तरुण भारत

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून अपहरण करणारी टोळी गजाआड

पर्वरीतील बंगल्यात गुप्त व्यवहार, पोलिसांकडून दोन अपहृतांची सुटका तेरापैकी अकरा आरोपी गोव्याबाहेरील

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून युवकांचे अपहरण करणाऱया व त्यांच्या कुटुंबीयांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱया एका टोळक्याचा गोवा पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला.  पर्वरीतील एका बंगल्यातून तेरा जणांच्या एका टोळीला गजाआड करण्यास पोलिसांना यश आले. नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या दोघा युवकांची सुटकाही पोलिसांनी केली. तेरापैकी अकरा आरोपी गोव्याबाहेरील आहेत.

ही कारवाई वास्को पोलीस, गुन्हा अन्वेषण विभाग, एटीएस व पेडणे पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. या प्रकरणाची सुरुवातच वास्कोतून झाली होती. दोन दिवसांपूर्वीच वास्कोतील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या युवकाचे अपहरण झाल्याचा संशय निर्माण झाला होता. या युवकाच्या मैत्रिणीने त्याच्या अपहरणाबाबतची तक्रार पोलीस स्थानकात दोन दिवसांपूर्वी केली होती. सदर युवकाचे नाव शापूर जारीफी असे असून तो मुळ अफगानिस्तातील आहे. दि. 7 रोजी दिल्लीतून तो गोव्यात आला होता. दिल्लीत एका एजेन्टस्शी त्याचा संपर्क झाला होता. त्याला नोकरीसाठी कॅनडाला पाठवण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे सर्व दस्तऐवज तयार असल्याचे सांगून त्याला गोव्याहून उड्डाण करायचे असल्याने गोव्यात अमूक ठिकाणी पोहोचायला सांगितले गेले. त्यानुसार तो युवक वास्कोत आला. येथील माणसाने त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याला पर्वरीतील एका बंगल्यात ठेवण्यात आले.

पर्वरीतील येथील हा बंगला अपहरण आणि लुटीच्या कामासाठी याच टोळक्याने भाडय़ाने घेतला होता. अपहृत युवकाला या बंगल्यातून मित्रांना व घरी संपर्क करून आपण कॅनडात पोहोचल्याचे तसेच एजंन्टसना देणे आवश्यक असलेली उर्वरित 20 हजार डॉलर एवढी रक्कम पाठवण्याची मागणीसाठी सांगण्यात आले. या युवकाने तसेच  केले. मात्र, अफगाणी भाषेत त्या युवकाने खरा प्रकार आपल्या मैत्रीणाला सांगितला. त्यामुळे मैत्रिणीने वास्कोत पोलीस तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना, अधीक्षक पंकजकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची काही पथके स्थापन करण्यात आली. या तपासानुसार पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले अन्  पोलीस पर्वरीतील त्या बंगल्याजवळ पोहोचले. या बंगल्यात गुप्त व्यवहार चालू होता. या अफगाणी युवकाबरोबरच एका पंजाबी युवकाचेही टोळीने विदेशात नोकरीच्या आमिषाने अपहरण केले होते. पोलिसांनी धडक कारवाईत या दोघांची सुटका केली व त्या तेरा जणांच्या टोळीला गजाआड केले. या कारवाईत एक अल्पवयीन मुलगाही आढळून आला. तोसुध्दा या टोळीत होता. त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

बनावट पासपोर्टचा वापर

या टोळीतील दहा संशयित हरियाणातील आहेत. एक उत्तर प्रदेशमधील तर दोघे पेडणे गोवा येथील आहेत. ही टोळी आपला व्यवहार उरकण्यासाठी बनावट पासपोर्ट व बनावट बोर्डींग पासचा वापर करीत असत. एखादय़ा कुटुंबाला लुटण्यासाठी त्यांची व्यक्ती विदेशातच असल्याचे भासवण्यासाठी विविध कल्पनांचा वापर करीत असत. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून बनावट पासपोर्ट व बोर्डींग पास, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल फोन्स तसेच या कामात वापरण्यात आलेल्या दोन इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या टोळीला अशा व्यवहारांसाठी गोवा सुरक्षित वाटल्याने ते सावज हेरून त्याना विदेशात उड्डाण करण्यासाठी गोव्यात बोलवीत होते. त्यांनी अशा प्रकारे अनेकांना लुबाडले असण्याची शक्यता असून दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे व इतर पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी गजाआड केलेल्या टोळीतील संशयितांची नावे आलेक्स डिसोझा, रॉबीनसन डिसोझा, आशिष त्रिपाठी, रजत कल्याण, साहील कल्याण, प्रदीप कुमार, संजु सिंग, विजय, अनिल कुमार, अनुराग कुमार, विशाल गोस्वामी, सुशील सिंग अशी आहेत.

Related Stories

सोलये चौगुले खाण कंपनीच्या परिस्थितीचा सरकारी यंत्रणेकडून आढावा

Omkar B

डोंगरीचे प्रसिद्ध इंत्रुज मेळ उत्साहात

Amit Kulkarni

ब्रम्हकरमळीतील नागरिकांना जुलाब, उलटय़ा

Amit Kulkarni

कारवारच्या पिवळय़ा टॅक्सींना गोव्यात प्रवेश द्यावा

Amit Kulkarni

कोरोनाचा कहर : 71 बळी, 3496 बाधित

Amit Kulkarni

प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!