तरुण भारत

खाणी 15 मार्चपूर्वी सुरु करा अन्यथा मोर्चा

जाहीर सभेत पुती गावकर म्हणाले…,आल्तिनोवरील मोर्चात खाण ट्रक, मशिनरीही आणणार

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्यातील खाणी सुरु करण्याबाबत सरकार कोणत्याच ठोस हालचाली करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या 15 मार्चपूर्वी खाणी सुरु न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानावर भव्य मोर्चा नेणार, असा इशारा गोवा मायनिंग पिपल संघटनेने दिला आहे. ट्रकसह इतर खाण कामासाठी लागणारी सर्व प्रकाची यंत्रे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणून ठेवली जातील आणि बार्जेस मांडवी नदीत ठेवल्या जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

सरकार गेल्या तीन वर्षापासून केवळ आश्वासने देत आहे. खाण व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या लोकांची परिस्थिती बिकट बनली आहे. आता तरी खाणी सुरु करा, याची सरकारला आठवण करून देण्यासाठी खाण अवलंबीतांच्या संघटनेने काल सोमवारी पणजीत मोर्चा काढला आणि नंतर येथील आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. त्या सभेत सरकारला वरिल इशारा देण्यात आला.

यावेळी खाण अवलंबीत संघटनेचे अध्यक्ष पुती गावकर, पिसूर्ले पंचायतचे पंच सदस्य देवेंद्र परब, रिवणचे सरपंच सुर्या नाईक, कोठंबीचे उपसरपंच महेश परब तसेच खाण अवलंबीत संघटनेचे संदीप परब, बालाजी गवस, अतूल जाधव, वल्लभ दळवी, जोसेफ, रामा सावंत व इतर सुमारे अडिच हजार खाण  अवलंबीत मोर्चात सहभागी झाले होते. पणजी कदंब बसस्थानकावर जमा झालेल्या खाण अवलंबीतांनी जुना पाटो पुल मार्ग ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला. मोर्चात घोषणाबाजी करण्यात आली. आझाद मैदानावर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.

खाणी सुरु कण्यास विलंब का?

 राज्यातील खाणी सुरु होणे नितांत गरजेचे असतानाही भाजप सरकार कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप पुती गावकर यांनी यावेळी केला. केंद्रात तसेच राज्यातही भाजप सरकार असतानाही खाणी सुरु करण्यास विलंब का असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आश्वासने देऊन भाजप निवडणुका जिंकतो

गेल्या तीन वर्षापासून सरकार खाणी सुरु करण्याची केवळ आश्वसने देऊन आपला स्वार्थ साधून घेत आहे. खोटी आश्वासने देऊन तसेच खाण अवलंबीतांमध्ये आपापसात भांडणे लावून भाजपा दरवेळी निवडणुका जिंकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात आले होते, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितले होते की गोव्यासाठी खाण व्यवसाय अत्यंत गरजेचा आहे. मग अजूनही खाण व्यवसाय का सुरु केला जात नाही, असा प्रश्न पुती गावकर यांनी यावेळी उपस्थित केला.

एनजीओ व सरकारचा हातात हात घालून कारभार

गेल्या कित्येक वर्षापासून खाण व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. शिक्षण, व्यवसाय या सगळ्या गोष्टींवरच त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार मात्र कोणतीच ठोस पावले उचलत नाही. सरकार व खाणींना विरोध करणाऱया बिगर सरकारी संस्था हातात हात घालून सगळा कारभार करीत असल्याचाही आरोप गावकर यांनी केला.

राज्यात 7 फेब्रुवारी हा काळा दिवस

राज्यात ज्या दिवशी खाणी प्रत्यक्षात बंद झाल्या तो काळा दिवस पाळला जात असल्याचे गावकर यांनी सांगितले. 7 फेब्रुवारी तो दिवस आहे. 7 रोजी रविवार  असल्याने सोमवारी हा मोर्चा काढण्यात आल्याचे गावकर यांनी सांगितले.  डोक्याला काळी पट्टी बांधून मोर्चा काढण्यात आला होता.

आता आश्वासने नको, प्रत्यक्ष खाणी सुरु करा

खाण पटय़ातील लोकांना सरकार नेहमी गृहीत धरीत आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळी आश्वसने देऊन सरकार आपला स्वार्थ साधून घेत आहे. आमदार, मंत्र्यांचे खिसे भरण्यासाटी खाणींचा लिलाव करणे हा एक डाव होता, असा टोला गावकर यांनी हाणला. आता केवळ आश्वसन चालणार नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही कारवाई करा, खाणी सुरु करा अशी मागणी गावकर यांनी केली.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी 12.30 च्या दरम्यान आझाद मैदानावर जाहीर सभा झाल्यानंतर शांतीपूर्वक मोर्चाची समाप्ती झाली. मोर्चा दरम्यान कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कदंब बसस्थानक तसेच आझाद मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Stories

गोव्याची अस्मिता जपण्यासाठी स्थानिक पिके टिकविणे गरजेचे

Amit Kulkarni

पुढील सरकारात पाटणेकर मंत्री असणार

Amit Kulkarni

सांखळीत भाजप-काँग्रेस आमने सामने

Amit Kulkarni

माशेल पंचक्रोशीत सर्व सोयीनियुक्त आधुनिक सामाजिक आरोग्य केंद -आरोग्यमंत्री विश्वजी राणे

Amit Kulkarni

सहाजणांच्या टोळीला पाठलाग करुन पकडले

Patil_p

गिरी, सांगोल्डा शेतीमध्ये पाणी भरण्यावर कायमचा तोडगा काढणे काळाची गरज

Amit Kulkarni
error: Content is protected !!