तरुण भारत

विजय हजारे करंडकसाठी मुंबई संघ जाहीर

श्रेयस अय्यरचे पुनरागमन, सिद्धेश लाडला डच्चू, अर्जुनही संघाबाहेर

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईने 22 सदस्यीय संघाची घोषणा केली असून अलीकडच्या काळात मुंबईचा ‘क्रिसिस मॅन’ म्हणून ओळखला जाणारा तसेच संघाचे कर्णधारपदही भूषविलेल्या सिद्धेश लाडला या संघातून सलील अंकोलाच्या नेतृत्वाखालील निवड समितीने वगळले आहे. पूर्ण फिट झालेल्या श्रेयस अय्यरने पुनरागमन केले असून त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत लाडचे तसेच मुंबई संघाचेच निष्प्रभ प्रदर्शन घडले होते, त्याची किंमत लाडला मोजावी लागली आहे. 28 वर्षीय लाडला या स्पर्धेतील चार सामन्यात केवळ 27 धावा जमविता आल्या, त्यात 21 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. मुंबईने सलग चार सामने गमविल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याचे उत्तम रेकॉर्ड असून 38 सामन्यांत त्याने 43.23 च्या सरासरीने 1124 धावा जमविल्या आहेत. त्यात 3 अर्धशतके व चार शतकांचा समावेश आहे. 2013 पासून नियमित सदस्य असणाऱया लाडने रणजी करंडक स्पर्धेत अनेकदा मुंबईला अडचणीतून बाहेर काढले आहे. पण बॅडपॅचमधून जात असलो तरी निवड समितीने आपल्यावर अजूनही विश्वास दाखवायला हवा होता, अशी त्याची भावना झाली असावी. संघाबाहेर ठेवण्यात आलेला तो एकमेव अनुभवी खेळाडू आहे. लाडप्रमाणे अर्जुन तेंडुलकर व कृतिक हनगवडी यांनाही संघातून वगळण्यात आले आहे.

2019 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या 23 वर्षाखालील गटाच्या एसीसी एमर्जिंग संघांची आशिया चषक स्पर्धा झाली होती. त्यात हाँगकाँगविरुद्ध शतक नोंदवणाऱया चिन्मय सुतारला विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघात निवडण्यात आले आहे. दरम्यान, खांद्याच्या दुखापतीमुळे मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेला श्रेयस अय्यर पूर्ण फिट झाला असून त्याच्याकडे संघाचे नेतृत्व तर पृथ्वी शॉकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयातील पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. तो या स्पर्धेच्या माध्यमातून फॉर्म मिळविण्याचा प्रयत्न करेल. माजी ऑफस्पिनर रमेश पोवार हे या संघाचे प्रशिक्षक आहेत. विजय हजारे करंडक स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत असून मुंबईचा ड गटात समावेश आहे. मुंबईचे साखळी फेरीतील सामने जयपूरमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पाँडिचेरी यांच्याविरुद्ध होणार आहेत. 21 फेबुवारीस त्यांची मोहिम दिल्लीविरुद्ध सुरू होणार आहे.

मुंबई संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अखिल हेरवाडकर, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोर, शिवम दुबे, आकाश पारकर, अतिफ अत्तारवाला, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजीत नायक, तनुश कोटियन, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहित अवस्थी.

Related Stories

आंतरराष्ट्रीय शूटर चंद्रो तोमर यांचे निधन

pradnya p

दुसऱया कसोटीसाठी बर्न्स पूर्ण तंदुरूस्त

Patil_p

बेल्जियमचा गोफिन अजिंक्य

Patil_p

जोकोव्हिच, मेदव्हेदेव यांचे शानदार विजय

Patil_p

तामिळनाडू-मुंबई रणजी लढत आजपासून

Patil_p

सिडनी एफसी ला फुटबॉलचे जेतेपद

Patil_p
error: Content is protected !!