तरुण भारत

तामिळनाडूकडे दुसऱयांदा मुश्ताक अली करंडक

सामनावीर मणिमारन सिद्धार्थचे 4 बळी, विष्णू सोळंकीचे प्रयत्न अपुरे

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisements

डावखुरा स्पिनर एम. सिद्धार्थच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर तामिळनाडूने बडोदा संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून सईद मुश्ताक अली करंडक दुसऱयांदा पटकावला. 20 धावांत 4 बळी टिपणाऱया सिद्धार्थलाच सामनावीराचा बहुमान मिळाला. यापूर्वी 2006-07 च्या मोसमात त्यांनी पहिल्यांदा हा करंडक पटकावला होता.

सिद्धार्थच्या भेदक माऱयामुळे बडोदा संघाला 20 षटकांत 9 बाद 120 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर तामिळनाडूने 18 षटकांतच 3 बाद 123 धावा जमवित जेतेपद पटकावले. सलामीवीर सी. हरी निशांत (35) व बाबा अपराजित (नाबाद 29) यांनी जास्त पडझड होऊ न देता संघाचा विजय सोपा केला. या स्पर्धेत 22 वर्षीय सिद्धार्थला संघाबाहेरच ठेवण्यात आले होते. त्याबद्दल विचारल्यावर, योग्य वेळी आम्ही त्याला संघात स्थान देऊ, असे तामिळनाडूचे प्रशिक्षक डी. वासू यांनी म्हटले होते. त्यांनी अंतिम सामन्यात त्याला स्थान दिले आणि त्यानेही त्यांचा विश्वास सार्थ ठरवित मॅचविनिंग कामगिरी करून दाखविली. मागील वर्षी याच स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

गेल्या काही महिन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. आयपीएलमध्येही त्याला केकेआरने एकाही सामन्यात खेळविले नाही आणि नव्या आवृत्तीसाठी त्याला करारातून मुक्तही केले आहे. येथील सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीमुळे लवकरच होणाऱया आयपीएल लिलावात त्याला खरेदीदार मिळण्याची अपेक्षा आहे. येथील सामन्यात त्याने बडोद्याच्या आघाडी फळीला लवकर बाद करून त्यांना अडचणीत आणले. चौथ्या षटकात त्याला गोलंदाजी देण्यात आली. पण बडोदा कर्णधार केदार देवधरने त्याला दोन चौकार ठोकत त्याचे स्वागत केले. मात्र याच षटकात त्याने देवधरला जगदीशनकरवी झेलबाद केले. त्याच्या पुढील षटकात त्याने स्मित पटेलला पायचीत केल्यानंतर बडोदाची स्थिती 3 बाद 28 अशी झाली होती. सिद्धार्थने आपल्या तिसऱया षटकात अभिमन्यू राजपूतला स्वतःच झेलबाद केले आणि कार्तिक काकडेला त्रिफळाचीत केल्यानंतर बडोदाची स्थिती 6 बाद 36 अशी झाली. विष्णू सोळंकी (55 चेंडूत 49) व अतित सेठ (29) यांनी सातव्या गडय़ासाठी 58 धावांची भागीदारी केल्याने त्यांना शंभरी पार करता आली. याशिवाय भार्गव भटने 5 चेंडूत 12 धावा फटकावल्या.

121 धावांचे माफक आव्हान पार करतानाही तामिळनाडूला थोडासा संघर्ष करावा लागला. जगदीशन 14 धावा काढून बाद झाल्यानंतर हरी निशांत व अपराजित (नाबाद 29) यांनी दुसऱया गडय़ासाठी 41 धावांची भागीदारी करून डाव सावरला. अपराजित व एम. शाहरुख खान (नाबाद 18) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. याशिवाय दिनेश कार्तिकने 22 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक ः बडोदा 20 षटकांत 9 बाद 120 ः केदार देवधर 16, विष्णू सोळंकी 49, अतित सेठ 29, भार्गव भट नाबाद 12, अवांतर 6. गोलंदाजी ः एम.सिद्धार्थ 4-20, बाबा अपराजित 1-16, सोनू यादव 1-29, एम.मोहम्मद 1-16. तामिळनाडू 18 षटकांत 3 बाद 123 ः हरी निशांत 35, नारायण जगदीशन 14, बाबा अपराजित नाबाद 29, दिनेश कार्तिक 22, शाहरुख खान नाबाद 18, अवांतर 4. गोलंदाजी ः अतित सेठ 1-20, लुकमन मेरिवाला 1-34, बाबाशफी पठाण 1-23, निनाद रथवा 0-8, भार्गव भट 0-25, कार्तिक काकडे 0-12.

Related Stories

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून रशियन टेनिसपटूची माघार

Patil_p

अँजेलिक केर्बरची दुखापतीमुळे माघार

Patil_p

माजी हॉकीपटू मायकेल किंडो कालवश

Patil_p

सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये लिव्हरपूलचे वर्चस्व

Patil_p

इंग्लिश महिला संघ 18 धावांनी विजयी

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्सची ‘सिंह गर्जना’

Patil_p
error: Content is protected !!