तरुण भारत

पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर नाहीच

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

ताळगाव पंचायतीचा कोणताही भाग पणजी मनपात विसर्जित करण्यात येणार नाही. येत्या पालिका निवडणुकीपूर्वी तरी तसे काही होणार नाही. तसेच ही पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर होऊ नये, असे भाजपचे मत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी स्पष्ट केले आहे.

ताळगाव पंचायत परिसराचा पालिकेत समावेश करण्यात येणार आहे का, असे विचारले असता ते बोलत होते. ताळगावचा काही भाग आतासुद्धा पालिका कार्यकक्षेत आहे. केवळ पंचायत परिसर वेगळा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोणताही बदल होणार नाही. भाजपचाही तसा कोणताही विचार नाही. स्थानिक आमदारांनीही तसे स्पष्टीकरण दिलेले आहे, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती हे खरे आहे. अनेकांचे तेच मत होते. परंतु एवढी वर्षे ही निवडणूक कोणत्याही राजकीय चिन्हा शिवाय होत आहे. तीच परंपरा याहीवेळी कायम ठेवावी, यासंबंधी आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. आता सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असे तानावडे यांनी सांगितले.

राज्यातील पेडणे, वाळपई यासारख्या काही पालिकांचे प्रभाग मतदारसंख्येच्या मानाने एकदमच लहान आहेत. अशावेळी तेथे पक्षीय पातळीवर निवडणूक झाल्यास आपल्याच कार्यकर्त्यांना दुखविल्यासारखे होणार आहे. नाही म्हटल्यास पक्षाचे पॅनल असेलच. केवळ चिन्ह असणार नाही. पालिका निवडणूक निर्धारित कालावधीत होईल, असे तानावडे म्हणाले.

दरम्यान, विधानसभेतील कामकाज मुख्यमंत्र्यांनी फार चांगल्या प्रकारे हाताळले. मात्र काही विरोधकांनी स्वतःला अतिहुशार म्हणून सिद्ध करण्याच्या नादात किंवा प्रसिद्धी मिळविण्याच्या मोहोपायी चुकीची विधाने केली किंवा वारंवार तीच तीच विधाने केली. विरोधक या नात्याने त्यांना तसे करावेही लागते, असे तानावडे म्हणाले. 

वैयक्तिक आरोप करणे चुकीचे

रोहन खंवटे यांनी विधानसभेत राहून आपल्या मतदारसंघातील काही पंचायत तसेच जिल्हा पंचायत सदस्यांवर गंभीर आरोप केले. अशाप्रकारे वैयक्तिक आरोप करणे चुकीचे आहे, कारण कार्तिक कुडणेकर हे आज उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष आहेत. त्यांना खंवटेनी नियुक्त केलेले नाहीत, तर मतदारांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही मान, प्रतिष्ठा आहे याचे भान आरोप करणाऱयांनी ठेवले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे कुडणेकर यांनी खंवटेवर कोणतेही आरोप केलेले नाहीत. खंवटे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप, त्यांची वॉशिंग मशिन असे संबोधून त्यांची निर्भत्सना केली आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे. याच वॉशिंगमशिन मधून यापूर्वी खंवटे स्वतः जाऊन आले आहेत, असे तानावडे म्हणाले.

सुकूर सरपंच संदीप वझरकर यांनी केलेल्या आरोपांसंबधी विचारले असता, त्यात गैर काहीच नसल्याचे तानावडे म्हणाले. खंवटे आज ज्यांच्यावर आरोप करत आहेत ते एकेकाळी त्यांचेच समर्थक, कार्यकर्ते होते. आता त्यांनी साथ सोडली म्हणून वाईट झाले का? असा सवाल उपस्थित करताना, खंवटे यांनी विधानसभेत त्यांच्या समोर उभ्या नसलेल्या व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे आहे, असे तानावडे म्हणाले.

Related Stories

‘सी स्कॅन’कडून 12.32 कोटी वसूल करा

Amit Kulkarni

शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱयांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Patil_p

संविधाने आपल्याला दिलेले अधिकार समजून घ्यावे

Amit Kulkarni

कर्नाटकातील नागरिकांची गावी जाण्यासाठी रिघ चालूच

Omkar B

कर्नाटकच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांनी थोपटले दंड

Patil_p

अनमोड ते खांडेपार महामार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण सुरु

Amit Kulkarni
error: Content is protected !!