तरुण भारत

देवभूमीत महा‘आपत्ती’

हिमकडा कोसळला; धरण फुटले : भीषण जलप्रलयात 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती

चमोली, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ रविवारी सकाळी हिमकडा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तराखंडमधील चमोली जिह्यात जोशी मठ परिसरात ही दुर्घटना घडली असून धौलीगंगा नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. धरणाचा बांध फुटल्याने धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्याने नदीकाठी असलेल्या घरांमधील अनेकजण बेपत्ता झाले आहेत. मदत व बचाव कार्यादरम्यान सायंकाळपर्यंत 15 मृतदेह हाती लागले होते. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंड येथील चमोली येथे हिमकडा कोसळून पर्वतातून वाहणाऱया नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामध्ये 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी दिली. हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पूल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदतकार्य सुरू केले आहे. तसेच केंद्रीय पातळीवरून ‘आयटीबीपी’च्या 200 जवानांना मदत व बचाव कार्यासाठी सक्रिय करण्यात आले आहे.

राज्य सरकारने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जोशी मठाजवळ एक हेलिकॉप्टर पाठवले आहे. त्याचबरोबर केंद्राकडे एनडीआरएफच्या तुकडय़ा पाठवण्याची मागणी केली होती. या घटनेत पाण्यामुळे नदीकाठावरील घरांना फटका बसला आहे. अनेकजण वाहून गेले असून त्यासंबंधीची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. ऋषीगंगाबरोबरच अलकनंदा नदीकाठी राहणाऱया नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अलकनंदा परिसरात अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितपणे हलवण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. अलकनंदा नदीला पूर येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भगीरथी नदीचा प्रवाह बंद करण्यात आला असून, एसडीआरएफला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री रावत तातडीने घटनास्थळी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत चमैली येथील तपोवन परिसराला भेट दिली. घटनास्थळी त्यांनी सुरक्षा, मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच लोकांना मदत पुरविण्यासंबंधीचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. तसेच या घटनेसंबंधी केंद्रीय गृहमंत्र्यांसह अन्य संबंधितांशीही त्यांनी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4-4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये आणि मोफत उपचार देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लष्कराला सीमाभागाशी जोडणारा पूलही उद्ध्वस्त या दुर्घटनेत धौलीगंगेवरील सीमेकडील रस्त्यांना जोडणारे पूल वाहून गेल्याने लष्कराचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे जवानांना सध्या जोशी मठाकडे पाठवण्यात आले आहे. लष्कराला सीमाभागाशी जोडणारा पूलही वाहून गेला आहे. सीमाभागातील मलारीला जोडणारा पूल हिमकडा कोसळल्याने वाहून गेला आहे. हा पुल लष्कराला सीमाभागांशी जोडतो. आयटीबीपीची एक टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. पूल बनवणारे लष्कराचे पथकही पाठवण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नजर ठेवली जात आहे.

Related Stories

बिहार : 619 नवे कोरोना रुग्ण; तर 605 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P

पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

कर्जहप्ता स्थगितीचा कालावधी वाढविणे अशक्य

Patil_p

खात्मा केलेले दहशतवादी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

…तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होईल

datta jadhav

भूमिपूजनासाठी सजली अयोध्यानगरी

Patil_p
error: Content is protected !!