तरुण भारत

नदाल, सित्सिपस, बार्टी, केनिन दुसऱया फेरीत, अझारेंका पराभूत

वृत्तसंस्था/ मेलबर्न

स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल, रशियाचा मेदव्हेदेव, ग्रीकचा सित्सिपस, इटलीचा बेरेटेनी यांनी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत विजयी सलामी दिली. भारताच्या सुमीत नागलचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. महिला विभागात ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड ऍश्ले बार्टी, अमेरिकेची विद्यमान विजेती सोफिया केनिन, इजिप्तची मेयर शेरिफ यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. मात्र बेलारूसच्या अझारेंकाचे आव्हान संपुष्टात आले. ब्रिटनच्या कोंटाला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

Advertisements

अलिकडच्या कालावधीत दुखापतीच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागणाऱया स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी पुरूष एकेरीत विजयी सलामी देताना सर्बियाच्या डिजेरीचा 6-3, -4, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. नदालने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकीर्दीत 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून आता विक्रमी 21 व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाच्या मोहिमेला त्याने प्रारंभ केला आहे. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने कॅनडाच्या व्हॅसेक पोस्पिसीलचे आव्हान 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली. मेदव्हेदेवने अलिकडच्या काही दिवसामध्ये पहिल्या 10 मानांकित टेनिसपटूंवर सलग विजय मिळविले असून त्याने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. चौथा मानांकित 24 वर्षीय मेदव्हेदेव पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी झगडत आहे. ग्रीकच्या पाचव्या मानांकित स्टिफेनोस सित्सिपसने विजयी सलामी देताना फ्रान्सच्या गिलेस सिमॉनचा 6-1, 6-2, 6-1 असा पराभव केला. सित्सिपसला या विजयासाठी तब्बल दीडतास झगडावे लागले. त्याचा दुसऱया फेरीतील सामना कोकिनकिसबरोबर होणार आहे. इटलीच्या बेरेटेनीने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविताना दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनवर 7-6 (11-9), 7-5, 6-3 अशी मात केली. रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने मंगळवारी विजयी सलामी देताना जर्मनीच्या यानिक हेनफेमनचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव करताना 17 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.

या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारा भारताचा एकमेव टेनिसपटू सुमीत नागलचे आव्हान पहिल्याच फेरीत लिथुआनियाच्या बेरानकिसने संपुष्टात आणले. मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात बेरानकिसने सुमीत नागलवर 6-2, 7-5, 6-3 अशी मात करत दुसरी फेरी गाठली. हा सामना दोनतास चालला होता. सुमीत नागलने या सामन्यात शेवटपर्यंत कडवी लढत दिली.

या स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यात अमेरिकेची विद्यमान विजेती सोफिया केनिनने मंगळवारी विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्डधारक मॅडिसन इनग्लीसचा 7-5, 6-4 असा पराभव केला. केनिनचा दुसऱया फेरीतील सामना इस्टोनियाच्या कॅनेपी बरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने विजयी सलामी देताना कोव्हिनीकचा केवळ 44 मिनिटात 6-0, 6-0 असा पराभव केला. इजिप्तच्या मेयर शेरिफने आपल्याच देशाच्या पेक्वेटचा 7-5, 7-5 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. शेरिफने इजिप्ततर्फे टेनिस क्षेत्रात नवा इतिहास घडविला असून ती ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारी इजिप्तची पहिली टेनिसपटू आहे. रशियाच्या सॅन्सोनोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या बॅडोसावर 6-7 (4-7), 7-6 (7-4), 7-5 अशी मात करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

बेलारूसच्या माजी टॉप सीडेड अझारेंकाचे आव्हान पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या पेगुलाने संपुष्टात आणले. या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविणाऱया जेसिका पेगुलाने व्हिक्टोरिया अझारेंकाचा 7-5, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. 2012 आणि 2013 साली अझारेंकाने दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. ब्रिटनच्या जोहाना कोंटाने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मंगळवारी कोंटा आणि स्लोव्हेनियाची जुव्हेन यांच्यात पहिल्या फेरीचा सामना सुरू असताना कोंटाला पोटामध्ये वेदना होवू लागल्या. पण त्या कमी न झाल्याने तिने या स्पर्धेतून माघार घेतली. या सामन्यात कोंटाने 6-4, 0-2 अशी जुव्हेनवर आघाडी घेतली होती.

या स्पर्धेत मंगळवारी लॉईड हॅरीस आणि डेन्मार्कच्या टॉर्पेगार्ड यांच्यातील सामना सुरू असताना ‘बॉलगर्ल’ अचानकपणे टेनिसकोर्टवर कोसळल्याने हा सामना काही वेळ थांबवावा लागला. बॉलगर्लची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला मूर्च्छा आली व ती काही वेळ बेशुद्ध स्थितीत होती. स्पर्धा आयोजकांनी तिच्यावर उपचाराची सोय केली. या सामन्यात हॅरीसने टॉर्पेगार्डचा 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव करत पुरूष एकेरीची दुसरी फेरी गाठली.

Related Stories

इंग्लिश क्रिकेट हंगाम जुलैपर्यंत स्थगित

Patil_p

वेल्सचा तुर्कीवर एकतर्फी विजय

Amit Kulkarni

मेहुत-हर्बर्ट पुरूष दुहेरीत अजिंक्य

Patil_p

रबाडा-नोर्त्झेचे आगमन, पहिल्या सामन्यातून मात्र बाहेर

Patil_p

भारताचा हॉलंडवर 5-2 ने विजय

Patil_p

इंग्लंडच्या पहिल्या डावात 400 धावा

Patil_p
error: Content is protected !!