तरुण भारत

नौसेनेच्या ताब्यात असलेले अंजदीव बेट पुन्हा चर्चेत

मानवी वसती नसलेले लेडी ऑफ स्टिंग्स हे ऐतिहासिक चर्च : सुरक्षिततेच्या कारणास्तव बेटावर जाण्यास बंदी

प्रतिनिधी / कारवार

Advertisements

येथून सात कि. मी. अंतरावर अरबी समुद्रात वसलेले 1961 पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात आणि त्यानंतर गोवा सरकारच्या (काणकोण तालुका महसूल खाते) ताब्यात व आता भारतीय नौसेनेच्या ताब्यात असलेले अंजदीव बेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुमारे दीड चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या बेटावर मानवी वसती नाही हे खरे असले तरी या बेटावर लेडी ऑफ स्टिंग्स हे ऐतिहासिक चर्च आहे. हे चर्च सुमारे सहाशे वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे पंधराव्या शतकात बांधण्यात आले आहे, असे सांगण्यात येते.

  2018 मध्ये सुमारे 45 लाख रुपये खर्च करून या चर्चचे नूतनीकरण करण्यात आले आहे. काही वर्षापूर्वी या चर्चचा फेस्त मोठय़ा उत्साहात साजरा केला जात होता. फेस्त साजरा करण्यासाठी गोव्यासह कारवारातील शेकडो ख्रिश्चन बांधव बेटावर दाखल व्हायचे. प्रत्येक वर्षी 2 फेब्रुवारी आणि 4 ऑक्टोबरला ख्रिश्चन बांधव अंजदीव बेटावर समुद्रमार्गे दाखल होऊन पूजा प्रार्थना, नवस फेडणे आदी धार्मिक सोहळय़ात श्रद्धेने सहभागी व्हायचे. तथापि आता हे अनेकांसाठी श्रद्धेचे स्थळ असलेले बेट भारतीय नौसेनेच्या (संरक्षण मंत्रालयाच्या) ताब्यात असल्याने सुरक्षिततेसह वेगवेगळय़ा कारणांसाठी अंजदीव बेटाच्या भेटीवर बंदी घालण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे बेटावर जाऊन ऐतिहासिक चर्चमध्ये प्रार्थना, नवस फेडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणून ख्रिश्चन बांधव (गोव्यातील ख्रिश्चन बांधव) मागणी करीत आहेत. या मागणीसंदर्भात ख्रिश्चन बांधवांनी पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर गोव्यातील एका श्रद्धाळूने या प्रकरणी पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी केली आहे. तथापि अद्याप तरी ख्रिश्चन बांधवांच्या या प्रयत्नांना यश आलेले नाही.

पत्रकार परिषद घेऊन अंजदीव बेटाला भेट देण्यासाठी संधी देण्याची मागणी

दरम्यान, सोमवारी कारवार आणि गोव्यातील काही ख्रिश्चन बांधवांनी येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेद्वारे अंजदीव बेटाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याप्रसंगी बोलताना येथील कॅप्टन एडी वेगस म्हणाले, अंजदीव बेटावरील चर्चच्या फेस्तला जाऊन नवस फेडण्याची आमची श्रद्धा आणि आशा आहे. आम्ही येथे कुणाच्याही विरोधात तक्रार करायला आलेलो नाही. केवळ आमची मागणी संबंधितांकडे पोहचविण्यासाठी आलो आहे. आमच्या धार्मिक भावनांचा आदर करून सरकारने वर्षातून दोनदा नव्हे किमान एकदा तरी चर्चच्या दर्शनाला जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

बेटावर जायला सर्वांनाच संधी दिली पाहिजे

आबेल बॅरेटो (गोवा) याप्रसंगी बोलताना म्हणाले, अंजदीव बेटावर जाण्यासाठी केवळ ख्रिश्चन बांधवांनाच नव्हे तर सर्वांना संधी मिळाली पाहिजे. अंजदीव बेटावरील चर्चवर अनेकांची नितांत श्रद्धा असल्याने अनेकांनी तेथे जाऊन नवस फेडण्याची परंपरा जपली आहे. तथापि काही वर्षापूर्वी अंजदीव बेटावर जाणे शक्य नसल्याने नवस फेडण्याचे कार्य राहून गेले आहे. याचा परिणाम काही श्रद्धाळूंच्या धार्मिक भावनांवर होत आहे. सद्याला गोवा, कर्नाटक आणि केंद्रात एकच पक्षाची सरकारे आहेत. श्रद्धाळूंच्या भावनांची दखल घेऊन अंजदीवला जाण्याची मुभा प्राप्त करून द्यावी. ही संधी केवळ ख्रिश्चन बांधवांनाच नव्हे तर सर्वांनाच उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे बॅरेटो यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ नागरिक नातीदाद डीसा यांनीही आपले विचार मांडले. यावेळी डायगो डिसिल्वा, इवेल्हो बॅरेटो, जॉनी लोपीस, संजाव फर्नांडिस, क्लेवियर फर्नांडिस, क्लेवियर डिसोजा, इजाबेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.

आशिया खंडातील पहिले पुरातन चर्च

वेगस म्हणाले, अंजदीव हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. आशिया खंडातील पहिले म्हणून ओळखले जाणारे चर्च या बेटावर आहे. या चर्चशी धार्मिक भावना जोडल्या आहेत. आणि म्हणूनच पूर्वीप्रमाणे वर्षातून दोनदा नव्हे तर किमान एकदा तरी मोठय़ा संख्येने नव्हे तर मर्यादित श्रद्धाळूंना बेटावर जायला देऊन चर्चमध्ये प्रार्थना, मेणबत्या पेटविण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

Related Stories

टि.व्ही.सेंटर परिसरात पाऊण लाखांची घरफोडी

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत

Amit Kulkarni

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मेंढय़ा विक्रीला अल्प प्रतिसाद, मेंढपाळ चिंताग्रस्त

Rohan_P

हिंदवाडी येथे भरदिवसा घरफोडी

Amit Kulkarni

‘कुंदकला’तर्फे प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

Omkar B

बेळगाव-पुणे विमानसेवा पूर्ववत

Amit Kulkarni
error: Content is protected !!