तरुण भारत

‘बायो-बबल’मुळे मानसिक संतुलन ढळण्याचा धोका

भारतीय संघाचे माजी मानसोपचार तज्ञ पॅडी अप्टनचा इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

विविध स्पर्धांच्या निमित्ताने खेळाडू, ऍथलिटस्ना ‘बायो-बबल’ अर्थात जैवसुरक्षा कवचात रहावे लागत असले व यामुळे अनेक स्पर्धा निर्धोकपणे संपन्न होत असल्या तरी प्रदीर्घ दृष्टिकोनातून विचार करता या ‘बायो-बबल’मध्ये अधिक काळ राहिल्याने क्रीडापटूंचे मानसिक संतुलन बिघडू शकते, असा स्पष्ट इशारा भारतीय क्रिकेट संघाचे माजी मानसोपचार तज्ञ पॅडी उप्टन यांनी दिला.

सध्या आंतरराष्ट्रीय ऍथलिटस्साठी ‘बायो-बबल’मध्ये वास्तव्य करणे ही रीतच झाली आहे. कोव्हिड-19 च्या संकटानंतर काही क्रिकेटपटू, फुटबॉलपटू व टेनिसपटूंना या सुरक्षा कवचात सातत्याने रहावे लागले असून यामुळे यावर काही खेळाडूंनी उघडपणे आपला विरोध, नाराजी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर, उप्टन यांनी खेळावर नियमन असणाऱया नियामक संस्था, संघटना बायो-बबलचे दुष्परिणाम, धोके टाळण्यासाठी काहीही संशोधन करत नाहीत, अशी टीका केली आहे.

‘विविध खेळाडूंकडून आम्ही त्यांची मते आजमावून घेतलेली नाहीत आणि ज्यांनी आपली मते स्वतः मांडली, त्याचा एकत्रित विचार केला गेलेला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ हे ड्रग देऊ शकू किंवा चाचणी होईतोवर हे ड्रग देऊ शकणार नाही, इतक्याच चर्चेत आहेत. पण, एका निष्कर्षाप्रत येण्यासाठी आपण पुरेसे संशोधन केले आहे का, हा खरा प्रश्न आहे. आयसीसी, बॅडमिंटन-फुटबॉलमधील संघटना, तसेच बीसीसीआयने यावर खेळाडूंची मते घेऊन त्यावर अभ्यास केलेला नाही, असे यातून दिसून येते. बायो-बबलमुळे सारे काही कोसळून जाईल, असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण, ज्या समस्या निदर्शनास येत आहेत, त्यावर मात करण्यासाठी वेळीच मार्ग शोधायला हवा’, असे उप्टन यांचे मत आहे.

बायो-बबलमुळे जी बंधने पाळावी लागतात, त्याचा कसा फटका बसू शकतो, यावर उप्टन म्हणाले, ‘जर खेळाडूंना एकांतवासात राहणे भाग पाडले तर रिकामेपणा त्यांचे मन खाऊ शकतो. प्रत्येक खेळाडूला अशी सवय असेलच असे नाही. त्यामुळे, काही खेळाडू कमालीचे बेचैन होऊ शकतात. युवा खेळाडूंना कारकिर्दीच्या प्रारंभीच आयपीएलसारखी स्पर्धा खेळता येते, हे त्यांचे सुदैव. पण, वरिष्ठ खेळाडूंना प्रवासाची सवय असते, कुटुंबासमवेत पुरेसा वेळ व्यतित करत असतात. या नव्या प्रणालीशी जुळवून घेत असताना त्यांना झगडावे लागे शकते’.

द्रविडचा प्राधान्याने उल्लेख

‘महान फलंदाज राहुल द्रविडने युवा खेळाडूंमध्ये सकारात्मक उर्जा अगदी ठासून भरली आणि खेळाडूच्या मनावर आसपासच्या वातावरणाचा सर्वात मोठा प्रभाव पडत असतो. त्यांच्या वर्तणुकीतून याचे प्रतिबिंब उमटत असते आणि यात वरिष्ठ खेळाडू त्यांना कसे हाताळतात, यावर देखील बरेच काही अवलंबून असते. यात द्रविडचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे’, असे प्रशंसोद्गार उप्टन यांनी यावेळी काढले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडेच 2-1 फरकाने मालिका जिंकली, त्यावेळी युवा पिढी घडवण्यात अपार कष्ट घेतलेल्या राहुल द्रविडची प्रशंसा झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयात वॉशिंग्टन सुंदर व ऋषभ पंत यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.

‘द्रविड चुकांमुळे व्यथित होत नाही. पण, खेळाडूंना तो व्यक्त होऊ देतो आणि खेळाडूंना त्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. खेळाडूंनी आपला नैसर्गिक खेळ साकारावा, यावर त्याचा भर असतो. खेळाडूंनी चुका केल्या तर तो सौम्यपणे संवाद साधत त्या निदर्शनास आणून देतो आणि हीच बाब खेळाडू घडण्यात मोलाची ठरते. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या लढतीत खेळताना युवा खेळाडूंवर जरुर दडपण होते. पण, द्रविडने या खेळाडूंना जी शिकवण दिली होती, ती तेथे यश खेचून आणण्यात उपयुक्त ठरली’, असे उप्टन शेवटी म्हणाले.

इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय पंचांना संधी

नवी दिल्ली ः आयसीसी पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या 3 पंचांना भारत-इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पंच म्हणून काम पाहता येणार आहे. विरेंदर शर्मा, अनिल चौधरी व नितीन मेनन यांचा यात समावेश आहे. यापैकी चौधरी व शर्मा हे आयसीसी इमिरेट पॅनेलमध्ये आहेत तर नितीन मेनन भारताचे इलाईट पॅनेलचे प्रतिनिधी आहेत. कोव्हिड-19 च्या संकटामुळे विदेशी पंचांना पाचारण करणे टाळण्यासाठी त्रयस्थ पंच नियुक्तीला फाटा देत हा निर्णय घेण्यात आला. भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका दि. 5 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.

एरवी, कोणत्याही क्रिकेट मालिकांमध्ये यजमान देशाच्या पंचांकडे ही जबाबदारी सोपवली जात नाही. मात्र, आता संघांकडे तीन डीआरएस असतात आणि अम्पायर्स कॉलवेळी त्यांचा डीआरएस कायम राहू शकतो. त्यामुळे चुकीचे निर्णय दिले जाण्याची शक्यता बऱयाच अंशी कमी झाली आहे, याकडे, आयसीसीने यावेळी लक्ष वेधले आहे.

सदर तीन पंचांमधील मेनन हे भारताचे सर्वात युवा पंच आहेत आणि त्यांची गुणवत्ता लक्षवेधी मानली जाते. शर्मा यांनी 2 वनडे व 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तर चौधरी यांनी 20 वनडे व 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानी पंच म्हणून काम पाहिले आहे. मेनन यांनीही 3 कसोटीसह 24 वनडे व 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. हे तिन्ही पंच आयपीएलमध्ये सातत्याने जबाबदारी निभावत आले आहेत.

पहिल्या कसोटीनंतर जॉनी बेअरस्टो भारतात येणार- थॉर्प

यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर इंग्लिश संघात दाखल होईल, असे इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांनी शुक्रवारी सांगितले. बेअरस्टोला यापूर्वी पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. पण, आता तो दि. 13 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटीत उपलब्ध असेल, असे थॉप यांनी जाहीर पेले.

यापूर्वी बेअरस्टोला पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विश्रांती देण्याच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू यात आघाडीवर होते. बेअरस्टोने लंकेविरुद्ध मागील मालिकेत जो रुटपाठोपाठ दुसऱया क्रमांकाच्या धावा नोंदवल्या. त्याने 46.33 च्या सरासरीने 139 धावा जमवल्या. इंग्लंडच्या रोटेशन पद्धतीनुसार, त्याच्यासह जलद गोलंदाज मार्क वूड व अष्टपैलू सॅम करण यांना पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन, केविन पीटरसन, मायकल वॉन आदींनी या निर्णयांवर जोरदार टीका केली होती.

Related Stories

चेन्नईसमोर आज दिल्ली कॅपिटल्सचे मोठे आव्हान

Patil_p

अर्सेनलकडे एफए फुटबॉल चषक

Patil_p

सुर्यकुमारशी स्लेजिंग केल्याने विराटवर टीका

Patil_p

धवनचा ‘डॅडी कूल’ डान्स

Patil_p

नौकानयनपटू दत्तू भोकनाळवरील बंदी रद्द

Patil_p

मुष्टीयुद्ध फेडरेशनची निवडणुकीला निरीक्षक पाठविणार

Patil_p
error: Content is protected !!