तरुण भारत

आता राजहंसगडाची महती देशभरात

पोस्ट विभागाने काढला विशेष लिफाफा : वीरसौध, रामकृष्ण मिशन आश्रम, किल्ला तलाव लिफाफ्यावर

सुशांत कुरंगी / बेळगाव

Advertisements

बेळगावच्या ऐतिहासिक व पर्यटनक्षेत्रात भर घालणारा राजहंसगड आता देशभरात पोहोचणार आहे. बेळगाव पोस्ट विभागाने राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधून एका विशेष लिफाफ्याचे अनावरण केले आहे. या लिफाफ्यावर राजहंसगडाची माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे. या विशेष लिफाफ्याची किंमत 20 रुपये असून, बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयात तो उपलब्ध असणार आहे. यामुळे ज्या ज्या ठिकाणी हा लिफाफा पोहोचेल त्या त्या ठिकाणी राजहंसगडाची माहिती पोहोचली जाणार आहे.

बेळगावपासून अवघ्या 13 ते 14 कि. मी. अंतरावर असणाऱया राजहंसगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. यादव, बहामनी, आदिलशाही व मराठा सरदारांच्या अधिपत्त्याखाली हा किल्ला होता. बेळगाव येथील भुईकोट किल्ल्याचा एक संरक्षक कडा म्हणून राजहंसगड त्या काळी काम करत होता. कोकणातील गोवा व कारवार येथील आक्रमणे थोपविण्यासाठी हा किल्ला महत्त्वाची भूमिका बजावत होता. समुद्रसपाटीपासून अंदाजे 3,200 फूट उंचीवर या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती लिफाफ्यावर देण्यात आली आहे.

येळ्ळूरजवळील राजहंस गडाला दररोज हजारो पर्यटक व शिवप्रेमी भेटी देत असतात. मागील काही वर्षांपासून बेळगावमधील एक पर्यटनस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. गडावर शंकराचे एक मंदिर असून पाण्याची विहीर आहे. या गडावरून आसपासच्या परिसराचा नयनरम्य असा देखावा पाहता येतो. बेळगावमधून वडगाव-येळ्ळूरमार्गे गडावर पोहोचता येते. पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या राजहंसगडाला पोस्ट विभागाने लिफाफ्यावर स्थान दिले आहे.

या लिफाफ्याचे अनावरण नुकतेच एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, धारवाड पोस्ट विभागाच्या पोस्टमास्टर जनरल वीणा श्रीनिवासन, बेळगाव फिलॅटली गॅलरीचे प्रमुख धर्मेंद्र जोई व पोस्ट अधीक्षक एच. बी. हसबी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

बेळगाव-नाशिक विमानसेवेचा विशेष लिफाफा

स्टार एअरने नुकतीच बेळगाववरून नाशिक शहराला विमानसेवा सुरू केली. यानिमित्त पोस्ट विभागाने याचा विशेष लिफाफा काढला आहे. 100 रुपये इतकी या लिफाफ्याची किंमत आहे. नाविण्यपूर्ण डिझाईन करून हा विशेष लिफाफा बनविण्यात आला आहे. यावर कर्नाटकातील सुरेबान येथील मंदिर तर दुसऱया बाजूला नाशिकचा पंचवटी परिसर दाखविण्यात आला आहे. सोमवारी बेळगाव विमानतळावर या कव्हरचे अनावरण करण्यात आले.

रामकृष्ण मिशन आश्रम, वीरसौध आता लिफाफ्यावर

राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधून बेळगाव पोस्ट विभागाने बेळगावमधील ऐतिहासिक व पर्यटनच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱया स्थळांना लिफाफ्यावर विशेष स्थान दिले आहे. रामकृष्ण मिशन, वीरसौध व किल्ला येथील तलावाचा परिसर यांची माहिती यावर देण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद हे बेळगावमध्ये आले होते, यावेळेची माहिती देण्यात आली आहे. महात्मा गांधीजींची बेळगाव भेट व वीरसौध याविषयी माहिती लिफाफ्याद्वारे देण्याचा प्रयत्न पोस्ट विभागाने केला आहे.

Related Stories

पहिले रेल्वेगेटवरील बॅरिकेड्स हटवा

Amit Kulkarni

बेळगाव-पणजी महामार्ग रुंदीकरणातील अडथळे दूर कसे होणार?

Omkar B

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 5 रोजी

Patil_p

दहावीचा आज शेवटचा पेपर

Patil_p

जितोच्या नूतन पदाधिकाऱयांचा पदग्रहण समारंभ

Amit Kulkarni

कर्नाटकचे कृषिमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!