तरुण भारत

अग्रस्थानावरील मुंबई सिटीला नॉर्थईस्ट एफसीकडून पराभवाचा धक्का

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई सिटी एफसी संघाला परत एकदा नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने धक्का दिला. काल बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने मुंबई सिटी एफसीला 2-1 गोलानी पराभूत केले.

नॉर्थईस्टचे दोन्ही गोल डिशॉर्न ब्राऊनने केले तर पराभूत मुंबई सिटी एफसीचा एकमेव गोल ऍडम फोंड्रे याने केला. या विजयाने नॉर्थईस्ट युनायटेडला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 14 सामन्यांतून पाच विजय, सहा बरोबरी आणि तीन पराभवाने 21 गुण झाले. मुंबई सिटी एफसीचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. त्यांचे आता 14 सामन्यांतून नऊ विजय, तीन बरोबरी आणि दोन पराभवाने 30 गुण झाले, मात्र त्यांचे पहिले स्थान अबाधित राहिले. चौथ्या स्थानावर असलेला हैदराबाद एफसी नॉर्थईस्टच्या विजयाने पाचव्या स्थानावर गेला व नॉर्थईस्ट चौथ्या स्थानावर आला. आता एटीके दुसऱया तर एफसी गोवा तिसऱया स्थानावर आहेत.

तीन मिनिटांतच दोन गोल करून नॉर्थईस्ट युनायटेडने मुंबई सिटी एफसीला बॅकफूटवर आणले. पहिल्या टप्प्यातील लढतीतही नॉर्थईस्ट युनायटेडने मुंबई सिटी एफसीचा पराभव केला होता. जमैकाच्या डिशॉर्न ब्राऊनने कालच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडचे दोन्ही गोल केले.

हे दोन्ही गोल मुंबई सिटी एफसीच्या बचावफळीतील चुकीमुळे झाले. प्रथम डिशॉर्नने सहाव्याच मिनिटाला नीम दोर्जीच्या पासवर मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगला अगदी जवळून भेदले आणि चेंडूला गोलची दिशा दाखविली. आरंभीच्या गोलने भांबावलेल्या मुंबई सिटीवर त्यानंतर तीन मिनिटांनी आणखी एक गोलाची नोंद झाली. नवव्या मिनिटाला लुईस माशादोने दिलेल्या पासवर डिशॉर्न ब्राऊनने परत एकदा अमरींदर सिंगला चकविले व नॉर्थईस्ट युनायटेडचा दुसरा गोल केला.

नॉर्थईस्ट युनायटेडची आक्रमणे यानंतर वाढली. डिशॉर्नला सामन्याच्या 20व्या मिनिटाला तिसरा गोल करून हॅट्ट्रिक नोंदविण्याची संधीही मिळाली होती. मात्र प्रोवत लाक्राच्या पासवर त्याचा फटका दिशाहीन ठरला. मुंबई सिटीने आपली पहिली धोकादायक चाल 28व्या मिनिटाला रचली. यावेळी बिपीन सिंगने दिलेल्या पासवर अहमद जोहूचा फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला. दोनच मिनिटांनी बिपीनच्या क्रॉसवर बार्थोलोमियाँव ओगबेचाही हेडर गोलमध्ये जाताना किंचित हुकला.

दुसऱया सत्रात आरंभालाच नॉर्थईस्टची तिसरा गोल करण्याची संधी हुकली. यावेळी अपुईयाने मारलेला फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंगने पंच करून कॉर्नरसाठी टाकला. मुंबई सिटीने सामन्याच्या 85व्या मिनिटाला गोल करून पिछाडी एका गोलने कमी केली. सामन्याच्या 66व्या मिनिटाला हर्नान सांतानाच्या स्थानावर आलेल्या ऍडम फोंड्राने हय़ुगो बॅमोस आणि बार्थोलॉमियाँव ओगबेचे चालीवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुभाषिश रॉयला भेदले आणि चेंडू जाळीत मारला.

Related Stories

रानटी जनावरांचां उपद्रव

Patil_p

पर्वरीतील चोगम रस्त्याची चाळण

Patil_p

पूर्ण अधिकार अन् वाढीव निधीही देणार

Patil_p

भाडेपट्टी थकल्याने कुडचडे पालिकेकडून 9 दुकानांना सील

Patil_p

मांद्रे येथील देवी महालक्ष्मीचे पूजन

Patil_p

योग शिक्षक आचार्य राजेशकुमार ठक्कर गोव्याचे प्रभारी

Patil_p
error: Content is protected !!