तरुण भारत

बैलांच्या झुंजी त्वरित थांबवा

गोवंश रक्षा अभियानचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

उत्तर गोव्यात मांद्रे, पेडणे भागात मोठय़ा प्रमाणात बैलांच्या झुंजींचे आयोजन करण्यात येत असून त्यातून बैलांचे मृत्यू होण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. हे प्रकार बंद करावे, अशी मागणी गोवा गोवंश रक्षा अभियानतर्फे करण्यात आली आहे. त्यासंबंधी बुधवारी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी नंतर पणजीत आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी विनायक च्यारी, शैलेंद्र वेलिंगकर, लक्ष्मीकांत केरकर यांची उपस्थिती होती.

त्याचबरोबर केरी चोर्ला मार्गे कर्नाटकातून गोव्यात होणाऱया गोमांसाच्या बेकायदा वाहतुकीवरही कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या 27 जानेवारी रोजी मांद्रे, पेडणे भागात बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर होता. तरीही त्यावर कोणत्याही सरकारी अधिकारिणीने कारवाई केली नाही.

या झुंजी पैशांसाठी लावल्या जातात. त्याद्वारे मोठय़ा प्रमाणात पैजी लावल्या जातात. त्यात हरमल, बागा, कळंगूट, कोलवा आदी भागातील सट्टेबाज मोठय़ा प्रमाणात सहभागी होतात. परंतु सदर बेकायदा प्रकार अडविण्याचे पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

या झुंजीदरम्यान दुर्दैवाने एका बैलाचा मृत्यू झाला. त्यासंबंधी दुसऱया दिवशी वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाले होते, तरीही कारवाई झाली नाही. मुक्या प्राण्यासंबंधीचे हे क्रौर्य काही थांबले नाही. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात पोलीस अधिकाऱयांना आलेल्या अपयशामुळे प्राणीप्रेमी आणि गोप्रेमींच्या नजरेतून पोलिसांनी विश्वास गमावला आहे.

कर्नाटकाच्या कित्येक जिह्यांमधून चोर्लामार्गे गोव्यात मोठय़ा प्रमाणात बेकायदा गोमांसाची वाहतूक होत आहे. परंतु पोलीस या वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे एकसुद्धा वाहन त्यांच्या हाती लागत नाही. पोलिसांच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे परब म्हणाले. सदर दोन्ही प्रकार त्वरित बंद व्हावे यादृष्टीने कृती व्हावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गोवंश रक्षा अभियान लोकशाही मार्गाने याप्रश्नी स्वतःच तोडगा काढेल, असे परब यांनी म्हटले आहे.

Related Stories

मडगावातील विक्रेत्यांचा पालिकेवर मोर्चा

Amit Kulkarni

कोरोनामुळे पणजी मनपाचा 90 टक्के महसूल बुडाला

Patil_p

म्हादईच्या रक्षणासाठी मगोचे आंदोलन

Patil_p

पोलीस खात्यात वरिष्ठांकडून स्वार्थी डावपेच

Amit Kulkarni

मगो पक्ष बाराही तालुक्यात शिमगोत्सव साजरा करण्यास तयार

Amit Kulkarni

केपे गट काँग्रेस बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Patil_p
error: Content is protected !!