहिती राज्यपालांनी दिली.

मोपा विमानतळ ऑगस्ट 2022 मध्ये होणार पूर्ण

मोप विमानतळाचे काम युद्धपातळीवर चालू असून ते ऑगस्ट 2022 मध्ये पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोरोनाकाळातही कदंबचे चांगले सेवाकार्य

कदंब वाहतूक महामंडळाने कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये चांगली कामगिरी बजावली आणि प्रवाशांना सेवा दिली. गोव्याबाहेर अडकून पडलेल्या राज्यातील रहिवाशांना परत आणून घरी सोडण्याची व्यवस्था केली. 150 इलेक्ट्रिक बस गोव्यासाठी मंजूर झाल्या आहेत.

वाहन परवान्यांच्या मुदतीत 31 मार्च 2021 पर्यंत वाढ

मोटार वाहनाच्या सर्व प्रकारच्या परवान्याची मुदत कोरोना संकटामुळे 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वाहतूक खात्यातर्फे 33 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. खासगी उद्योगांना रोजगार केंद्राच्या कक्षेत आणले असून तेथे स्थानिकांना नोकऱया मिळतील म्हणून सरकारचे प्रयत्न आहेत, असेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपालांकडून सरकारचे अभिनंदन

गोव्यातील कोरोना नियंत्रणात ठेवून त्यावर ताबा मिळवला म्हणून राज्यपालांनी सरकारचे अभिनंदन केले. कोरोना लॉकडाऊन काळात ठप्प झालेले सर्व व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरळीत झाले आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत गोवा राज्याला केंद्राची आर्थिक मदत मिळाल्याचे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मोहीम राज्यात चालू करण्यात आली असून सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग त्यासाठी कामाला लावण्यात आला आहे.

जि.पं. निवडणूक यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन

जिल्हा पंचायत निवडणूक यशस्वीपणे घेतली म्हणून राज्यपालांनी आपल्या भाषणातून सरकारचे व जनतेचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाकाळातही 292.22 कोटींचा महसूल गोळा

राज्य सरकारने 2019-20 मध्ये रु. 491.80 कोटीचा महसूल प्राप्त केला तो 2018-19 च्या तुलनेत (रु. 478.04 कोटी) जास्त आहे. लॉकडाऊन काळातही रु. 292.22 कोटी महसूल प्राप्त करण्यात सरकारला यश आल्याचे ते म्हणाले.

राज्यपालांनी अभिभाषण केवळ 3 मिनिटेच वाचले

राज्यपालांनी अभिभाषण केवळ 3 मिनिटेच वाचले. आपणास समस्या असल्याने भाषण पूर्ण वाचले असे गृहित धरावे असे सांगून ते खाली बसले. त्यानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी राज्यपालांनी भाषण पूर्णपणे वाचल्याचे सूचित केले. राज्यपालांच्या भाषणानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा आमदार लुईझिन फालेरो व आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यपालांवर टीका केली. तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून त्यास आक्षेप घेतला आणि राज्यपालांवर विधानसभेत टिपणी करणे योग्य नाही असे सुनावले. राज्यपालांचे भाषण एकूण 47 पानांचे होते. तथापि त्यांनी पहिली व शेवटची दोन पाने वाचून भाषण आटोपले.

Related Stories

बांदोडा पंचायतीतर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

वास्कोत अन्य एक धर्मगुरू आणि त्यांच्या दोघा पदाधिकाऱयांना कोरोनाची लागण, कंटेन्मेंट झोनमध्येही रूग्णांची वाढ

Omkar B

लोकायुक्तांचा आदेश हायकोर्टात रद्दबातल

Patil_p

महापौर, उपमहापौर निवडणूक उद्या

Patil_p

केरी सातेरी केळबाय आजोबा देवस्थानचे दैनंदिन पुजा अर्चा

Amit Kulkarni

मुरगाव पालिका क्षेत्रातील पेचप्रसंगाला नगरविकास मंत्रीच जबाबदार,

Amit Kulkarni
error: Content is protected !!