तरुण भारत

हिंसाचाराने ‘प्रजासत्ताक दिना’ला गालबोट

शेतकऱयांच्या हिंसेविरोधात 22 एफआयआर ; 200 हून अधिक आंदोलकांना अटक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारामुळे ‘प्रजासत्ताक दिना’ला गालबोट लागले. या हिंसाचारानंतर पोलीस दल अधिक सतर्क झाले असून आतापर्यंत हिंसाचार आणि तोडफोडीप्रकरणी 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर धुडगूस घालणाऱया 200 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे विभागाकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, हिंसाचारावेळी एका ऍडिशनल डीसीपीवर तलवारीने हल्ला करण्यात आला असून 300 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारीही जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरसह योगेंद्र यादव तसेच राकेश टिकैत यांच्यासह 26 शेतकरी नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांनीच याबाबत माहिती दिली आहे. ट्रक्टर रॅलीत नियम मोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आंदोलकांची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर लाल किल्ला आणि सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने लाल किल्ला आणि जामा मशिद मेट्रो स्थानक बुधवारीही बंद ठेवले होते.

सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. शेतकरी येथूनच आंदोलनात सक्रीय झाले होते. तिकडे, लाल किल्ल्यावरदेखील सुरक्षा वाढवली आहे. तिथे सध्या रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे परिसरात लक्ष ठेवले जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी बुधवारी लाल किल्ल्यावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा तणावाचे वातावरण राहू नये, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होऊ नये तसेच कोणाचा जीव जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून फरिदाबादमध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत.

कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काल दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱयांनी ट्रक्टर मोर्चा काढला होता. पण या ट्रक्टर मोर्चाला हिंसाचाराचे वळण लागले होते. ट्रक्टर मोर्चासाठी जो मार्ग आखून दिला होता, त्या मार्गावरुन न जाता शेतकरी आंदोलक दुसऱया मार्गाने दिल्लीत घुसले. आयटीओ येथे दिल्ली पोलिसांबरोबर संघर्ष करुन हे आंदोलक लाल किल्ल्यामध्ये घुसले. शेकडो आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली व बसेसची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडून लाठीचार्ज करावा लागला.

हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांमध्ये उभी फूट

हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनामध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.  गेल्या 58 दिवसांपासून आंदोलनामध्ये सामील असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने आंदोलनातून माघार घेत असल्याचा निर्वाळा दिला आहे. याबाबत संघटनेचे व्ही. एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर आरोपही केले. टिकैत यांचे विचार वेगळेच असून सद्यस्थितीत आम्ही आंदोलनातील सहभाग पुढे कायम ठेऊ शकत नाही असेही स्पष्ट केले. याखेरीज भारतीय किसान युनियन या संघटनेनेही हिंसाचारानंतर आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. हिंसाचारानंतर आम्ही अत्यंत दुःखी असून आम्ही आमचे 58 दिवसांचे आंदोलन मागे घेत आहोत’ असे संघटनेचे नेते ठाकूर भानू प्रताप सिंग यांनी जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीची मागणी

हिंसाचार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तपास आयोग नेमून चौकशी केली जावी अशी मागणी करणारी जनहित याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱयांच्या विरोधात विविध संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई केली जावी अशी मागणीही करण्यात आली आहे. तपास आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे द्यावे. आयोग तीन सदस्यांचा हवा आणि त्यातील दोन न्यायाधीश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपकडून तिरंगा रॅलीची हाक

दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱयांच्या ट्रक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेवरुन आणि लाल किल्ल्यामध्ये झालेल्या गोंधळावरुन सर्वच स्तरामधून टीका होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवरही याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीमध्ये तिरंगा फडकवण्याची घोषणा केली असून यासाठी विशेष तिरंगा रॅली काढण्याची घोषणा केली आहे. कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरुन झेंडा रॅलीची घोषणा केली. शनिवार, 30 जानेवारी रोजी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून हा मोर्चा सुरु होईल. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या मोर्चामध्ये नक्की सहभागी व्हा,’’ असे शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गुन्हेगारी षड्यंत्रासह 13 कलमांतर्गत गुन्हे

गेल्या 60 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान जे नेते सरकारसोबत चर्चा करत होते. त्या सर्वांवर हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारी षड्यंत्र, लाल किल्ल्यावर दरोडा, घातक शस्त्रांचा वापर अशा प्रकारचे विविध 13 कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून दिल्लीत निघणाऱया ट्रक्टर परेडच्या आयोजनात आयोजक म्हणून या सर्वांची नावे होती. त्यामुळे आयोजकांना याला जबाबदार धरुन या सर्व लोकांची नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली आहेत.

गुन्हे दाखल झालेले नेते

नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग, कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगतसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गेहलोत यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश आहे.

लाल किल्ल्यावरील खांबावर ‘निशान साहिब’चा झेंडा

आंदोलकांनी लाल किल्ल्यामध्ये घुसून हिंसाचार केला. या वेळी एका आंदोलकाने लाल किल्ल्यावरील खांबावर चढून शीख धर्माशी संबंधित ‘निशान साहिब’ हा झेंडा फडकवला. लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ फडकवणाऱया युवकाची ओळख पटली असून तो पंजाबच्या तरण तारण जिह्यातील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या या प्रकाराचा अनेक राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे.

भाजपचाच डाव असल्याचा ‘आप’चा आरोप

दिल्लीत शेतकऱयांच्या आंदोलनात काल जो हिंसाचार झाला त्याला भाजपचा हस्तक दीप सिद्धू हाच जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आज येथे या संबंधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी हिंसाचार माजवणे हा भाजपचाच नियोजनबद्ध डाव असल्याचा आरोप केला. दीप सिद्धू आणि भाजपचे कसे संबंध आहेत या संबंधातील छायाचित्रे व ठोस पुरावेही त्यांनी यावेळी सादर केले.

Related Stories

सुरत : बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाच जण ताब्यात

Rohan_P

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट

Patil_p

सलग पाचव्या महिन्यात जीएसटी 1 लाख कोटींवर

Patil_p

राज्यसभा उपसभापतिपदासाठी राजदचे मनोज झा उमेदवार

Patil_p

दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P
error: Content is protected !!