तरुण भारत

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी घातपाताचा कट

पाकिस्तानच्या षड्यंत्राचा पर्दाफाश – जम्मू बसस्थानकावर स्फोटके जप्त

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

पुलवामा हल्ल्याच्या दुसऱया स्मृतीदिनी रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये मोठय़ा हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळल्याचा दावा अधिकाऱयांकडून करण्यात आला आहे. जम्मू बसस्थानकावर 7 किलो स्फोटके जप्त करण्यात आली. सांबा येथून 15 लहान आयईडी आणि 6 पिस्तूल जप्त करत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू विभागाचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिली आहे. या स्फोटकांच्या माध्यमातून जम्मूमध्ये ठिकठिकाणी हल्ले करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

पुलवामा येथील हल्ल्याला रविवारी दोन वर्ष झाली असतानाच पुन्हा हल्ल्याचा कट उधळवून लावण्यात आला. जम्मूमध्ये मोठय़ा दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत होता. सुरक्षा दलाने वेळीच कारवाई करत मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त केली.  त्यानंतर सुरक्षादलाने संपूर्ण स्थानकावर शोधमोहीम राबवली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू हाती लागली नाही. जम्मू पोलिसांनी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करत कारवाईसंबंधी माहिती दिली. जम्मूचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये सापडलेली विस्फोटक आणि दहशतवाद्यांच्या कटाचा खुलासा केला.

स्फोटकांसह एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून शस्त्रसाठाही जप्त केल्याची माहिती मुकेश सिंह यांनी दिली. या स्फोटकांच्या सहाय्याने येथील बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि मंदिरांमध्ये स्फोट घडवण्याचा दहशतवादी संघटनांचा कट होता, अशी माहिती संशयिताने दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व कटामागे पाकिस्तानी यंत्रणांचा सहभाग असून भारतीय सुरक्षा दलाने वेळीच कारवाई केल्याने मोठा घातपात टळल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानातून निर्देश, संशयिताची कबुली

पुलवामा हल्ला स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर येथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. याचदरम्यान सांबा येथून शनिवारी रात्री सोहेल नामक एका व्यक्तीला स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली. सदर संशयिताने आपण चंदीगढ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पाकिस्तानस्थित ‘अल-बदर-तंजिम’ या संघटनेकडून आपल्याला स्फोटके पेरण्याचे निर्देश मिळाल्याची कबुलीही त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

अन्य संशयितही जाळय़ात

संशयित दहशतवादी सोहेल याला हल्ला करण्यासाठी तीन ते चार ठिकाणांचे लक्ष्य देण्यात आले होते. जम्मू येथून तो श्रीनगरला विमानाने जाणार होता. त्याठिकाणी तो ‘अल-बदर-तंजिम’ संघटनेचा कार्यकर्ता शकील खान याला भेटणार होता. शकीलसोबतच चंदीगढ येथील रहिवासी असलेल्या काझी वसीमलाही या प्रकरणाची पूर्ण माहिती होती. सोहेलने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. याशिवाय आबिद नबी नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. एकंदर दिवसअखेरपर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पुलवामातील हुतात्म्यांना मान्यवरांची श्रद्धांजली

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱया पुलवामा हल्ल्याला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. हल्ल्याच्या स्मृतीदिनी मान्यवरांकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिल्लीच्या इन्टिग्रेनेट डिफेन्स स्टाफ मुख्यालयात पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा यावेळी निषेधही करण्यात आला. पंतप्रधानांनीही यासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कोणताही भारतीय हा दिवस विसरू शकत नाही. आम्हाला आपल्या जवानांचा अभिमान आहे, त्यांच्या शौर्याने अनेक पिढय़ांना प्रेरणा मिळत राहील,’ असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे.

दोन वर्षांपूर्वी झाला होता पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये एक बस बॉम्बने उडवण्यात आली होती. हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर ‘पीओके’मध्ये सर्जिकल स्ट्राईक करत भारताने जशास तसे उत्तर दिले होते. हवाई दलाने बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईमध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो.

Related Stories

चिंता वाढली : सोलापुरात आढळले २० नवे रुग्ण,14 वा बळी

Shankar_P

हुकुमशाहीनेच घडून येऊ शकतो मोठा बदल!

Patil_p

राजद आमदाराकडून नितीश कुमारांचे कौतुक

Patil_p

येस बँक निर्बंधमुक्त, सर्व व्यवहार सुरू

tarunbharat

या देशात काहीही घडू शकतं

Patil_p

‘कोव्हॅक्सिन’ 81 टक्के परिणामकारक

Patil_p
error: Content is protected !!