तरुण भारत

धोका आजही

देशभरातील कोरोना संसर्ग कमी झाला असे म्हणता म्हणता पुन्हा एकदा आकडेवारी वाढू लागली आहे. गेल्या दिवसभरात देशात तब्बल 9,309 नव्या बाधितांचे नोंद झाली आहे. विदर्भात एका शाळेत 87 मुलांना लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईमध्ये अशाच पद्धतीने आकडेवारी वाढत आहे. कर्नाटकात नव्याने 430 तर दिल्लीत 142 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी भय वाढविणारी आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी आणि त्यानंतर होणाऱया मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादताना कोरोना साथीचे कारण दिले आहे. काही संघटनाना ते मान्य नसले तरीही ते वास्तव आहेच. कोरोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर समाजातील विविध क्षेत्रातून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे बंद करण्यात येऊ लागले आहे. निवडणुका आणि इतर कारणांमुळे ज्या भागात लोक एकत्र आले तिथे काही प्रमाणात रुग्ण वाढल्याचे दिसून आले होते. मात्र पूर्वीच्या आकडेवारीच्या प्रमाणात हे आकडे कमी वाटू लागल्यामुळे साहजिकच लोकांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. नव्याने करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये बहुतांश लोकांनी मास्क वापरणे बंद केले असून सॅनिटायझरचा वापर तर होतच नाही असे दिसून येऊ लागले आहे. नागरिकांची ही कृती अत्यंत धोकादायक आहे. लस आता उपलब्ध झाली आहे या आविर्भावात लोक या सगळय़ाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून  रुग्ण संख्या वाढू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थातच प्लेग, देवी, कॉलरा, इन्फ्लूएन्झा, एच आय व्ही, सार्स अशा प्रकारच्या रोगांनी आणि जीवघेण्या विषाणूंनी जगात यापूर्वी हाहाकार माजवला आहे. लाखो लोकांचे प्राण घेतल्यानंतर त्याच्यावर लस सापडली आणि आज लोक या आजारांसह जगत आहेत. त्यामुळे कोरोनावर आलेल्या लसी नंतर जगात नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. सर्व जगाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. उद्योगधंदे, मनोरंजन केंदे, पर्यटन स्थळे, देवालये आणि क्रीडांगणावरही गर्दी वाढू लागली आहे. गेले 11 महिने जगाला दाबून ठेवलेल्या या विषाणूला मारणारे औषध तयार झाले आहे या एकाच विश्वासावर लोक घराबाहेर पडू लागले आहेत. गेल्या 8-9 महिन्यांपासून रखडलेले आपले जीवन सुरळीत करायचे आणि आपल्या समोर असणाऱया विविध प्रकारांच्या आव्हानांवर मात करायची या ध्येयाने लोक झपाटून कामाला लागले आहेत. अशा काळात 11 महिने जी बंधने पाळली ती आता लोकांना नकोशी वाटू लागली आहेत. मास्कची दोरीही आता कानाला टोचू लागली आहे. मित्र सहकाऱयांना आलिंगन देण्याऐवजी दुरून चौकशी करणे आता नकोसे झाले आहे. चार लोकात मास्क लावणे म्हणजे इतरांवर अविश्वास दाखवल्यासारखे भासू लागले आहे. त्यामुळे तो आपोआप उतरवला जाऊ लागला आहे. अर्थात सामान्य जीवन काळात लोकांनी तसे वागण्यास कोणाचीही हरकत असत नाही. मात्र अजूनही जेव्हा संकट पुरते संपलेले नाही तेव्हा मास्क उतरवून संपर्क साधणे योग्य ठरणार नाही. चार लोक संवाद साधत असताना एकाने मास्क वापरायचाच असा आग्रह कायम ठेवला तर उर्वरित तीन लोकही आपोआपच हनुवटीवरचा मास्क नाकावर चढवतील यात शंकाच नाही. त्यामुळे आपण जे करतो त्याबद्दल न्यून बाळगण्यापेक्षा आपल्या मित्रांच्या हितासाठी आपण आग्रही आहोत हा विचार पटवून देणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. गेल्या 11 महिन्यातील मास्क वापराच्या सवयीमुळे आणि सातत्याने हात धूत राहण्यामुळे आपण संसर्गापासून दूर राहिलो हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. मास्कचा आग्रह चुकीचा ठरवण्यापेक्षा त्याच्या मताचा सन्मान करणे हे प्रत्येकाच्या हिताचे आहे हे मनापासून ठरवले पाहिजे. या आठवडय़ात पुन्हा एकदा रुग्ण वाढल्याच्या घटना दिसू लागल्या आहेत. ते दुर्लक्षामुळेच हे ध्यानात घेतले पाहिजे. यापूर्वीचा अत्यंत दारुण असा काळ आठवला पाहिजे. निसर्गाने निर्माण केलेली दहशत आणि त्यात बळी पडलेले आप्तस्वकीय, शेजारीपाजारी, मित्र, दूरचे नातेवाईक यांचे स्मरण ठेवून स्वतः टिकून राहणे ही आजची गरज बनली आहे. आता कुठे सरकारच्या आदेशाने शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस सुरू होऊ लागले आहेत. नेमके त्याच काळात रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालकांना आपल्या मुलांची चिंता लागली आहे. मुलांना वर्गात बसवायचे की नाही याबाबत ते गांभीर्याने विचार करत आहेत. ज्ये÷ व्यक्ती नियम पाळत नसतील तर मुलांकडून अशी अपेक्षा बाळगणे कठीण असते. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक होऊ शकतो. बदलत्या वातावरणामुळे सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण सर्वत्रच वाढत आहेत. त्याचाच पुढचा टप्पा कोरोना संक्रमणाचा ठरत असल्याने काळजी घेण्याशिवाय दुसरे कोणाच्या हाती काही नाही. सरकारने कोरोनावर उपचार करणाऱया आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि पन्नास वर्षावरील तसेच पन्नास वर्षाखालील मात्र विविध व्याधी जडलेले रुग्ण यांना प्राधान्याने लस देण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यालाही काही मंडळींनी आक्षेप घेतल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे आणि त्याच काळात नव्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा धोका पत्करण्यात अर्थ नाही. मला काय होते, माझी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे अशा अविर्भावात न राहता प्रत्येक घटकाने स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी याबाबत पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे.  सरकारी यंत्रणा त्यांचे काम करत असते. मात्र समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱया मंडळींनी काळजी घेतली तर आपला परिसर पुन्हा संकटात सापडणार नाही. त्या दृष्टीने या संकटाबाबत सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Related Stories

महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प

Patil_p

स्मरोनि विलाप करिती जाण

Patil_p

भक्ती शक्ती संगम

Patil_p

पुन्हा समस्यापूर्ती

Patil_p

श्यामरंग

Patil_p

डिजिटल सौंदर्य

Patil_p
error: Content is protected !!