तरुण भारत

संघम् शरणम् गच्छामी- कै. बाबुराव देसाई

रा.स्व. संघ आणि वि.हिं.प.चे ज्येष्ठ प्रचारक, नेते बाबुराव देसाई (97) यांचे 22 जानेवारीला निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख.

माझा बाबुरावांशी परिचय झाला तो एक योगायोगच होता. पूर्वी बेळगावच्या मारुती गल्लीत यशवंत भांडार नावाचे निखार्गे-जोशी यांचे इलेक्ट्रिक सामानाचे दुकान होते. सहज म्हणून दुकानात गेलो. त्यावेळी बंडोपंत जोशी म्हणाले, संघ कार्यालयात श्री. बाबुराव देसाई आहेत. त्यांना हे औषध नेऊन दे. बाबुराव आजारी होते. त्यांनी भेटलो तो माझा पहिला परिचय. त्यांनी माझे नाव-व्यवसाय, राहतो कुठे वगैरे चौकशी केली. वाचनाची आवड आहे काय असा प्रश्न केला. कशाला नाही म्हणायचे म्हणून आहे म्हणालो. बँक संपल्यानंतर ये, आपण पुस्तक वाचू. त्याप्रमाणे मी गेलो. त्यांनी ‘भस्मासुराचा उदयास्त’ हे पुस्तक वाचण्यास सांगितले. बाबुराव हे कुशल संघटक होते. त्याप्रमाणे एक शिक्षकपण होते. पुस्तक कसे वाचावे हे त्यांनी मला शिकवले. तेव्हापासून मला वाचनाची आवड निर्माण झाली.

Advertisements

बाबुराव देसाई हे मूळचे गोव्याचे. त्यांच्या वडिलांचा फळांचा व्यापार. बेळगावच्या कडोलकर गल्लीत त्यांचे दुकान. त्यामुळे बाबुराव बेळगावात मोठे झाले. हायस्कूल शिक्षण सेंट पॉल विद्यालयात. संस्काराचे वातावरण परकीय. महाविद्यालयीन शिक्षण लिंगराज कॉलेज येथे. प्रेंच भाषेवर असामान्य प्रभुत्व. परकीय भाषांचा प्रभाव. वास्तव्य फुलबाग गल्लीत. शेजारी राहणारा सदबा पाटील त्यावेळच्या बेळगाव बँकेतील शिपाई. बाबुरावांना म्हणावयाचा बाबू संध्याकाळी शाखेवर ये. संघ म्हणजे काय? हिंदू संघटन, सदबा म्हणावयाचा. कसलं हिंदू संघटन? फालतू काही तरी सांगू नको. कसला संघ, चल सिनेमाला जाऊया, असा संवाद होत असे. सदबा म्हणजे चिंचेपेक्षा चिवट. शेवटी बाबुरावांना त्यांनी संघात आणलेच. तेव्हापासून बाबुरावांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. बाबुरावांचा पिंड हा चिकित्सक विचारांचा. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार विचार केल्याशिवाय ते करीत नसत. कुणीतरी सांगितले म्हणून त्याचा स्वीकार बाबुरावांनी केला, असे कधीच शक्मय नव्हते.

गरीब, श्रीमंत, लहान-मोठी ही सगळी मंडळी एक कुणीतरी आज्ञा सोडते, ते निमूटपणे सारे ऐकतात, याचे बाबुरावांना आश्चर्य वाटायचे. संघ प्रार्थनेचा त्यांच्यावर फार परिणाम झाला. संघ प्रार्थनेतून मला संघ समजला. ज्याला संघ समजावून घ्यावयाचा आहे त्यांनी संघ प्रार्थना व प्रातःस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे, असे ते म्हणायचे.  बी. ए. ची पदवी घेतल्यानंतर त्यांचे नवीन जीवन सुरू झाले. संध्याकाळी सिनेमाला जाणारे बाबुराव समाजात मिसळणारे बाबुराव झाले. प्रत्येकाला या जगात पाठवताना परमेश्वराची एक योजना असते. परमेश्वराने बाबुरावांना सांगितले असावे की स्वतःसाठी जगू नकोस-समाज, राष्ट्रासाठी जग. बाबुराव यांनी ते असिधाराव्रत शेवटच्या क्षणापर्यंत पाळले.

संघ प्रचारकाचे जीवन जगण्याचा निश्चय केल्यानंतर बेळगाव जिल्हा प्रचारक, धारवाड विभाग प्रचारक, प्रांत प्रचारक अशा अनेक जबाबदाऱया त्यांनी सांभाळल्या. संघटनेच्या कामाच्या निमित्ताने रोज नवीन गावात वास्तव्य. अनेकांच्या घरी जाणे येणे. बेळगावात कै. गणपतराव कुलकर्णी, कै. ग. गो. राजाध्यक्ष, कै. पांडुरंग निखार्गे, गोविंदराव गाडगीळ, अशोक भंडारी यांच्याकडे त्यांचे वास्तव्य असायचे. मी पण स्वतःला भाग्यवान समजतो. बाबुराव आमच्या घरीसुद्धा खूप वेळा येऊन गेले. आपण संघप्रचारक आहोत म्हणजे काहीतरी वेगळे आहोत, असे कधीही त्यांच्या वागण्यात दिसून आले नाही. ज्या ठिकाणी जायचे तिथे त्या घरातील एक घटक म्हणूनच ते वागायचे. 

 बाबुराव जसे कुशल संघटक तसेच उत्कृष्ट मानसशास्त्रज्ञ. अनेक स्वयंसेवक आपल्या संघटनेतील वेदना त्यांच्यासमोर मांडत असत. माझ्यासमोर घडलेला एक प्रसंग. प्रकाश नाईक यांनी आपल्या अनुभवातून आलेल्या व्यथा मांडल्या. संघ विचारांच्या बैठकीत आपण काम केले पाहिजे हे सांगताना त्याला न दुखावता संघ पद्धतीत आपण कसे काम केले पाहिजे, हे समजावून सांगत होते. समाधान झाले किंवा नाही हे मला माहीत नाही. अनेकांशी मतभेद असतील, परंतु बाबुराव म्हणजे दैवत. विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी दिल्यानंतर संपूर्ण देशात प्रवास करून विश्व हिंदू परिषदेचे काम यशस्वीपणे पार पाडले. पश्चिम बंगालमध्ये एकल विद्यालयाची जबाबदारी तीन वर्षे सांभाळून बंगालमधील खेडय़ापाडय़ात एकल विद्यालयाच्या शाळा सुरू केल्या. अफाट वाचन, आकाशाला गवसणी घालणारे प्रचंड कर्तृत्व. परंतु, भावना सेवकाची. ‘मी’ पणाला जाळून शेवटपर्यंत भारतमातेचा सेवक म्हणून जगलेले बाबुराव ‘जीवासवे जन्मे मृत्यू’ हा सामान्य माणसाच्या जीवनातील एक प्रसंग. परंतु, ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ हे सर्वांना जमत नाही.

देशासाठी दधिची ऋषीसारखे जीवन जगलेल्या बाबुरावांच्या सहवासात आयुष्यातील काही क्षण गेले. मी स्वतःला धन्यवान समजतो. बाबुरावांना जड अंतःकरणाने विनम्र श्रद्धांजली!

– शारदाचरण कुलकर्णी

Related Stories

विजेचा सुखद धक्का!

Patil_p

संकटकाळ आणि जागतिक साहित्य

Patil_p

नाराजीचा गालीचा

Patil_p

केरळमध्ये माकपसमोर नवी आव्हाने

Patil_p

भीमकी झाली रोमांचिता

Patil_p

एनआरसी : केंद्र, आसाम सरकारला नोटीस

Patil_p
error: Content is protected !!