तरुण भारत

शिवसेनेची रुग्णवाहिका सीमाभागासाठी उपयुक्त ठरेल!

किरण ठाकुर यांनी व्यक्त केला विश्वास : अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचे बेळगावमध्ये लोकार्पण

प्रतिनिधी / बेळगाव

मराठी माणसांवर होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबईत शिवसेनेची निर्मिती झाली. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही भूमिका शिवसेनेने आजवर जपली. रुग्णवाहिका, रक्तदान यामधून शिवसेनेने सेवाभाववृत्ती जपली आहे. याच सेवाभावातून शिवसेनेने बेळगावसाठी उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका सीमाभागासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास म. ए. समिती नेते व शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रासोबतच बेळगावसह सीमाभागासाठी अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचे रविवारी बेळगावमध्ये लोकार्पण करण्यात आले. किरण ठाकुर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकुर यांनी शिवसेनेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

प्रारंभी संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या हस्ते किरण ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या, ही रुग्णवाहिका उपलब्ध करून शिवसेनेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. याप्रमाणेच महात्मा फुले आरोग्य योजनेचाही सीमावासियांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली. अरुण कानुरकर, जयराम मिरजकर, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरले, प्रवीण तेजम, दिलीप बैलूरकर, संघटक दत्ता जाधव, राजू तुडयेकर, पिराजी शिंदे, राजकुमार बोकडे, विजय सावंत, बाळासाहेब डंगर्ले, बसवाणी कुरंगी, हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर, अरुण कानूरकर, डॉ. किरण पाटील, डॉ. दिवटे, बंडू केरवाडकर, रवी जाधव, रवी धनूचे, सुनील बोकडे, कुलदीप कांबळे, सुभाष धाडवे, मोहन कारेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम, अश्वजित चौधरी, साईनाथ शिरोडकर यांच्यासह शिवसैनिक व सीमावासीय उपस्थित होते.

बेळगावमध्ये अत्याधुनिक हॉस्पिटलची गरज

सीमावासियांच्या पाठीमागे शिवसेना भक्कमपणे उभी असल्यामुळे सीमावासियांवर अन्याय होताच त्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटतात. त्यामुळे शिवसेनेने हीच आग्रही भूमिका ठेवत सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी. बेळगावमध्ये मराठी भाषिकांचे एखादे मोठे हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्राने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी किरण ठाकुर यांनी केली.

Related Stories

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करा

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये रुग्णवाहिका चालकाला मारहाण

Shankar_P

कोरोनामुळे औद्योगिक वसाहतींकडे सरकारचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

स्थानिक लांब पल्ल्याच्या बसेस पूर्ववत सेवेत

Patil_p

तीन महिन्यापासून पासपोर्ट सेवा केंद्र बंदच

Patil_p

भाजी मार्केटमध्ये नियमांचा अभाव नागरिकांच्या आरोग्याला धोका

Patil_p
error: Content is protected !!