तरुण भारत

प्राणिक हीलिंगः एक आधुनिक आणि पूरक उपचार पद्धती

‘खरंच काय करावं सुचत नाही गं. जराही शांतता नाही बघ. अगदी नको वाटतंय सारं.’

‘का गं? काय झालं. काही प्रॉब्लेम आहे का?’

‘हो ही आणि नाही ही,’… ‘म्हणजे?’

‘काही नाही गं. आम्ही दोघेही जॉब करतो, घर पैसा, गाडी, सर्व काही आहे पण जराही शांतता नाही. हल्ली हा प्रवासही नकोच वाटतो. दगदग नको झाली आहे गं आता. पण घरात बसावं म्हटलं तरी चैन पडत नाही. घराच्या बाहेर पडणंही एकेकदा नको वाटतं आणि स्वस्थ बसवत नाही अशातली अवस्था आहे

‘हं.. खरं आहे गं. ज्याच्याकडे सगळं आहे तोही ते टिकवण्यासाठी धडपडतो आणि ज्याच्याकडे नाही तो मिळावं म्हणून धडपडतो.. शांतता कुणालाच नाही हे मात्र खरं..’

दोन मैत्रिणींमधे चाललेला हा संवाद सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारा होता. सध्याच्या काळामध्ये शारीरिक व मानसिक प्रश्न ऐरणीवर आहेत. कारणे काहीही असली तरी आधुनिक काळाच्या धावपळीच्या जीवनात आपल्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. अशावेळी हे स्वास्थ्य सुधारण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी अनेक तंत्रे, उपचार पद्धती झपाटय़ाने विकसित होत आहेत. वैद्यकीय उपचारांना पूरक असे उपचार शास्त्र वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध केले आहे. ही पूरक उपचार पद्धती म्हणजेच ‘प्राणिक हीलिंग’

व्याधी ‘प्राण’ उर्जेच्या (body energy) असंतुलनामुळे निर्माण होतात, तर हीच प्राण ऊर्जा संतुलित केली म्हणजे व्याधीचे निवारण होते अशी या पूरक उपचार पद्धतीची संकल्पना आहे. प्राणिक हा शब्द ‘प्राण’ या शब्दापासून बनला आहे. विविध देशांमध्ये त्याला रुह, ची, की, माना अशा वेगवेगळय़ा नावांनी ओळखले जाते. यातील दुसरा शब्द म्हणजे ‘हीलिंग’ अर्थात निरोगी करणे, सशक्त करणे अथवा एखादी पोकळी भरून काढणे. शारीरिक आजाराच्या रूपात असो वा उद्विग्न मनःस्थितीमुळे असो, निर्माण झालेली पोकळी भरून काढणे व माणसाला सशक्त करण्यासाठी तसेच नातेसंबंधातील ताणतणाव सुधारण्याच्या दृष्टीने हे उपचार तंत्र प्रभावी ठरत असल्याचे समोर येत आहे. ही पूरक उपचार पद्धती नेमकी कशी काम करते हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी प्राणशक्ती म्हणजे काय, ती नैसर्गिकदृष्टय़ा आपले शरीर कसे सुदृढ करते हे समजून घेऊया. उदा. काम करत असताना काही लागले, एखादी किरकोळ जखम झाली तर काही दिवसात ती आपोआप बरी होते. याचाच अर्थ असा की आपल्या शरीरात स्वतःहून स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे. विज्ञानाने सिद्ध केले आहे की प्रत्येक वस्तूला, प्राण्याला ऊर्जा आहे. याच नियमानुसार आपल्या शरीराभोवतीसुद्धा उर्जेचे वलय आहे, ज्याला इंग्रजीमध्ये Aura असे म्हणतात. याच उर्जेमुळे आपले शरीर जिवंत राहते. या जीवनावश्यक उर्जेचे प्रमुख तीन स्रोत आहेत.

1. सूर्याकडून मिळणारी सौर ऊर्जाशक्ती

2. हवेपासून मिळणारी वायू ऊर्जाशक्ती

3. भूमीपासून मिळणारी भू ऊर्जाशक्ती

सूर्यकिरणांमार्फत मिळणाऱया ऊर्जाशक्तीमुळे शरीर निरोगी राहते, सशक्त राहते. कोवळय़ा उन्हात बसल्यास आपल्याला सौर ऊर्जाशक्ती मिळते. वायू ऊर्जाशक्ती श्वसनामार्फत आपली फुफ्फुसे शोषून घेतात. भू ऊर्जाशक्ती आपल्या तळपायांच्या मार्फत शरीरात शोषली जाते. ही क्रिया अत्यंत नैसर्गिक रीतीने नियमित चालू असते. भू ऊर्जाशक्ती योग्य प्रमाणात शरीरात असेल तर शरीराची कार्यक्षमता वाढते. म्हणूनच डॉक्टर अनेकदा रुग्णांना गवतावर किंवा स्वच्छ जमिनीवर चालण्याचा सल्ला देतात. प्राणी, वनस्पती, झाडे यांना सूर्य, हवा, पाणी यांच्या माध्यमातून ऊर्जाशक्ती मिळते. आपण माणसे ही ऊर्जाशक्ती सूर्यप्रकाश, अन्न, हवा, पाणी यांच्या माध्यमातून शोषून घेतो म्हणजेच सृष्टीतील प्रत्येक घटक या ऊर्जाशक्तीवर व त्याच्या भौतिक शरीरातील संतुलनावर अवलंबून आहे. यामुळेच जेव्हा वातावरण बदलते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या ऊर्जादेहावर होतो आणि याचा परिणाम म्हणजे आपल्यात आजार उद्भवतात. या उपचार पद्धतीतून रुग्णाच्या ऊर्जादेहावर उपचार केले जातात आणि ऊर्जाशक्ती संतुलित केली जाते. ज्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते व व्याधीवर नैसर्गिकरित्या मात करणे सोपे जाते. मुळातच व्याधी का निर्माण होते हे पाहणे आवश्यक आहे. जेव्हा शरीरातील एखाद्या भागाला आवश्यक तेवढय़ा उर्जेचा पुरवठा होत नाही अथवा वापरली गेलेली किंवा दूषित उर्जा पूर्णपणे शरीराबाहेर टाकली जात नाही, तेव्हा शरीर व्याधिग्रस्थ होते. अनेक वर्षे विज्ञानाची ही संकल्पना होती की मनुष्याला फक्त भौतिक देहच आहे. परंतु गेल्या काही दशकातील संशोधनातून व अनेक प्रयोगातून असे सिद्ध झाले की मनुष्याचे शरीर हे दोन भागांनी बनलेले आहे.

1.दृश्यमान भौतिक शरीर

2.अदृश्य ऊर्जा शरीर (Aura)

हे ऊर्जाशरीर अतिशय सूक्ष्म कणांचे बनलेले आहे. या अदृश्य ऊर्जाशरीराला ‘प्राणमय कोष’ किंवा ‘एनर्जी बॉडी’  असेही म्हटले जाते. विज्ञानाच्या भाषेत त्याला ‘बायोप्लासमिक बॉडी’ असे म्हणतात. ऊर्जा शरीरावर अनेक ऊर्जा केंद्रे असतात. या ऊर्जा केंद्रांनाच योगशास्त्रात ‘चपे’ असे म्हटले गेले आहे. ही ऊर्जा केंद्रे वातावरणातून ऊर्जा शोषून घेतात आणि ही शोषलेली ऊर्जा शरीरभर वितरित करतात. शरीरात वापरली गेलेली किंवा दूषित झालेली ऊर्जा शरीराबाहेर टाकण्याचे कामही याच ऊर्जा केंद्रांद्वारे होते, परंतु काही कारणांमुळे जर या प्रणालीत काही अडथळा निर्माण झाला तर ही दूषित किंवा वापरलेली ऊर्जा शरीरात साठून राहायला सुरुवात होते परिणामी तो भाग किंवा शरीर व्याधिग्रस्थ होते. या उपचार पद्धतीद्वारे हीच दूषित ऊर्जा काढून टाकली जाते व त्या जागी शुद्ध ऊर्जेचा पुरवठा केला जातो, ज्यामुळे शरीराची व्याधी निवारण क्षमता अनेक पटींनी वाढते आणि शरीर व्याधीमुक्त होते.

 या पूरक उपचार पद्धतीचे वैशिष्टय़ म्हणजे रुग्णाला उपचार देताना कोणत्याही प्रकारचे औषध दिले जात नाही वा कोणत्याही प्रकारचा स्पर्श केला जात नाही. मग नेमके उपचार कसे केले जातात असा तुम्हाला आता प्रश्न पडेल. या प्रश्नावर तुम्ही थोडा विचार करा. अंदाज आखा आणि पुढच्या लेखात हे रहस्य जाणून घ्या.

आज्ञा अभिषेक कोयंडे

Related Stories

कोरोना रोखण्याचा सिंधुदुर्ग पॅटर्न

Patil_p

तुझें यथोचित भाषण

Omkar B

कामदेवाच्या पराक्रमाचे स्मरण

Patil_p

अनुरूप जाणोनि पूर्वींच वरिलां

Omkar B

हल्ली आणि आमच्या वेळी

Patil_p

आगळं-वेगळं केरळ

Patil_p
error: Content is protected !!